अक्षररंग

आज मिठी लगे है तेरी गाली रे

काहींच्या मते होलिका ही राक्षसी होती तर काहींच्या मते ती देवी होती. होलिकेचे एक दैत्य रूप आणि दुसरे देवी रूप असल्याचे मानले जाते. होळी ही जशी मांगल्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, बेबंद नाचणे अशा विचित्र पद्धतीही तिच्याशी संलग्न झालेल्या दिसतात.

नवशक्ती Web Desk

विशेष

मंजिरी हसबनीस

काहींच्या मते होलिका ही राक्षसी होती तर काहींच्या मते ती देवी होती. होलिकेचे एक दैत्य रूप आणि दुसरे देवी रूप असल्याचे मानले जाते. होळी ही जशी मांगल्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, बेबंद नाचणे अशा विचित्र पद्धतीही तिच्याशी संलग्न झालेल्या दिसतात.

होळी हा सण भारतामध्ये अनेक ठिकाणी साजरा होतो. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा हा सण महाराष्ट्र ते उत्तर भारत या पट्ट्यामध्ये खास उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाची दोन रुपे आहेत. एक म्हणजे होलिका दहन अर्थात होळी पेटवणे हे स्वरूप आणि लगेच दुसऱ्या दिवशी रंगांनी खेळण्यात येणारे धुळवड हे स्वरूप. पारंपारिक दृष्टीने या दोन्ही स्वरूपांच्या मागे परंपरा आणि आख्यायिका दडलेल्या आहेत.

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन या नावाने होळी पेटवली जाते. होलिका दहन या उत्सवाला होळी पौर्णिमा, फागुन, फाग, हुताशनी महोत्सव, दोला यात्रा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. भक्त प्रल्हादाची एक सुंदर कथाही याबाबतीत प्रचलित आहे. होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण. हिरण्य कश्यपूला अमरत्वाचे वरदान होते त्याचप्रमाणे होलीकेला अग्नी जाळू शकणार नाही असे वरदान होते. हिरण्यकश्यपू उन्मत्त झाला होता. मीच सर्वश्रेष्ठ असे त्याला वाटू लागले होते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. तो सतत विष्णूची भक्ती करे. हिरण्यकश्यपूला ते सहन झाले नाही. त्याने प्रल्हादाला जाळायचा डाव रचला. त्याने होलीकेला पाचारण केले. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीप्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद वाचला आणि त्या ऐवजी होलीकेचे दहन झाले अशी कथा आहे.

काहींच्या मते होलिका ही राक्षसी होती तर काहींच्या मते ती देवी होती. आख्यायिका वेगवेगळ्या असल्या तरी एक निश्चित की जिथे जिथे दहनाचा उल्लेख होतो तिथे तिथे वाईट जळून जाते आणि चांगले वाचते. यामध्येही हीच संकल्पना आहे. होळीभोवती फिरून बोंबा मारल्या जातात त्या दुष्ट शक्तीना पळवून लावण्यासाठीच.

फाल्गुन महिन्यात थंडीचा भर असतो. या काळात पानगळही खूप होते. झाडे वठतात. अशा झाडांचा आणि पानांचा वापर होळी पेटवण्यासाठी करण्यात येत असे. काही ठिकाणी ही राख अंगाला फासतात. त्यामागे ही शास्त्र आहे. राख ही अँटिसेप्टिक आहे. ती फासल्यानंतर रंग फासायचे त्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होत नाही. या होलिका दहनाच्या वेळी जे संस्कृत मंत्र म्हणण्यात येतात त्यामध्ये होलिका हिला देवीच मानले आहे. तिने दुष्टांचा संहार करावा आणि ऐश्वर्य म्हणजे भूति वाढवावी अशी प्रार्थना केलेली दिसते. होळीनंतर मात्र उष्मा वाढायला प्रारंभ होतो

म्हणूनच या होलीका उत्सवाला सुग्रीष्मक असेही नाव आहे. याच नावाचे अपभ्रष्ट रूप शिमगा असे झाले असावे. कोकणात होळीला शिमगा साजरा करण्यात येतो. होळीला साजरा होणारा शिमगा हा कोकणातील एक लोकप्रिय पारंपारिक उत्सव आहे. हा शिमगा पाच ते पंधरा दिवस साजरा करण्यात येतो. फाल्गुन पंचमीला छोटी होळी पेटवतात तेव्हापासून तो चालू होतो आणि फाल्गुन पौर्णिमेला मोठी होळी लावतात त्या वेळी तो संपतो. या शिमगा उत्सवात ग्रामदेवतेची सजवलेली पालखी घरोघरी फिरवतात. शिमग्याची खास गाणी असतात. त्यांना जती असे म्हणतात. पेटवलेल्या होळीभोवती नृत्य करणे, आगीतून धावत जाणे किंवा नारळ जिंकणे असे चित्तथरारक खेळ कोकणामध्ये खेळण्यात येतात. उत्तम पिक आल्याने कृषीवल आनंदी असतात. दुष्ट गोष्टींना दूर सारून चांगल्या गोष्टी आपल्याला लाभाव्या यासाठी ग्रामदेवतेची प्रार्थना केली जाते. हे सारे सामूहिक असते त्यामुळे बंधुभाव वाढीस लागतो आणि सदाचाराला प्रोत्साहन मिळते. लोक आपापसातील वैरभाव विसरून जातात.

अनेक ठिकाणी होळीमध्ये नारळ आणि पुरणपोळी अर्पण करतात. या होळीला गोडाची होळी असे म्हणतात. तिखटाची होळी देखील असते. मांसाहारी लोक त्यामध्ये मांस भाजतात.

फाल्गुन महिन्यामध्ये सुगी असते गव्हाच्या लोंब्या हाती आलेल्या असतात. होळीमध्ये या लोंब्या अर्पण करतात आणि उत्तम पिक आले म्हणून देवाला धन्यवाद देतात.

या होळीचे दुसरे स्वरूप म्हणजे रंगाने खेळण्यात येणारी होळी. या रंगांच्या होळीला धुळवड, धुलीवंदन, रंगवर्षा, रंगपंचमी, वसंतागमन, वसंतोत्सव अशी अनेक नावे आहेत. फाल्गुन महिन्यानंतर चैत्र लागतो आणि निसर्ग देखील फुलांच्या माध्यमातून रंगपंचमी उत्सव साजरा करतो. होळीपासून वैशाख वणव्यापर्यंतचा हा कालखंड नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने खरोखरच फार मनोहारी असतो. प्रेमीयुगुलांच्या आवडीचा हा कालखंड. याची सुरुवात या रंग होळीपासून होत असावी. या रंगहोळीला शृंगार रसाची किंवा छेडखानीची एक नाजूक झालर आहे.

रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे.... किंवा

आया होली का त्योहार

उडे रंग की बौछार.......

आज मिठी लगे है तेरी गाली रे

या अशा गीतांमधून या प्रेम रंगाचे होळीशी असलेले नाते व्यक्त झालेले आहे. होळी ही जशी मांगल्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, बेबंद नाचणे अशा विचित्र पद्धतीही तिच्याशी संलग्न झालेल्या दिसतात. होलिकेची दोन रूपे मानली जातात. एक दैत्य रूप आणि दुसरे देवी रूप. या अशा पद्धती दैत्य रूपाशी जुळणाऱ्या वाटतात. कोळी बांधव होळीच्या दिवशी त्यांच्या होड्यांची पूजा करतात. आदिवासी जमाती त्यांच्या ग्राम्यदैवताची पूजा करतात. गुलाल उधळतात त्या दिवशी गोड भात करतात आणि नृत्य करतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. उत्तर भारतात लाठ्यांचा खेळ खेळतात त्याला लाठमार होळी असे म्हणतात. तामिळनाडूमध्ये शिवाने तिसऱ्या डोळ्याने कामदेवाचे दहन केले. त्याच्याशी होळीचा संबंध जोडला जातो. बंगालमध्ये शांतिनिकेतन येथे फार सुंदर देखणी मिरवणूक आयोजित करण्यात येते. व्रज भागामध्ये कृष्ण राधा यांच्या रास लीलेला महत्व दिले जाते. कृष्णा चरित्रामध्ये गोपगोपिंनी खेळलेली रंगहोळी प्रसिद्ध आहे. अनेक प्राचीन चित्रांमध्ये कृष्ण व राधा यांचे होळी खेळतानाचे दृश्य रंगवलेले दिसते. यावरून होळी या सणाच्या प्राचीनतेविषयी काहीच संशय असण्याचे कारण नाही. वेदकाळात होळीचे स्वरूप थोडे वेगळे होते. पवित्र अग्नीची पूजा आणि वसंताचे स्वागत याच्याशी ही कल्पना जोडलेली होती. नंतर पौराणिक काळापासून मात्र होलिका दहन हे तिचे स्वरूप निश्चित झाले.

होळीच्या रंगोत्सवाच्या मागे सुंदर अशाच काही कल्पना दडलेल्या आहेत. राधा गोरी आणि कृष्ण सावळा. राधा कृष्णावर या गोऱ्या रंगामुळे शिरजोरी करत असे. म्हणून कृष्णाने तिला निळ्या हिरव्या लाल रंगांमध्ये रंगवले आणि स्वतः ही रंगला. आता दोघे समान झाले. अशा तऱ्हेने वर्णभेद आणि मतभेदही लयाला जावेत या दृष्टीने सर्वजण वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगून जातात. या रंगांच्या माध्यमातून काही अर्थ अभिव्यक्त होतात. अशा रंगात रंगून माणसे वसंताचे स्वागत करत असतात. गुलालाचा लाल रंग प्रेम, शक्ती, प्रेरणा यांचा द्योतक आहे. निळा दैवी आणि शांततेचा दूत आहे. हिरवा सुगीचा आणि भरभराटीचा दूत आहे. पिवळ्या रंगातून तेज आणि प्रकाश व्यक्त होतो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या रंगांमधून वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून होळीला जोडून येणारा रंगोत्सवही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर अशी ही होळी आपणा सर्वांनाच मंगलमय उत्कर्ष साधून देवो हीच प्रार्थना.

hasabnis1gmail.com

Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार

Navi Mumbai : 'हिंद-दी-चादर' समागमात नमुंमपाचा सर्वंकष सहभाग; आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व वाहतूक व्यवस्था सज्ज

गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती

WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम

Vasai : मुदत संपलेल्या औषध विक्रीचा प्रकार उघडकीस; अन्न व औषध प्रशासनाकडे गुन्हा नोंद करण्याची मागणी