नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
कधी-कधी छोटासा अपघातही जग बदलणारा शोध ठरतो. एका वितळलेल्या चॉकलेटमुळे मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध कसा बरं लागला?
“मित्रांनो, विचार करा... तुम्ही खिशात एक मस्त चॉकलेट ठेवलंय आणि अचानक ते वितळलं, तर तुम्ही काय कराल? आईला सांगाल किंवा दुसरं चॉकलेट घ्याल, बरोबर? पण एका शास्त्रज्ञाच्या खिशातलं चॉकलेट वितळलं अन् त्यातून चक्क ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’चा शोध लागला! आहे ना गंमत?
आताच्या काळात मायक्रोवेव्ह ओव्हन ही आपल्या स्वयंपाकघरातली एकदम खास अन् आवश्यक गोष्ट झाली आहे. काहीही झटपट शिजवायचं असो वा गार झालेलं जेवण गरमागरम करायचं असो, मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे हे काम अगदी मिनिटांत होतं! पण बालमित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? हा जादूचा ओव्हन काही कुणी मुद्दाम स्वयंपाकासाठी बनवला नव्हता, तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रडार यंत्रणेची देखभाल करताना अगदी अपघाताने या ओव्हनचा शोध लागला! आहे ना मस्त गंमत?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्रपक्षांच्या सैन्याला जर्मन सैन्याची जहाजं आणि विमानांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी रडार यंत्रणा खूप उपयोगी पडत होती. ‘रेथिऑन कॉर्पोरेशन’ नावाच्या कंपनीतील पर्सी स्पेन्सर हे संशोधक रडारला ऊर्जा पुरवणाऱ्या ‘मॅग्नेट्रॉन’ या व्हॅक्यूम ट्यूबवर काम करत होते. एक दिवस या मॅग्नेट्रॉनवर काम करत असताना पर्सी यांच्या अचानक लक्षात आलं की, त्यांच्या खिशात ठेवलेलं चॉकलेट पूर्णपणे वितळलंय! त्यांना या गोष्टीचं खूप नवल वाटलं. ‘अरे वा, हे कसं काय झालं?’ असा विचार करून त्यांनी जोमाने अभ्यास सुरू केला.
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, मॅग्नेट्रॉनमधून निघणाऱ्या मायक्रोवेव्हमुळे खायच्या वस्तू गरम होतात आणि वितळतात.
मग पर्सी यांनी यावर गांभीर्याने प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी सर्वात आधी पॉपकॉर्नच्या मक्याच्या दाण्यांवर प्रयोग केला. काय सांगू, ते मक्याचे दाणे मस्त फुगून पॉपकॉर्न झाले! त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर भरपूर प्रयोग केले. पर्सी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मग या मायक्रोवेव्हना सुरक्षितपणे एका बंद पेटीत ठेवून अन्न शिजवण्यासाठी कसं वापरता येईल, यावर डोकेबाजी सुरू केली.
एकदा तर पर्सी यांनी एका केटलीत अंडं ठेवलं आणि त्यावर हे मॅग्नेट्रॉन धरलं. ‘आता या लहरींमुळे अंड्याचं काय होतंय?’ हे कुतुहलानं बघायला त्यांच्या सहकाऱ्यानं केटलीत डोकावून पाहिलं आणि धडकन... ते शिजलेलं अंडं चक्क फुटून त्यांच्या सहकाऱ्याच्या तोंडावर उडालं! या मजेशीर अपघातातूनच मॅग्नेट्रॉनला एका सुरक्षित बॉक्समध्ये ठेवण्याची कल्पना सुचली आणि त्यातूनच आपला मायक्रोवेव्ह ओव्हन जन्माला आला.
युद्ध संपल्यावर रेथिऑन कंपनीने बाजारात आणलेला पहिला मायक्रोवेव्ह ओव्हन चक्क ५ फूट उंच, तब्बल ३४० किलो वजनाचा आणि ५ हजार डॉलर किमतीचा होता! या पहिल्या ओव्हनचं नाव ठेवण्यात आलं ‘रडाररेंज’. आजच्या काळात रडारपेक्षा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्येच या मॅग्नेट्रॉनचा वापर जास्त होतो. पुढे १९६० च्या दशकापासून भरपूर संशोधन होऊन सर्वांना परवडणारा अन् आवडणारा छोटूसा मायक्रोवेव्ह आपल्या घरात आला.
खिशातलं चॉकलेट वितळल्यामुळे आपल्यापर्यंत एवढा भारी ओव्हन आला! चला तर मग, पर्सी स्पेन्सर यांना थँक्यू म्हणत मायक्रोवेव्हमध्ये काहीतरी छान-छान अन् चविष्ट बनवून खाऊया!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com