मनाचे अभंग
डॉ. रूपेश पाटकर
व्यक्तीमधल्या चालकावर त्याच्यातील पालकाचा आणि बालकाचा प्रभाव असतो. पालक आणि बालक चालकात घुसले की चालकाला स्वतंत्रपणे काम करता येत नाही. पालक आणि बालकाच्या प्रभावातून वेगवेगळे पूर्वग्रह तयार होत असतात. हे पूर्वग्रह चालकाचे वर्तन प्रभावित करतात.
माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ज्या केसेसमध्ये अपयश येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, हे सुरुवातीलाच माहीत असूनदेखील केवळ आग्रहाखातर ज्या केसेस मी बघितल्या, त्या म्हणजे समजावण्याच्या केसेस. त्या केसेसमध्ये कोणीही मानसिकदृष्ट्या आजारी नव्हते. ठोस उदाहरण सांगायचे झाले तर अशा केसेस, जिथे मुलांनी लग्नासाठी ठरवलेला नियोजित जोडीदार त्यांच्या आईवडिलांना पसंत नव्हता. केवळ तो आपल्या जातीतील नाही, या एकाच मुद्द्यावर आईवडिलांचा विरोध होता आणि मला त्या आईवडिलांना समजावून सांगायचे होते की, लग्नाला विरोध करू नका. “यात सायकियाट्रिस्ट म्हणून माझी काही भूमिका नाही”, असे मी सांगूनदेखील “तुम्ही छान बोलता त्यामुळे ते तुमचे ऐकतील अशी आम्हाला आशा वाटते”, अशी माझ्यातील बालकाला (Child ला) कौतुकाची थाप देत ते त्यांच्या आईवडिलांना माझ्यासमोर बसवत. ती मंडळी मग ‘जातीबाहेरचा जोडीदार का नको’ याचा अवास्तव युक्तिवाद मला ऐकवीत. त्यांनी मांडलेले तर्क चुकीचे आहेत, हे त्या मांडणाऱ्या व्यक्तीलादेखील कळत असे. त्यामुळे ते खोडून काढण्यातून फारसे काही बदलत नसे. ते फक्त निरुत्तर होत आणि गप्प बसत. क्लिनिकमधून बाहेर निघताना “डॉक्टराक काय म्हायत, आमचा किती कडक आसा ता”, असे त्यांनी ऐकवल्याचे माझी रिसेप्शनिस्ट मला सांगत असे.
“बाकी स्वभावाने खूप प्रेमळ असलेले आमचे बाबा, दीपकमध्ये नाव ठेवण्यासारखे काहीही नसताना, त्याला ‘नाही’ का म्हणतात?” डॉक्टर असलेल्या मीनलने मला विचारले.
“कारण त्यांच्यातल्या चालकाला त्यांच्यातल्या पालकाने दूषित केलं आहे.” मी म्हणालो.
“काय?” असे आश्चर्याने विचारत माझ्या बोलण्यातले काहीही न कळल्याचे तिने स्पष्ट केले. अर्थात ज्यांना डॉ. एरिक बर्न यांनी मांडलेली ‘पालक-चालक-बालक’ ही स्वभाव रचना माहीत नाही, त्यांच्या ते लक्षात न येणे स्वाभाविक आहे.
पालक, चालक व बालक स्वभावरचना
आपल्या प्रत्येकात ‘पालक’, ‘चालक’ आणि ‘बालक’ हे तीन घटक असतात. पण प्रत्येकाचा ‘पालक’ हा घटक इतरांच्या पालकांसारखा नसतो. तीच तऱ्हा चालकाची आणि बालकाची. प्रत्येकाला बालपणी मिळणारे संगोपन, अनुभव हे वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकामधील ‘पालक’, ‘बालक’ आणि ‘चालक’ यामधील गोष्टी देखील वेगवेगळ्या असतात. हा फरक फक्त प्रत्येकाच्या माहितीतच असतो असे नाही, तो कार्यपद्धतीत देखील असतो.
पण कार्यपद्धतीत फरक म्हणजे नेमके काय? आपल्या स्वभावाची रचना लक्षात घेतली तर ती तीन वर्तुळे असतात. सर्वात वर ‘पालक’ (Parent) वर्तुळ, त्याखाली ‘चालक’ (Adult) वर्तुळ आणि सर्वात खाली ‘बालक’ (Child) वर्तुळ. सामान्यपणे ही वर्तुळे एकमेकाला चिकटलेली असली तरी ती एकमेकांत घुसलेली नसतात.
पालकाची चालकावर मात
पण जेव्हा ‘पालक’ (Parent) वर्तुळ ‘चालक’ (Adult) वर्तुळात घुसते, तेव्हा ते चालकाला झाकोळून टाकते आणि ‘पालक’ हाच ‘चालक’ म्हणून दिसायला लागतो. आपल्या मनातील पालकामध्ये लहानपणी न तपासता साठवलेल्या आदेश, ताकीद, सक्ती, नियम वगैरे गोष्टीच सत्य म्हणून पुढे येत असतात.
इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की पालकात जमा झालेल्या गोष्टी या आईवडील किंवा मोठी माणसे यांनी लहानपणी ताकीद देऊन किंवा बजावून सांगितलेल्या असतात. त्या खऱ्या आहेत का? वास्तवाला धरून आहेत का? हे तपासण्याची क्षमता लहानपणी आपल्यात नसते. आपण जसे मोठे होतो, तसतसे आपण या गोष्टी तपासू लागतो आणि ज्या गोष्टी वास्तवाच्या निकषावर टिकत नाहीत त्या फेटाळून लावतो. पण हे सगळ्याच मंडळींच्या बाबतीत होत नाही. काही मंडळींचे पालक (ते आईवडील असतील किंवा शिक्षक किंवा इतर प्रभावी व्यक्ती असतील) काही ठराविक विषयांवर मूल लहान असताना चौकशीची दारेच बंद करून टाकतात. ती मुलेदेखील पालकांच्या भीतीने चौकशीचे दार उघडण्याची हिंमत करत नाहीत.
‘पालक’ तयार होताना
हे लक्षात घेतले पाहिजे की, मुलाच्या स्वभावातील ‘पालक’ तयार होत असताना मूल लहान असते. ते सुरक्षेसाठी मोठ्या व्यक्तींवर अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी ताकीद देऊन सांगितलेली गोष्ट जरी कानांना व डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी असली तरी पालकांनी सांगितलेल्या गोष्टीलाच चिकटून राहणे बालकासाठी सुरक्षित असते. पालकातील माहिती तपासायलाच न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे वय वाढले तरी आपल्या मनाच्या पालकात जमा झालेल्या विशिष्ट गोष्टीच सत्य म्हणून ती व्यक्ती मांडत राहते. असे पूर्वग्रह असलेल्या व्यक्तीला तर्क आणि पुरावे देऊन कितीही समजावून द्यायचा प्रयत्न केला तरी ती सर्व तऱ्हेचे असंबद्ध प्रतिवाद करून आपलाच पूर्वग्रह सत्य म्हणून सांगत राहते.
यावर उपाय म्हणजे त्या व्यक्तीला हे दाखवणे की आपल्यातील पालकाशी असहमत होणे व आजच्या वास्तवानुसार आपल्यातला ‘पालक’ अपडेट करणे आता धोकादायक नाहीए. थोडक्यात, चालकात घुसलेल्या पालकाला बाहेर काढून त्यांच्या सीमा पूर्ववत करणे हाच त्यावर उपाय आहे.
पालकांचा प्रभाव आणि पूर्वग्रह
इथे लहान मुलावर प्रभाव टाकणाऱ्या मोठ्या माणसांनी मुलांसाठी चौकशीची दारे बंद करणे हा कळीचा मुद्दा आहे. त्याचा परिणाम मूल मोठे झाल्यावर पूर्वग्रहाच्या रूपात दिसतो. मला माझ्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने लोकांत अनेक तऱ्हेचे पूर्वग्रह आढळले. जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक पूर्वग्रहांच्या बरोबरीनेच डावखुरेपणा, मांसाहार, वेषभूषा वगैरे. माझ्यातदेखील काही पूर्वग्रह होते आणि ते तसे असू शकतात, याची स्पष्ट जाणीव (Insight) मला डॉ. एरीक बर्न यांच्यामुळे झाली, हे मला मान्य करायला हवे. आपल्या मनातला पालक (Parent) कसा बनतो, हे डॉ. बर्न यांच्या पुस्तकांतून शिकायला मिळाल्यामुळे मला सतत स्वत:तील पालकाला तपासत राहण्याची गरज कळत गेली.
बालकाचा चालकावरील प्रभाव : “पण ‘पालक’ (Parent) जसा ‘चालका’ला (Adult ला) दूषित करतो, तसा ‘बालक’ (Child) ‘चालका’ला (Adult ला) दूषित करत नाही का?” डॉ. मीनलने प्रश्न केला. ‘सर्वजण मला फसवायलाच बसलेत’, अशा भीतीने जगाकडे पाहणाऱ्या व्यक्तींमधला ‘बालक’ ‘चालका’ला दूषित करत असतो. ते आपल्या भीतीचा वस्तुनिष्ठ विचार करू शकत नाहीत. “आपल्या नातेवाईकांना आपले बरे बघवत नाही म्हणून त्यांनी मला करून घातलेय (करणी केलीय)”, असे सांगणाऱ्या मंडळींमधील ‘बालक’ भीती हीच बाहेरची वस्तुस्थिती असल्यासारखे वागतो.
‘भ्रम’ हे याचे क्लासिक उदाहरण. तेवीस वर्षांची तनुजा घराबाहेर पडत नसे. कारण विचारल्यावर ती म्हणाली, “माझ्यावर वॉच ठेवला जातोय. काल आमच्या घरासमोरून त्यांचा माणूस गेला. तो आमच्या शेजाऱ्यांकडून माझी माहिती घेत होता.” तिला थांबवत तिची आई म्हणाली, “अहो, सेल्समन तो. पण हिला पटतच नाही.” तनुजाला ‘भ्रम’ झाला होता. विकासचा प्रॉब्लेम तनुजापेक्षा वेगळा होता. त्याची तक्रार होती की त्याची निंदानालस्ती करणारे आवाज त्याला ऐकू येतात. त्याला भास होत होते. तनुजा आणि विकाससारख्या केसमध्ये औषधं हाच मुख्य उपाय असतो. त्यासाठी मनोविकारतज्ज्ञांना भेटणे गरजेचे असते.
पालक-चालक-बालकाच्या कार्यपद्धतीत होणाऱ्या बिघाडाचा आणखी एक प्रकार आहे. सानेकाकांच्या उदाहरणाने आपण तो समजून घेऊ. आमच्या शेजारच्या गावातील सानेकाका हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी प्राध्यापकीचा राजीनामा दिला आणि नोकरीचा पुन्हा मोह होऊ नये म्हणून पदवीची प्रमाणपत्रेदेखील जाळून टाकली. पण याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी आर्थिक नियोजन न करता सणक आल्यासारखा निर्णय घेतला. त्यांनी मुलांची शिक्षणे वगैरे कर्तव्ये योग्य तऱ्हेने पार पाडली. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी गावात शाळा उभारण्यासाठी स्वतःला झोकून दिले. शाळेची इमारत बांधताना बांधणीवरच्या गवंड्यापेक्षा त्यांचे शारीरिक कष्ट अधिक असत. पण हा माणूस कौटुंबिक जीवनात मात्र रुक्ष होता. मुलांसोबत पिकनिक किंवा एखादे नाटक बघायला जाणे म्हणजे वेळ फुकट घालवणे, असे ते म्हणत. त्यामुळे प्राध्यापक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून विद्यार्थ्यांना, लोकांना हवाहवासा वाटणारा हा माणूस त्यांच्या स्वतःच्या मुलांना मात्र जुलमी वाटे. असे का होई?
याचे कारण म्हणजे सानेकाकांच्या स्वभावात ‘बालक’ (Child) दिसतच नाही. गम्मत करणारे, खेळणारे, कुतूहल असलेले ‘बालक’ त्यांच्या स्वभावातून गायब आहे. असे का? याचे उत्तर त्यांच्या बालपणात होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले होते. दीड-दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. गरिबीमुळे दूरच्या नातेवाईकांकडे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्या नातेवाईकांनी आश्रय दिला असला तरी त्यांची वागणूक कठोर होती. तिथे त्यांचे आयुष्य बालकामगारासारखे होते. यातून पार पडण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग त्यांनी शोधला, तो म्हणजे आपल्यातील बालकाला (Child ला) ब्लॉक करण्याचा.
जेव्हा जेव्हा ते आपल्यातील बालकाला सैल सोडत तेव्हा तेव्हा त्यांना त्यांच्या आश्रयदात्याकडून कानउघडणी ऐकावी लागे. ते टाळण्याचा मार्ग म्हणजे आश्रयदात्याच्या इच्छेनुसार काम करून त्यांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत राहणे. त्यामुळे त्या आश्रयदात्याच्या आज्ञा त्यांच्यातील ‘पालका’चा भाग बनला ज्याने त्यांच्या ‘चालका’ला देखील दूषित केले. थोडक्यात, त्यांनी आपला ‘बालक’ (Child) ब्लॉक केला होता आणि त्यांचा ‘पालक’ (Parent) त्यांच्या ‘चालका’त (Adult मध्ये) घुसून त्याला झाकोळून टाकत होता. सानेकाकांसारख्या मंडळींना आपल्या घरात आपण नावडतो आहोत, याची जाणीव होते. पण त्यांना त्याचे कारण समजत नाही. ते त्यांना समजावून दिल्याने त्यांना मदत होऊ शकते. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील ‘बालका’चा त्यांनी विचार करावा यासाठी त्यांना उद्युक्त करता येऊ शकते. कदाचित ते त्यांच्यातील कठोर पालकात बदल करू शकणार नाहीत. कदाचित त्यांनी ब्लॉक केलेले त्यांच्या स्वभावातील ‘बालक’ त्यांना आता या वळणावर सापडणार नाही. पण ते त्यांच्या चालकाद्वारे कुटुंबातील व्यक्तींच्या बालकांसाठी आपल्या वागणुकीत बदल करू शकतात.
मनोविकारतज्ज्ञ