अक्षररंग

लहान वय, मोठी उंची

अकरा वर्षांच्या ग्रिहीथाने नऊवारी साडी परिधान करून सह्याद्रीच्या अवघड सुळक्यावर आपला ठसा उमटवला. हा प्रवास केवळ पर्वत सर करण्याचा नाही, तर एका लहान मुलीच्या जिद्दी, साहस आणि स्त्रीशक्तीच्या उदयाचं सुंदर प्रतीक आहे.

नवशक्ती Web Desk

अकरा वर्षांच्या ग्रिहीथाने नऊवारी साडी परिधान करून सह्याद्रीच्या अवघड सुळक्यावर आपला ठसा उमटवला. हा प्रवास केवळ पर्वत सर करण्याचा नाही, तर एका लहान मुलीच्या जिद्दी, साहस आणि स्त्रीशक्तीच्या उदयाचं सुंदर प्रतीक आहे.

शक्तीचा जागर जेव्हा शब्दांतून होतो, तेव्हा डोळ्यांसमोर अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व उभी राहतात. पण जेव्हा एखादी नऊ वर्षांची चिमुरडी अंगात नऊवारी साडी लेवून, कपाळावर चंद्रकोर सजवून सह्याद्रीचे अजस्त्र सुळके सर करते आणि थेट एव्हरेस्टच्या पायथ्याशी आपला ठसा उमटवते, तेव्हा ती केवळ एक मुलगी राहत नाही, तर ती जिद्दीचं मूर्तिमंत प्रतीक बनते. ठाण्यातील घोडबंदर येथे राहणारी, अकरा वर्षांची  ग्रिहीथा विचारे आज अशाच एका साहसी प्रवासाची धनी झाली आहे.

तिची ही यशोगाथा म्हणजे केवळ पर्वतांवरील चढाई नसून, ती एका लहानशा जिवाचा अथांग आकाशाला गवसणी घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ग्रिहीथाचा हा प्रवास सुरू झाला तो २०२१ मध्ये. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी, जेव्हा मुलं बागेत खेळण्यापलीकडे विचार करत नाहीत, तेव्हा ग्रिहीताने पनवेलचा ऐतिहासिक ‘कर्नाळा’ किल्ला सर करण्याचं धाडस केलं. हा तिचा पहिलाच ट्रेक होता. कर्नाळ्याचा तो ‘अंगठ्यासारखा’ दिसणारा सुळका आणि त्याच्या अवतीभवती असलेली ती खोल दरी पाहून कोणाचेही काळीज धपापेल. ग्रिहीथालाही सुरुवातीला थोडी भीती वाटली, पाय थकले, पण तिच्या पावलांमध्ये एक अनामिक जिद्द होती. बाबा, आई आणि बहिणीच्या सोबतीने तिने तो गड सर केला आणि तिथूनच तिची मैत्री डोंगरांशी, वाऱ्याशी आणि आव्हानांशी झाली. एकदा भीतीचा अडसर दूर झाला की, मग आकाशाची उंचीही ठेंगणी वाटू लागते, याचा प्रत्यय ग्रिहीताला लवकरच आला.

ग्रिहीथाच्या गिर्यारोहणाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे तिची ‘नऊवारी’. आधुनिक गिर्यारोहक जेव्हा महागडे गिअर आणि ट्रॅकसूट वापरतात, तेव्हा ग्रिहीथा महाराष्ट्राच्या परंपरेचा सन्मान राखत नऊवारी साडी नेसून कडे चढते. नाशिकातील प्रसिद्ध ‘नवरा-नवरी’ सुळक्यांवरील तिची कामगिरी आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. २५० फुटांहून अधिक उंचीचे हे दोन सुळके, तिथे केलेली रॉक क्लायंबिंग आणि एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर झेप घेणारी झिप लायनिंगची ती थरारक दृश्य अंगावर काटा आणणारी होती. चिमणी क्लायंबिंगसारखे अवघड प्रकार करतानाही तिने कधी हार मानली नाही. डोंगर चढण्यापूर्वी दोन-दोन तास केलेली पायपीट आणि त्यानंतर होणारी ही साहसं तिने आनंदाने पेलली. तिच्यासाठी नऊवारी साडी अडथळा नसून तिची ताकद बनली. सह्याद्रीचे कडे सर करता करता ग्रिहीथाची नजर आता हिमालयाच्या उत्तुंग शिखरांकडे वळली. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे बेस कॅम्प सर करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ग्रिहीथाने अवघ्या १५ दिवसांत हे आव्हान लीलया पेललं. सह्याद्रीतल्या कडक उन्हात आणि घामात डोंगर चढणं वेगळं आणि हिमालयातल्या उणे तापमानात, हाडं गोठवणाऱ्या थंडीत चालणं वेगळं. पण ग्रिहीताने जॅकेटचा भार सहन करत, जड सॅक पाठीवर घेत आणि हेलिकॉप्टरचा गडगडाट, समोरून येणारे याक आणि गाढवांच्या झुंडी यांच्याशी सामना करत एव्हरेस्टचे बेस कॅम्पच्या पायथ्यापर्यंत मजल मारली. तिथे असणारे ते लोखंडी झुलते पूल आणि त्यांच्या खालून वाहणारी अथांग नदी हे दृश्य पाहून भीती वाटणं स्वाभाविक होतं,

पण ग्रिहीथा आता ‘भय’ या शब्दाच्या पलीकडे गेली होती. तिच्यासाठी वरून दिसणारा सृष्टीचा तो अफाट पसारा त्या थकावटीपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. गिर्यारोहण ही केवळ शारीरिक क्षमता नसून ती मानसिक कसरतही आहे. 

ग्रिहीथा सांगते की, चढाई करताना जेव्हा खूप थकवा जाणवतो, तेव्हा ती बाबांशी गप्पा मारत राहते. बोलण्यामुळे थकव्याचा विसर पडतो आणि ती कधी शिखरावर पोहोचते, हे तिलाही समजत नाही. या प्रवासात तिला पवन दादा, दर्शन दादा,  हृषिकेश दादा आणि अक्षय दादांसारख्या अनुभवी गिर्यारोहकांचं मार्गदर्शन लाभलं. तिची ही जिद्द केवळ छंदापुरती मर्यादित नाही; ती तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे. ती सातव्या मजल्यावर राहते, पण सरावासाठी ती कधीही लिफ्टचा वापर करत नाही. सरावासाठी  ग्रिहीथा ८ मिनिटांत एका उंच इमारतीचे ३० मजले चढते आणि खाली येते आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी व्यायामाचा भाग म्हणून ती दिवसातून ३ वेळा आणि आठवड्यातून २ वेळा असे करते. फिटनेससाठी जिममध्ये जाणारी आणि पायऱ्यांचा सराव करणारी ग्रिहीथा खऱ्या अर्थाने ‘उद्याची गिर्यारोहक’ म्हणून घडत आहे. तिची ही कामगिरी केवळ वैयक्तिक राहिलेली नाही, तर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तिने आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे. (तिच्या नावावर १० इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहेत.) शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि मित्र-मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे तिची ही झेप अधिक उंच होत आहे.

मलेशियातील माऊंट किनाबालू सर करताना तिने पाहिलेले ‘व्हिनस फ्लायट्रॅप’ असो किंवा हिमालयातील आमा डाब्लम आणि कुसुम खांगरू या शिखरांची ओढ असो, ग्रिहीथाला आता भूगोलाच्या पुस्तकातील नकाशे प्रत्यक्षात पाहायचे आहेत. भविष्यात तिला जगातील सर्वाधिक देशांची सर्वोच्च शिखरे सर करायची आहेत. असे करून तिला जगात भारताचे नाव उज्ज्वल करायचे आहे. याशिवाय तिला ब्लॅक पीक, फ्रेंडशिप पीक आणि अंतिमतः माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवायचा आहे. ग्रिहीथाचा हा प्रवास एका लहान मुलीच्या स्वप्नांचा प्रवास नाही, तर तो एका जिद्दी स्त्रीशक्तीच्या उदयाचा प्रवास आहे. परंपरा जपत आणि निसर्गाचं भान राखत तिने जे साध्य केलं आहे, ते कौतुकास्पद आहे. वय हे केवळ एक आकडा असतो; खरी ताकद ही तुमच्या स्वप्नांमध्ये आणि ती पूर्ण करण्याच्या जिद्दीमध्ये असते. आज ग्रिहीथाचे पाय जमिनीवर असले, तरी तिची नजर मात्र क्षितिजाच्या पलीकडे असलेल्या उत्तुंग शिखरांवर खिळलेली आहे. तिची ही नऊवारीतील झेप उद्याच्या कित्येक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल.

शब्दांकन- क्रांती गोडबोले पाटील

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक