अक्षररंग

तिचं बाई होत जाणं

तशी उंबरठा ओलांडून, केव्हाच बाहेर पडली आहे ती, फिरवूनही आणलं आहे तिला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

नीरजा

तशी उंबरठा ओलांडून

केव्हाच बाहेर पडली आहे ती.

फिरवूनही आणलं आहे तिला

अज्ञाताच्या प्रदेशातून

तिच्या इवल्याशा बोटाला धरून.

चेहरा नसलेल्या बायकांच्या इतिहासाचा

रंगहीन तुकडा

तिच्या हातावर ठेवताना

ठरवून सांगितले पराक्रम एकादोघींचे.

तेव्हा खरं तर तिला जाणून घ्यायचं होतं

जगणं रंगहीन चेहर्‍यांचं.

एखादी बाई देशाची पंतप्रधान होण्यानं

नेमका काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात?

यासारखे प्रश्नही पडत होते तिला.

स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला

असं म्हणताना,

तिच्या पायात बांधलेला अदृश्य धागा

तिला जाणवत राहतो सतत.

मग धुमसत राहते ती आतल्या आत

त्या पाल्याचा ताण सहन करत

तेव्हा वाटतं

सोडून द्यावं तिला मोकळं

या अरण्यात.

ओळखू दे तिलाच

मुखवट्यांच्या जंगलात दडलेल्या श्वापदांना

होऊ दे ओळख स्वतःची आणि जगाचीही;

पण उगीचच आठवत राहतो

योनिशुचितेच्या कल्पनांनी भरलेला

बाईचा भग्न भूतकाळ.

शेवटी मुलगी आहे

असंही येत राहतं मनात राहून राहून.

आई आणि बाई असण्यातला हा फरक

जाणवत राहतो तीव्रतेनं.

आई का असते पारंपरिक

आणि बाई स्वैर मोकळी

आकाशाला गवसणी वगैरे घालण्याची भाषा बोलणारी?

तिचं हळूहळू बाई होत जाणं

माझ्यातल्या आईपणाला ओलांडून

आता जाणून घ्यायला हवं मला,

कदाचित माझी मलाच ओळख होईल नव्यानं

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस