विशेष
गीतेश गजानन शिंदे
इंदिरा संत यांच्या जयंतीनिमित्त लिहिलेला हा विशेष लेख त्यांच्या कवितांनी जीवनातील अनुभवांना दिलेल्या अर्थाचा, संवेदनांचा आणि आत्मभानाच्या जागृतीचा प्रवास उलगडतो-पावसापासून प्रेमापर्यंत आणि न्यूनत्वापासून साक्षात्कारापर्यंत.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील लेक्चर हॉलमध्ये प्रथम वर्ष भौतिकशास्त्राचा ‘क्वांटम फिजिक्स’चा तास रंगात आलेला. पार्श्वसंगीत म्हणून पावसानंही ठेका धरलेला. ऐन दुपार काळोखलेली. वर्गातले सर्व दिवे सुरू असूनही अंधार गडद होत चाललेला. तास कधी संपतोय असं सर्वांनाच झालेलं. पण त्या दिवशी सर काही माघार घेत नव्हते. शेवटी कोणीतरी धाडसानं सरांना पावसाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. लेक्चर संपलं आणि आमची सुटका झाली.
मित्रांसोबत विद्यापीठाबाहेर कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या बस स्टॉपवर उभा राहिलो. बऱ्याच वेळानं एक बस आली. पण पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि ट्रेनचा पत्ता नव्हता. त्यामुळे आम्ही ठाण्यापर्यंत चालण्याचा निर्णय घेतला. ट्रॅकवरून चालत, घाटकोपरला एलबीएस मार्गापर्यंत आलो. पाण्याच्या प्रवाहात चप्पल हरवली, पण चालणे थांबवता येत नव्हते. दोन-तीन तास चालत चालत, पावसात रस्ता पार करून अखेरीस ठाण्याच्या दिशेने निघालो, वर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. विचारत विचारत एक्स्प्रेस हायवे गाठला आणि पुढे चालायला सुरुवात केली. अर्थात दोन-अडीच तासांपासून भरपावसात चालतच होतो. चालता चालता मनात नकळतपणे इंदिरा संतांची कविता रुंजी घालायला लागली...
‘नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली’
तो दिवस होता २६ जुलै २००५; मुंबईतल्या पावसाच्या रुद्रावताराचा. नववीत शाळेत जरी शिकलो असलो तरी इंदिरा संतांच्या या कवितेचा खरा अर्थ त्या दिवशी मला कळला. त्यातील ‘धिंगाणा’ या शब्दाचा अर्थ मी अक्षरश: अनुभवला. ढग पिऊन जणू काही तर्राट झाले होते नी पावसाचा मुंबईभर धिंगाणा सुरू होता. मुंबई, ठाण्यातल्या कितीतरी बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले. जीवितहानी, वित्तहानी झाली. काही संसार तर पाण्याच्या प्रवाहात कागदी नावेसारखे वाहून गेले. तेव्हा इंदिराबाईंच्या ‘घर माझे चंद्रमौळी’ या ओळीचा अर्थ उलगडला. म्हणजे असे घर ज्याच्या छपरातून किंवा भिंतींमधून चंद्रप्रकाश थेट आत येतो. ते घर जीर्ण, मोडकं आहे. जिथून पावसाळ्यात पाणी गळतं आणि घरात उजेड येण्यासाठी पूर्ण चंद्राची गरज भासत नाही. ज्यातून चंद्रकिरण सहज प्रवेश करतात. ‘दारातली सायली’ हे जणू नाजूकतेचं प्रतीक म्हणून इंदिराबाईंनी वापरलंय. शाळेच्या भितींमध्ये, पाठ्यपुस्तकातल्या मार्कांच्या गणितांमध्ये गुदमरलेल्या कवितेतल्या या प्रतिमा, प्रतीकं अनुभवांच्या शाळेत संवेदनांच्या नेणिवेतून मनात झिरपू लागतात तेव्हा त्यांचा अर्थबोध होतो.
इंदिरा संतांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी कर्नाटकाच्या इंडी या गावात झाला. म्हणजे आज त्या १११ वर्षांच्या झाल्या असत्या. त्यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षकीपेशापासून लेखनाची सुरुवात केली होती. बी.ए., बी.टी.डी. व बी.एड्. या पदवी प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. कालांतरानं त्यांनी स्त्रियांचं भावविश्व कवेत घेणाऱ्या स्त्रीकेंद्री जाणिवांच्या कविता लिहिल्या. भारतीय स्त्रीचं खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितेतून मांडलं. त्यातील स्त्री कधी प्रेयसी होती, तर कधी पत्नी. भारतीय स्त्रीच्या भावना आणि जीवनातील संघर्षाचं चित्रण हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य होय. त्यांच्या कवितांमधून प्रेम, विरह, एकाकीपणा आणि निसर्गाच्या प्रतिमांचा सुंदर व सहज वापर दिसतो. इंदिरा संत यांचं लग्नापूर्वीचं नाव इंदिरा दीक्षित होतं. कवी नारायण संत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर या दाम्पत्याचा ‘सहवास’ या शीर्षकाचा काव्यसंग्रह १९४० साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांना रसिक वाचकांनी भरभरून दाद आणि प्रेम दिले. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहासाठी १९८४ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यांचा ‘मृद्गंध’ हा आत्मचरित्रात्मक ललित लेख संग्रहही प्रसिद्ध आहे. कवी रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संतांच्या काही निवडक कविता संपादित करून ‘मृण्मयी’ या शीर्षकाचा कवितासंग्रह १९८२ साली प्रसिद्ध केला.
महाविद्यालयात असतानाच मी त्यांचे सारे कवितासंग्रह वाचून काढले होते. त्या उमलत्या जाणिवांच्या वयात त्यांच्या किती कविता मला समजल्या हे आता नेमकं सांगता येणार नाही. पण त्यांची शैली मनाला नक्कीच भिडली होती. त्यामुळेच त्यांच्या काही कविता अजूनही माझ्या स्मरणात आहेत. त्यातलीच एक कविता म्हणजे,
‘पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे...’
खरंतर प्रेमात पडण्याचे कॉलेजमधले ते गुलाबी दिवस. आमच्या वेळी ग्रीटिंग कार्ड्सचा आणि चं.गों.च्या चारोळ्यांचा बोलबाला होता. रोझ डे वगैरेला हमखास ग्रीटिंग्स व चारोळ्यांतून भावनांची देवाणघेवाण व्हायची. काही जण पत्रातून तिला आपल्या भावना कळवायचे. कारण तो काळ मोबाईलनं आपल्या मगरमिठीत घेतलेला नव्हता. त्यामुळे लोक इमोजीतून नव्हे तर शाईच्या गहिरेपणातून आपल्या भावना व्यक्त करायचे. याच सर्व भावना इंदिरा संतांच्या या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत. खरंतर आपण पत्र लिहिताना अधिक मोकळं होत जातो आणि समोरचा ते वाचत असताना त्यात नकळतपणे पंचेंद्रियं गुंतली जातात. आता हेच पाहा न, पत्राची घडी उलगडताना प्रथमत: आपल्याला स्पर्शज्ञान होतं. मग अक्षरांवरून नजर फिरते तेव्हा लिपीरेषांमागील भाव दिठीत सामावले जातात. वेलांटीच्या वळणांच्या आरोह-अवरोहांचे स्वर कानात वाजू लागतात. त्यात तिचं खेळकर हसूही दडलेलं असतं. कागदाच्या सुगंधानं आपली फुप्फुसं शुद्ध होतात आणि पत्रामध्ये ठेवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांची चव गुलकंदासारखी जिभेवर रेंगाळते. प्रेमाचे असे किती हळुवार भाव इंदिरा संतांनी त्यांच्या कवितेतून टिपले आहेत.
मध्यंतरी कविमित्र प्रथमेशनं त्याचे वडील कवी किशोर पाठक यांना इंदिरा संतांनी त्यांच्या हस्ताक्षरात दिवाळी अंकाकरिता पाठवलेली ‘भोवरा’ ही कविता शेयर केली. त्याचं पहिलं कडवं होतं,
‘साऱ्या जन्माचा उन्हाळा
मन त्रासते विटते
कसे भोवऱ्यासारखे
शून्य बिंदूला शोधते...’
त्याचं मन इतकं त्रासलंय की संपूर्ण जन्म उन्हाळ्यासारखा खडतर, रखरखीत भासतोय. हे त्रासलेलं मन भोवऱ्यासारखं शून्य बिंदूला शोधतंय. आपण भोवरा जर नीट पाहिलात तर तो ज्या बाजूनं फिरतो तिथं त्याचं टोक निमुळतं झालेलं असतं. एकाच जागी फिरण्यानं मातीच्या ओट्यावर शून्यासारखा एक खळगा निर्माण होतो. जणू काही मनही त्या शून्यत्वात विलीन होतंय अशी भावना कवितागत ‘मी’ची झाली आहे. आयुष्यात सुख-दु:खाचे असे अनेक भोवरे येत-जात असतात. पण आपण निरंतर फिरत राहणं महत्त्वाचं. ही कविता वाचताना मनाच्या गूढ सरोवराच्या तळाशी काय असेल याची उत्सुकता दाटून येते. अर्थबोधाच्या निळाईनं आपले डोळे मिटले जातात नि साक्षात्काराची कमळं त्या सरोवरातून फुलून येतात. इंदिराबाईंच्या या कवितेतली लयही फिरणाऱ्या भोवऱ्यासारखीच मन लुभावणारी आहे.
मला आठवतंय; अकरावी-बारावीत असताना मला माझ्या सावळेपणाचं न्यूनत्व जाणवू लागलं होतं. याच वळणावर इंदिरा संतांची ‘कुब्जा’ ही कविता मला सापडली. त्यामागची अख्यायिका, संदर्भ जर ठाऊक नसतील तर ही कविता कळणं जरा अवघड आहे. सुरुवातीला माझंही तेच झालं. कुब्जा ही कंसाची दासी. परंतु दुष्ट कंसाच्या चाकरीत असूनही ती कृष्णाची मनस्वी भक्ती करत असे. जन्मतःच ती अष्टवक्रा म्हणजे आठ जागी शरीराला कुबड असलेली होती. पण या कुरूप शरीरातही कृष्णमय झालेलं तिचं मन होतं. तिच्या तनामनाच्या तारा कृष्णाच्या नामजपानं सदैव झंकारत होत्या. पुढे कृष्ण जेव्हा कंसवधासाठी मथुरेत आला, तेव्हा त्याच्या जादुई स्पर्शानं तिचं शरीर सरळ झालं आणि तिचा उद्धार झाला. पण हे फार नंतर घडलं. इंदिरा संतांच्या या कवितेत आपल्याला ती अष्टवक्रा कुब्जाच भेटते. कृष्णाचा उल्लेख आला की राधा आणि त्या अनुषंगानं गोकुळ, कदंबवनातील शारद पुनवेच्या नक्षत्रखचित रात्रीतील गोपिकांबरोबरची रासक्रीडा, गोकुळातील कृष्णाचे सखेसोबती या गोष्टी आठवतात. कारण या सर्वांची एक घट्ट वीण आपल्या मनात बसलेली आहे. पण या कवितेच्या पहिल्या दोन ओळींत कृष्णाशी निगडित या सगळ्याचं नातं तोडून टाकलं आहे. इंदिराबाई लिहितात,
‘अजुनी नाही जागी राधा
अजुनी नाही जागें गोकुळ’
गोकुळ आणि राधा दोन्ही अजूनही गाढ निद्रेत आहेत. रात्रीच्या आकाशातील तारका मंद झाल्यात, पण विझलेल्या नाहीत. गोठलेला काळोख क्षितिजावर हळूहळू निवळतोय, पण पहाट झालेली नाही. सर्व आसमंत शांत आहे. अशा या अवेळी पैलतीरावरून त्या केशवाच्या मुरलीचा मंद नादरव कानी येतोय. कुणासाठी ही मुरलीची धून आहे? असा प्रश्न कुब्जेला पडलाय.
‘अशा अवेळीं पैलतिरावर
आज घुमे कां पावा मंजुळ’
रूपानं सुंदर राधा ज्याच्या प्रेमात पडलीय, गोकुळातील गोपिकाही ज्याच्यावर प्राण ओवाळून टाकतात असा तो शाम आपल्यासारख्या विद्रूप स्त्रीला अप्राप्य आहे हे कुब्जेला मनोमन उमगलंय. तरीही तो मन धुंदावणारा मुरलीरव ऐकून तिचं देहभान हरपलंय. भल्या पहाटेचा भणाण वारा, हुडहुडी भरवणाऱ्या थंडीलाही न जुमानता ती यमुनेच्या अर्ध्या पाण्यात उभी राहून मोहिनी घालणाऱ्या पाव्याचे ते बेधुंद करणारे सूर ऐकताना तिची प्रीतिसमाधी लागली आहे. याविषयी किती सुंदर वर्णन इंदिराबाई करतात,
‘मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुलें तनमन’
आपल्या शारीरिक व्यंगाचं आणि कुरूपतेचं भान विसरून कुब्जा कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकताना तनमनानं हरखून गेली आहे. तिचं सर्वस्वच जणू काही त्या सुरांवर तरंगत त्या निळ्या-सावळ्यात विलीन होऊ पाहतंय.
‘विश्वच अवघे ओठी लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव.. हे माझ्यास्तव...’
अशा अवेळी पैलतीरावरून येणारे हे मुरलीचे स्वर गोकुळासाठी नाहीत, राधेसाठी नाहीत आणि गोपिकांसाठी तर नाहीच नाहीत; ते फक्त आपल्यासाठी आहेत या कृतकृत्य करणाऱ्या भावनेनं मंत्रमुग्ध होऊन कुब्जा ते सूर कानात प्राण आणून ऐकतेय. या सगळ्यात तिचा कुरूपतेकडून सुंदरतेकडे होणारा प्रवास इथं इंदिरा संतांनी नेमक्या शब्दांत वर्णन केला आहे. कुरूपतेला दुर्लभ असलेला सौंदर्यप्राप्तीचा क्षण येथे अचूक शब्दांत टिपला आहे. आसमंत व्यापून टाकणाऱ्या या मुरलीरवाचा एकही स्वर निसटू नये यासाठी कुब्जा अवघं विश्वच ओठाला लावून ते सूर पित आहे आणि हे करताना कुरूपतेची भावना लयाला जाऊन त्या ठिकाणी सौंदर्याचं आत्मभान तिला आलं आहे.
राधा जागी नाही, गोकुळही जागे नाही, गोपिकाही निजल्यात अशा वेळी पैलतीरावरून येणारे बासरीचे सूर फक्त आपल्यासाठी आहेत ही अनुभूतीच तिला समाधानी अन् तृप्त करते आहे. हाच कदाचित मेटामॉर्फसिसचा म्हणजे सुरवंटाचं सुंदरशा फुलपाखरात रूपांतरित होण्याचा क्षण. तो क्षण इंदिरा संतांनी कुब्जेच्या प्रतीकातून पकडलाय. न्यूनगंडाची वल्कलं त्यात गळून पडली आहेत आणि आत्मविश्वासाची नवीच त्वचा देहावर चढली आहे. असा साक्षात्कारी क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो; फक्त अवकाश असतो तो क्षण टिपण्याचा.
कविता ही अनेकार्थी असते. म्हणूनच आयुष्याच्या विविध टप्प्यांवर उलगडणारे तिचे अर्थही निराळे भासतात. त्यामुळे इंदिरा संतांची कविता आज इतक्या दशकांनंतरही आपलीशी वाटते आणि नकळत मनातून दाद उमटते- ‘हे माझ्यास्तव.. हे माझ्यास्तव..!’
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत