नोंदवही
नम्रता फलके
लास्लो क्रास्नाहोर्काई या हंगेरियन लेखकास यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सारं काही कोसळत असताना, व्यवस्था कोलमडून पडत असताना त्याकडे कसं पाहायचं, आणि सारं काही संपल्यानंतरही मागे जे काही तगून राहतं त्या निरुद्देश अस्तित्त्वाकडे कसं पाहायचं, याची द्दष्टी त्यांचं लेखन देतं. विचारसरणीची दहशत आणि निरुद्देश भांडवली स्वातंत्र्य या दोघांमध्ये अडकलेलं मानवी अस्तित्त्व याचा धांडोळा त्यांच्या कादंबऱ्या घेतात.
“Everything is over, yet nothing has ended.”
“सर्वस्व नष्ट झाले आहे. तरीही कशाचाही अंत झालेला नाही.”
- लास्लो क्रास्नाहोर्काई,
(बॅरन वेंकेमस होमकमिंग)
या शांत पण निश्चिततेचा राग आळवणाऱ्या ओळीतून, लास्लो क्रास्नाहोर्काई एका अशा जगाचा सूर लावतात, जे स्वतःच्या विनाशानंतरही टिकून आहे; जिथे इतिहास हा अजूनही श्वास घेणारा एक भग्न अवशेष आहे आणि अस्तित्व संपुष्टात आलेल्या पण अजूनही रेंगाळत असलेल्या असह्य तणावाने हे जग ग्रासलेले आहे. लास्लो क्रास्नाहोर्काई यांची पात्रे भविष्याकडे चालत नाहीत, तर साम्राज्यांच्या आणि विचारधारांच्या नाशानंतरचे पडसाद सहन करत; विचारांच्या, भाषेच्या आणि अर्थाच्या भ्रमात दबून जातात. त्यांच्या साहित्याचा विषय एखादी आदर्शवत वाटणारी व्यवस्था शोधणे हा नाही, तर सर्व राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांचं पतन झाल्यानंतर, सर्व काही वितळून गेल्यानंतर उरणाऱ्या पोकळीतून वाचण्याचा प्रयत्न आहे. मागे राहिलेल्या शून्यात तग धरून राहण्याचा प्रयत्न आहे.
या आठवड्यात नोबेल निवड समितीने हंगेरीचे साहित्यिक लास्लो क्रास्नाहोर्काई यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार घोषित केला. पुरस्काराची घोषणा करताना “आकर्षक आणि दूरदर्शी साहित्य कृतींसाठी, जी प्रलयकारी भयाणतेमध्ये देखील कलाकृतीची ताकद अधोरेखित करते” अशा शब्दांत लास्लो यांचा गौरव करण्यात आला, तेव्हा तो फक्त एका साहित्यिकाचा सन्मान नव्हता, तर एका नैतिक, अध्यात्मिक आणि तात्त्विक धैर्याचं ते कौतुक होतं. लास्लो क्रास्नाहोर्काई हा असा लेखक आहे जो वाचकाला सोपं असं काही देत नाही. त्याच्या वाक्यांची लांबी, भाषेची आणि त्यातील विचारांची गुंतागुंत, त्याचे विषय हे सगळं वाचकाला काळाच्या, स्मृतीच्या, राष्ट्राच्या, आणि भाषेच्या अवशेषांतून नेतं. काळोख आणि अनिश्चिततेच्या गर्तेत जन्म घेणारी ‘कठीण’ साहित्यकृती या ‘परीघावर’ नसून त्या साहित्याच्या ‘केंद्रस्थानी’ असल्याचं या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. हा सन्मान अशा साहित्याचा आहे जे आपल्याला थांबायला लावतं, तणावात ठेवतं, कोसळण्याचा सामना करायला भाग पाडतं आणि म्हणूनच ते आवश्यक ठरतं.
हा नोबेल पुरस्कार मध्य युरोपियन साहित्य परंपरेतील एक विशेष स्थान अधोरेखित करतो. काफ्कापासून थॉमस बेर्नहार्डपर्यंत मध्य युरोपियन साहित्य परंपरा मानवी व्यवस्थेतील जटिलता टिपते. नैराश्य आणि विद्रुपतेचा सखोल अभ्यास करते. सोप्या आणि दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या उत्तरांवर या परंपरेचा अविश्वास आहे. लास्लो क्रास्नाहोर्काई यांनी ही परंपरा पुढे नेत त्यात उत्तर आधुनिकतेची मजबूत भर घातली. तरीही, काळानुरूप क्रास्नाहोर्काईचा दृष्टिकोन केवळ प्रादेशिक राहिला नाही. त्यांचा पूर्वेकडील प्रवास, सौंदर्याबाबतचं चिंतन, आध्यात्मिक दृष्टी आणि संकटाचा अनुभव हे सारं त्यांनी केवळ राजकीय व्यवस्था कोसळण्यातूनच नव्हे, तर अस्तित्वाच्या पोकळीतही पाहिलं आहे.
लास्लो क्रास्नाहोर्काईचे साहित्य समजून घेण्यासाठी लास्लो राहतो तो देश, त्याचा मागील सत्तर वर्षांतील इतिहास, राजकीय आणि सामाजिक व्यवस्था समजून घेणं आवश्यक ठरतं. विचारधारांवर आधारित व्यवस्थेला ‘विचित्र, असामान्य आणि असहनीय’ मानणारा लास्लो विचारधारांच्या पतनानंतरचं चित्र ‘सामान्य आणि तरीही असहनीय’ असं का रंगवतो ते समजून घेण्यासाठी हंगेरीच्या राजकीय आणि पर्यायाने आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत डोकावून पाहणं आवश्यक आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर हंगेरी सोविएत युनियनच्या प्रभावाखाली होता. अक्राळ-विक्राळ सोविएत प्रदेश एकाच प्रकारच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेने चालविला जात होता. अनेक दशके चाललेल्या कम्युनिस्ट राजवटीमुळे सामान्य लोकांच्या जगण्याला एक विशिष्ट लय आली होती. सर्वत्र सारख्याच प्रकारची दडपशाही, सर्वसमावेशक संशयी वातावरण आणि एक गूढ, जवळजवळ अध्यात्मिक नैराश्य. अशा अवस्थेत हंगेरी आपल्या छोट्या-मोठ्या गावांसह अनेक दशके तगला आणि अचानक एके दिवशी ही व्यवस्था संपली. सोव्हिएत संघाचा अस्त म्हणजे केवळ एक राजकीय बदल नव्हता, तर तो एक सामाजिक आणि मानसिक भूकंप होता, विशेषतः हंगेरीसाठी. विचारधारेवर आधारित असलेली सोविएत इमारत कोसळली तेव्हा तत्काळ पर्यायी व्यवस्था आली नाही, ना अच्छे दिन आले. आला तो संक्रमणाचा प्रदीर्घ काळ. अनिश्चिततेची अशी खोल दरी जिथं कोणत्याच गोष्टी सत्यात उतरण्याची सुतराम शाश्वती नव्हती, वा नव्या आस्था साकार होण्याची आशा होती. इतकी वर्षं असलेल्या राजकीय बंधनांनीच नव्हे, तर अस्तित्वाच्या थकव्याने देखील हंगेरीला ग्रासले होते. जेव्हा पोलादी सोविएत भिंत कोसळली तेव्हा अनेकांना वाटले की आता धुकं दूर होईल, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि समृद्धी येईल. पण वास्तवात जन्म झाला तो गोंधळाच्या एका नव्या युगाचा. आत्माविहीन भांडवलशाही, उद्देशविरहित स्वातंत्र्य आणि दिशाहीन प्रगती ही या युगाची वैशिष्ट्यं.
हा ऐतिहासिक तुटलेपणा लास्लो यांच्या लेखनात फक्त पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर तो लास्लो क्रास्नाहोर्काईच्या लेखनाचा श्वास बनला आणि अशा काळात लास्लो यांची पहिली कादंबरी आली - ‘सॅटॅनटँगो’. साल होतं १९८५. हंगेरी अजूनही कम्युनिस्ट राजवटीखाली होता! या कादंबरीत एक मृतप्राय सामूहिक शेताचं भकास चित्र रंगविलं आहे, जिथे रहिवासी एका लबाड मसिहाच्या प्रतीक्षेत जगत आहेत, जो कदाचित केवळ एक भ्रम आहे. कथानकाची वर्तुळाकार रचना स्वतःच्या व्यर्थतेत अडकलेल्या एका अशा जगाचे प्रतिबिंब दर्शवते, जिथे कृतींचा कोणताही अर्थपूर्ण परिणाम होत नाही, तर प्रत्येक गोष्ट पुन्हा त्याच ठिकाणी परत येते. सॅटॅनटँगो कादंबरीत क्रास्नाहोर्काई केवळ कथा सांगत नाही; तर तो एक विघटित होत चाललेले जग उभे करतो - अत्यंत बारकाईने. सॅटॅनटँगोमधील भूभाग केवळ भौतिकदृष्ट्या ओसाड नाही, तर तत्त्वज्ञानाच्या पातळीवरही उदासीन आहे. ज्या गावात ही कथा घडते, त्या गावाला खुद्द काळच विसरला आहे, असं वाटत राहतं. न-नैतिकता ही जगण्याचं अंग बनते, जिथे शेतकरी केवळ जगण्याच्या सवयीने दिवस ढकलत राहतात, अफवांनी फसवले जातात. विनाश आणि मुक्ती यातला फरक समजण्याइतपत देखील बौद्धिक आणि मानसिक शक्यता त्यांच्यात उरत नाही.
‘द मेलंकोली ऑफ रेसिस्टन्स’ या त्यांच्या कादंबरीत देखील एका गावात एक रहस्यमय सर्कस येते - एका मृत व्हेलच्या अवशेषासह - जी एका संपूर्ण गावाच्या अस्थिरतेचा आरंभ करते, तर ‘बॅरन व्हेन्कहाइम्स होमकमिंग’मध्ये तो पुन्हा एका लहान गावात येतो, जिथे एका वृद्ध बॅरनचं आगमन संपूर्ण समाजाला भ्रमात टाकतं. बॅरन कोणताही तारणहार नसतो; तो फक्त एक भूतकाळाचा अवशेष असतो. पण लोक त्याला मसिहा समजतात. कारण त्यांना खऱ्या उद्धाराची ओळखच उरलेली नसते. भ्रमांच्या सापळ्यात अडकलेल्या आणि उत्तरांच्या शोधात असलेल्या जगाचं दर्शन घडवणारी ही एक रूपकात्मक कादंबरी आहे.
लास्लो क्रास्नाहोर्काईचं साहित्य सोपं नाही. पण कदाचित हेच त्याचं खरं सामर्थ्य आहे. ज्या राष्ट्राने अधिनायकवाद सहन केला आणि मग जे स्वातंत्र्याच्या भ्रमात अडकून राहिलं, त्या राष्ट्राचा लेखक, असा माणूस ज्याने विचारसरणींची वाढ आणि ऱ्हास पाहिली आहे, त्याच्यासाठी सौंदर्य हे लक्झरी नाही - ती एक शिस्त आहे. त्यामुळे भयानकतेच्या काळातही कलाकृतींतून विद्रुपतेसह माणूस जिवंत ठेवण्याचं काम लास्लो क्रास्नाहोर्काईने केलं आहे. त्यांचं लेखन सुटकेचा श्वास आणि तीव्र स्वरूपाचा अस्वस्थपणा हे दोन्ही घेऊन येतात. कम्युनिझमचा पाडाव झाल्यानंतर राज्याच्या वैचारिक बंधनात शिथिलता आली. सेन्सॉरशिप कमी झाली. पण बाजार भांडवलशाही आणि बहुलवादाकडे (pluralism) झालेल्या संक्रमणाने नवीन चिंताही आणल्या. भौतिकवाद, परकेपणा आणि संस्कृतीचे व्यापारीकरण याबद्दलची चिंता क्रास्नाहोर्काईच्या लिखाणात ठळकपणे दिसते.
क्रास्नाहोर्काईने एकदा म्हटलं होतं की, ‘सॅटॅनटँगो’ आजही चालू शकतं, कारण मूळ स्वभाव बदललेला नाही. जग, समाज व्यवस्था आणि मानवी जीवन मुळात बदललेलं नाही आणि हीच गोष्ट त्यांच्या साहित्याचा गाभा स्पष्ट करते. ऐतिहासिक पार्श्वभूमी बदलते, पण नैराश्य, प्रतीक्षा, आर्तता, उद्ध्वस्त होण, शोध घेणं या मानवी स्थिती सांगणाऱ्या गोष्टी बदलत नाहीत.
साहित्याच्या अभ्यासक आणि आस्वादक