पळपुट्या गुलाब 
अक्षररंग

पळपुट्या गुलाब

झाडं खरंच चालतात की त्यामागे असते एखादी जादू? जयूच्या अंगणातील 'गुलाबरावांची' आणि त्यांना पळवणाऱ्या चित्रक यक्षाची ही रंजक गोष्ट

नवशक्ती Web Desk

कथा

ईशान पुणेकर

झाडं खरंच चालतात की त्यामागे असते एखादी जादू? जयूच्या अंगणातील 'गुलाबरावांची' आणि त्यांना पळवणाऱ्या चित्रक यक्षाची ही रंजक गोष्ट

झाडाला चालता येतं? ते चालत दुसरीकडे जातं? छे ! काहीतरीच काय? असं कसं होईल?

पण असं झालं होतं खरं. जयूच्या अंगणात.

ऐकायचीये गंमत!

जयूच्या घराला छानसं अंगण होतं. छोटसंच. शेजारी आणखी घरं. पुढे आणखी घरं. प्रत्येकाचं आपलं अंगण. त्यांची झाडं.

तिच्या अंगणात मात्र गुलाबाचं एकही झाड नव्हतं. तिने शेजारच्या वीणाच्या अंगणात ते पाहिलं. छानशी गुलाबाची झाडं. त्यावर टपोरे गुलाब. गडद गुलाबी, केशरी, पिवळे, पांढरे असे. काय भारी दृश्य दिसत होतं ते ! किती फुलं ! तीही रंगीबेरंगी.

तिला वाईट वाटलं. आपल्या अंगणात गुलाब नाही ? मग तिने आईचं डोकंच खाल्लं. नुसती भुणभुण लावली.

मग आईने तिच्यासाठी एक गुलाबाचं झाड आणलं. अगदी खास. तसा गुलाब कोणाकडेही नव्हता. तो देशी गुलाब होता. त्याचं झाड चांगलं पाच-सहा फूट उंच वाढतं. त्या गुलाबाचा वासही खूप छान असतो. अगदी गोडसर ! मधुर. आणि त्याचा रंग? अगदी गुलाबी. प्रत्येक रंगाच्या अनेक छटा असतात. वेगवेगळ्या. तशा गुलाबी रंगाच्याही. पण या गुलाबाची छटा अगदी मस्त. मध्यम गुलाबी. तजेलदार ! लहान मुलींना तर तशा रंगाचा फ्रॉकच शिवावासा वाटला असता . इतका छान !

आईने ते रोप अंगणात लावलं. जयूच्या हाताने. त्यावेळी त्यावर एकच फूल होतं. वॉव ! कसलं भारी. तिला तर एकदम भावच चढला. तिच्या मैत्रिणी म्हणाल्या,’ अगं, काय सुरेख गुलाब आहे. कोणाकडेच नाही गं असा !

पण तो गुलाब गळून पडला. झाड झालं भुंडं ! मग पुन्हा नवीन गुलाब काही येईना. मग तिचा त्यामधला रस कमी झाला.

दोन-चार दिवस झाले. एके दिवशी ती अंगणात गेली. तर झाड जागेवर नव्हतं. ते त्याच्या जागेपासून लांब गेलं होतं . ती विचारात पडली. असं कसं? ती पळत आत गेली.

' आई ,आई तू झाड का हलवलंस?' तिने विचारलं.

' मी? नाही गं!' तिची आई म्हणाली.' पण कुठलं झाड?'

भले शाब्बास ! आईचं कामामुळे लक्षच नव्हतं . त्यामुळे जयू कुठल्या झाडाचं बोलतीये तेही तिला कळलं नाही . पण उत्तर तयार. उगीच मुलांना ओरडत असतात .

' अगं गुलाबाचं.'

आईला खूप काम असायची. तिला झाडांकडे पहायचं असायचं. पण बिचारीला वेळच मिळायचा नाही. तर ती कुठून हे करायला. म्हणून ती पुढे म्हणाली ,' अगं, तूच उपटलं असशील. दुसरीकडे लावलं असशील !'

त्यावर जयूला आला राग. ती गेली निघून बाहेर.

दुसऱ्या दिवशी ती उठली आणि अंगणात गेली . झाड अजून पुढे सरकलेलं. मग ती आईकडे गेली. तिला बोलावलं. आईने पाहिलं. ती म्हणाली,' अंगणाच्या मध्ये होतं. पार कडेला गेलंय. कोण करतंय हे ? कोणी मुद्दाम तर करत नाहीये ना ? की मुलांचा खोडकरपणा ? '

आता मात्र जयूला काळजी वाटू लागली. तिला झोप येईना. झोप आली तर स्वप्न. स्वप्नात तेच झाड. एक भूत ते झाड पुढे घेऊन जातंय. रोज. थोडं थोडं. मग तर ते पोचलं वीणाच्या अंगणात. तिथे ते तरारलं. मोठं झालं. त्याला भरपूर फुलं आली. गुलाबी आणि सुवासिक. सगळ्या मैत्रिणी वीणाचं कौतुक करू लागल्या . मग जयूला कसंतरीच झालं .

पण त्या भयंकर भुताच्या हाताने?... किती भयंकर गोष्ट !

दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली . गेली अंगणात. तिला असं वाटलं होतं की झाड जागेवर नसेल . गेलं असेल वीणाच्या अंगणात . पण नाही . ते होतं पुन्हा तिसरीकडेच. पण तिच्याच अंगणात. कोणाचं बरं हे काम?

हे काम होतं चित्रकाचं. तो ते झाड जादूने हलवत होता ! कोण हा चित्रक ?

चित्रक हा एक यक्ष होता. यक्ष म्हणजे कनिष्ठ देवता. ते खोडकर असतात. जादूगार असतात. पण एक होतं. चित्रकाला लहान मुलं आवडायची. त्यांचं दुःख त्याला आवडत नसे. तो त्यांना मदत करायचा . पण अदृश्यपणे ! फिरायचा पृथ्वीवर . दुःखी लहान मुलांना शोधत . कधी हवं ते रूप धारणही करायचा . मुलांना , लोकांना तेव्हा दिसायचासुद्धा .

मग असं असताना ,तो झाड दुसरीकडे का हलवत होता ? जयूला असा त्रास का देत होता?

झाडांकडे लक्ष द्यावं लागतं. त्यांना पाणी घालावं लागतं. अन खतही. त्यांच्याशी बोलावं लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं लागतं. बाळंच असतात ती.

जयू हे काहीच करत नव्हती. आईला तर एवढा वेळ नव्हता. आणि एक गोष्ट. थोडा धीर धरावा लागतो. आपल्याला खूप वाटतं. की झाडाला पटापट फुलं यावीत. पण तसं नसतं. त्यालाही थोडा वेळ लागतो.

म्हणून चित्रक हे सारं करत होता. कशासाठी ? … कळेलच.

त्यादिवशी आईलापण आश्चर्य वाटलं होतं. हे झाड असं रोज रोज पळतय तरी कुठे? आणि कसं?

आईने ते झाड काढलं. एका दिसेल अशा जागी लावलं. त्याला मस्त पाणी घातलं, खत घातलं. ती त्याला म्हणाली,' अरे पळपुट्या, आता एका जागी थांब बरं'. पण ते गमतीने.

जयू होतीच आईबरोबर. ती पहात होती. ऐकत होती. तिला ती कल्पना आवडली.

आणि आता ? जयू झाडाकडे लक्ष देऊ लागली . त्याच्याशी बोलू लागली. गुलाबराव झाले खुश !

चित्रकाला काय - तेच पाहिजे होतं. मग त्याने काय केलं ?...

त्याने त्या झाडाला फुलं आणली. खूप फुलं. सुंदर गुलाबी , मस्त वासाची. बघणाऱ्यांना तर आश्चर्यच वाटू लागलं. जणू काही पुष्पगुच्छच त्या झाडावर ! जयूला खूप आनंद झाला . अन ते पाहून चित्रकालाही . त्याला मुलांचे हसरे चेहरे पहायला आवडत असत . अन नसतील तर तो त्यासाठी जादू करायचा . मुलांना हसवायचा . आनंदी करायचा .

जयू म्हणाली,' थँक्स गुलाबदादा !'.

त्यावर गुलाबदादाही म्हणाला.' थँक्स जयू! ' आणि तिला ते ऐकूही आलं. कसं काय म्हणता? अहो तेही चित्रकाचंच काम ना .

तुम्ही झाडं लावता? त्यांच्याकडे लक्ष देता? त्यांच्याशी लाडाने बोलता? .... बघा हं! नाहीतर चित्रक येईल. तुमची झाडं पळवायला. इकडेतिकडे कुठेही !

Bip499@hotmail.com

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार