डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
उन्हाळ्यात धबधबा आणि तोही मनसोक्त भिजता येईल असा? कोल्हापूर-कोकणच्या सीमेवरील मठगावच्या घनदाट अरण्यात दडलेला हा जलप्रपात आणि तिथला उन्हाळी पाहुणचार, खरंच थक्क करणारा आहे.
मला एकच ठिकाण प्रत्येक ऋतूत जायला फार आवडतं. मागच्या भागात मी कोल्हापूरजवळच्या पाटगाव, मठगाव या दोन गावांचा पावसाळ्यातील अनुभव मांडला होता. त्यावेळी गावं धुक्यात हरवली होती, पावसात न्हाऊन निघत होती. तिथल्या वनराईत गुडूप झालेल्या एका हेरिटेज बंगलोमध्ये मी राहिले होते. तिथून जीपने एका पॉइंटवर गेले होते. तेव्हा गाईडने धुक्यात हरवलेल्या दरीकडे बोट करून सांगितलं होतं की, “तिथे एक धबधबा आहे जिथे फक्त उन्हाळ्यातच जाता येतं.” त्याक्षणी माझा तिथला उन्हाळी ट्रीपचा प्लॅन पक्का झाला होता. पावसाची, हिवाळ्याची मनसोक्त भटकंती झाल्यावर उन्हाळी भटकंतीची तयारी सुरू झाली. एप्रिल, मे दरम्यान मठगावमध्ये जायचा प्लॅन फिक्स झाला.
कोल्हापूर आणि कोकणच्या सीमेवर घाटमाथ्यावर वसलेलं हे गाव आहे. वनराईने समृद्ध आणि शांतता पांघरलेलं असं हे मठगाव. मी रॉयल कॅम्पिंग क्लब या हेरिटेज बंगलोमध्ये राहिले होते. पावसाळ्यात बंगल्यावर, तिथल्या आवारात दाट धुके पसरत होते, उन्हाळ्यात मात्र सकाळच्या वेळचा सोनेरी प्रकाश बंगल्यावर पसरत होता. आवारातील बगीचे, वेलीफुले यांना स्पर्श करून फुलवत होता. तिथल्या व्हरांड्यात बसल्यावर जांभळीच्या झाडावर शेकरू उड्या मारत बागडताना दिसत होते. सगळा परिसर तरोताजा झाला होता.
सकाळी मी तिथल्या शेतातून फेरफटका मारायचं ठरवलं. बंगल्यातून शेताकडे जायला छान पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर सुरुवातीला भातशेतीचा मळा दिसला. पावसाळ्यात इथे भातशेतीची लगबग सुरू होती. आता मात्र वाल, वांगी, टोमॅटो अशा भाज्या लावल्या होत्या. या शेतीच्या बाजूला कोकमाची बाग होती. आमसुली रंगाची गोल गोल कोकम झाडांना मस्त लटकत होती. काही अगदी हाताला येतील अशी होती, तर काही अगदी उंच लागली होती. दोन चार बायका कोकम गोळा करताना दिसत होत्या. त्यादिवशी त्या कोकम सरबतासाठीचा रस करणार होत्या. मी पण त्यांच्यासोबत कोकम वेचायला लागले. काही क्षणासाठी कोकणात आले की काय, असाच भास झाला. कोकणच्या जवळ घाटावर हे ठिकाण असल्यामुळे इथे कोकम येत होती. कोकम गोळा करून बायकांसोबत बंगल्याच्या व्हरांड्यात येऊन बसले. त्यांनी रस बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कोकमाचे वरचे हिरवे देठ काढले. कोकमाचे दोन भाग केले, त्यातला गर काढला आणि कोकमाच्या सालीमध्ये साखर भरली आणि भांड्यात ओळीने रचले. हे भांडं त्या तसंच ठेवतात. जेणेकरून साखर हळूहळू विरघळत जाऊन त्या कोकमाचा आंबटगोड रस तयार होईल. तासाभरात हा आमचा रस तयार करण्याचा उन्हाळी कार्यक्रम झाला.
नंतर तिथल्या माडाच्या झाडीत असणाऱ्या मसाल्याच्या बागेतून फिरले. माझे दुपारचे जेवणही याच बागेत झाडांच्या सावलीत झालं. फणसाची भाजी, उसळ, आंब्याचं लोणचं, फणसाचं लोणचं, फ्रुट सलाड असा बेत होता. हा खादाडी अनुभव सुंदर होता.
मला मात्र उत्सुकता होती ती उन्हाळ्यात प्रवाहित असणारा धबधबा बघण्याची. विश्रांती घेऊन साधारण चार वाजता निघालो. तिथले गाईड मला त्या धबधब्यापर्यंत घेऊन जाणार होते. जीपने आम्ही कोल्हापूरच्या पार टोकाच्या पॉइंटवर पोहोचलो. मागच्या वेळी धुक्यात हरवलेले डोंगर आता अगदी स्वच्छ दिसत होते. दरीत खाली बघितल्यावर हिरवंगार, निसर्गसमृद्ध कोकण दिसत होतं. अगदी घनदाट अरण्याने वेढलेला हा परिसर आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही हिरवाई दिसत होती. ते दृश्य डोळे भरून पाहिलं आणि जी दरी बघितली त्या दरीत उतरायला सुरुवात केली. सुरुवातीचा भाग अगदी उतरणीचा आणि पाय सरकेल असाच होता. हळूहळू बाजूच्या झाडवेलींना धरत उतरले. वरून बघताना खाली जी घनदाट झाडी दिसत होती त्या झाडीत मी होते. थोडं चालल्यावर एक सपाटीचा भाग दिसला. कधी काळी तिथे वस्ती होती. भर जंगलात त्याकाळी लोकं कशी राहत होती हाच प्रश्न डोक्यात आला. आता मात्र सारा परिसर रिकामा आहे. तिथून पुढे चालल्यावर एक मोठं आंब्याचं झाड दिसलं आणि त्याच्याजवळून झरा वाहताना दिसला. धबधब्याच्या पाण्याची धारा तिथूनच वाहत होती. झऱ्यातल्या एका दगडावर बसून सोबत आणलेल्या कोकम सरबताचा आस्वाद घेतला. इथे पोहोचेपर्यंत आम्हाला तासभर तरी झाला होता. झऱ्याच्या बाजूने अर्धा तास चालल्यावर धबधब्यापाशी पोहोचले. पाहते तर धबधबा चांगलाच कोसळत होता. दगडावरून झोकून देऊन पाण्याचा प्रवाह उड्या मारत वाहत होता. भर उन्हाळ्यात इतका प्रवाहीत असणारा धबधबा मी पहिल्यांदाच बघितला. त्याला पाहून मन तृप्त झालं होतं. आता आस लागली होती या स्वच्छ, शुद्ध पाण्यात भिजण्याची. धबधब्याकडे जाणारे उंचेपुरे दगड उतरले आणि धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचले. पाण्याचे उडणारे तुषार सुखावत होते. हळूहळू धबधब्याच्या जवळ गेले आणि त्याच्या धारेखाली अगदी मनसोक्त भिजले. हा उन्हाळ्यातला सुखावह आणि सुंदर अनुभव होता. धबधब्याच्या दगडाला पाठ टेकून उभी राहिले आणि समोर झाडांची, वेलींची सुंदर कमान झालेली दिसली. सूर्याची किरणं त्यातून झिरपत होती. या कमानीतून खाली तळकोकणही दिसत होतं. नेत्रसुखद असं हे दृश्य होतं. निसर्गदेवतेचा आविष्कार मी पाहत होते. समोरून धनेश पक्षी आवाज करत उडत गेला आणि तिथल्या अनुभवाला चारचाँद लागले. धबधब्याची ही धारा आणि बाजूच्या डोंगरातून वाहणाऱ्या अजून काही धारा मिळून कर्ली नदीचा उगम होतो, अशी माहिती मिळाली. सूर्यास्त होण्याच्या आधीच आम्हाला तिथून निघायचं होतं, जंगल पार करून वर जायचं होतं. धबधब्यात मनसोक्त भिजल्यावर परतीची वाट धरली.
पुन्हा वरती जिथून ट्रेक सुरू केला होता त्या पॉइंटपाशी आले. दुसरे गाईड दादा आमच्यासाठी चहा घेऊन आले होते. तिथे थांबून सूर्यास्त बघूनच जायचं असं ठरवलं. दरीच्या कडेला बसून, हातात चहाचा कप घेऊन समोरचं दृश्य पाहत होते. आपण इतक्या खोल दरीत, घनदाट जंगलात उतरलो होतो यावर माझा विश्वास बसेना. समोर आता सूर्यास्ताच्या छटा दिसत होत्या. सूर्य छान केशरी रंगाचा झाला होता. आमच्यावर, आजुबाजूच्या हिरव्यागार डोंगरावर आणि खालच्या कोकणावर त्याचा केशरी प्रकाश हळूहळू पसरत होता. त्याक्षणी फार विलक्षण वाटत होतं. ट्रेक करून आल्यावर जोरात धडधडणारे हृदयाचे ठोके आता स्थिर झाले होते. मन शांत झालं होतं अगदी.
उन्हाळ्यात असा अनुभव घेता येईल याची मी कल्पनाच केली नव्हती. धबधबा, डोंगरदऱ्या, सूर्यास्त पाहून मन अगदी तृप्त झालं होतं. तिथल्या काकूंनी केलेल्या कोकम सरबतची गोडीही अजून जीभेवर रेंगाळत आहे.
जवळचे विमानतळ - कोल्हापूर एअरपोर्ट
जवळचे रेल्वेस्थानक - कोल्हापूर
जवळचे बसस्थानक - कोल्हापूर
स्वत:च्या गाडीने प्रवास करण्यासाठी रस्ता - कोल्हापूर-कळंबा-इस्पुर्ली-गारगोटी-पाटगाव-मठगाव. (८४ किमी)
भेट देण्यासाठी उत्तम काळ - उन्हाळा, हिवाळा. पावसाळा सुरुवातीचा काळ आणि ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस संपतानाचा काळ. पावसाचे प्रमाण इथे पुष्कळ आहे. त्यामुळे चौकशी करून गेलेले उचित राहील.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com