संगीतोपचार : मनाची संजीवनी 
अक्षररंग

संगीतोपचार : मनाची संजीवनी

आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिनाचा मिलाफ मानवी जीवनाला मानसिक शांतता आणि सर्वांगीण आरोग्य बहाल करतो, हे न्यूरोसायन्स आणि सायको-न्यूरो-इम्युनोलॉजीद्वारे सिद्ध झाले आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

डॉ. साक्षी गुजर

आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिनाचा मिलाफ मानवी जीवनाला मानसिक शांतता आणि सर्वांगीण आरोग्य बहाल करतो, हे न्यूरोसायन्स आणि सायको-न्यूरो-इम्युनोलॉजीद्वारे सिद्ध झाले आहे. संगीत आणि योगाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील ऊर्जा चक्रे संतुलित करून गंभीर आजारांवर आणि लहान मुलांच्या वर्तणूक समस्यांवर यशस्वी उपचार करता येतात.

२१ जून हा दिवस योग दिवस, जागतिक संगीत दिवस आणि उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस म्हणून निसर्ग, आरोग्य व सुरांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम आहे. एक संगीत उपचारतज्ज्ञ म्हणून मला प्रकर्षाने जाणवतं की, योग आणि संगीत या मानवी मनाला व शरीराला निरामय आरोग्याकडे घेऊन जाणाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. योगासनं किंवा प्राणायाम करताना जर पाठीमागे संथ संगीत वाजल्यास शरीरातील ताण हलका होऊन मन अधिक एकाग्र होतं; संगीतामुळे ध्यानधारणा सखोल होते आणि योगामुळे सुरांचा अनुभव समृद्ध होतो. हा मिलाफ मानवी जीवनाला मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि सर्वांगीण आरोग्य बहाल करतो.

माझ्या रोजच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मी संगीताची जादू अगदी जवळून अनुभवते. संगीत उपचार हा केवळ विरंगुळा किंवा मनोरंजनाचं साधन नाही, तर ते मेंदूसाठी एखाद्या 'स्पा'सारखं काम करतं. म्हणूनच या शास्त्रोक्त पद्धतीला 'मेंदूचं अभ्यंगस्नान' असंही म्हटलं जातं. न्यूरोसायन्सच्या दृष्टीने विचार केला, तर सामान्यतः माणूस एका वेळी मेंदूचा एकच भाग जास्त वापरतो, परंतु संगीत ऐकताना किंवा त्यावर उपचार घेताना मेंदूचा डावा आणि उजवा दोन्ही भाग एकाच वेळी कमालीचे सक्रिय होतात. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गाण्याची लय आणि आवाज ऐकताना 'ऑडिटरी कॉर्टेक्स' जागृत होतं, तर त्या लयीवर शरीराची होणारी नकळत हालचाल 'मोटर कॉर्टेक्स' नियंत्रित करतं. संगीतातील भावना आपल्या 'लिम्बिक सिस्टीम'ला थेट भिडतात, ज्यामुळे आपली मनःस्थिती क्षणात बदलते. एवढंच नव्हे, तर लक्ष केंद्रित करणे, नियोजन आणि निर्णय घेण्याची क्षमता 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स'द्वारे चालते, त्यालाही संगीत चालना देतं. आपल्या जुन्या आठवणी साठवून ठेवणारा 'हिप्पोकॅम्पस' संगीताच्या एका छोट्याशा सुरानेही जिवंत होतो, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आणि स्मरणशक्ती अधिक दृढ होते.

वैद्यकीय विज्ञानात पीएनआय (सायको-न्यूरो-इम्युनोलॉजी) नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. मानसशास्त्र, मज्जासंस्था आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती या तीनही प्रणाली एकमेकांशी अतूटपणे जोडलेल्या आहेत. जर आपल्या मनावर ताण आला, तर त्याचा थेट विपरीत परिणाम मज्जासंस्थेवर आणि पर्यायाने प्रतिकारक शक्तीवर होतो. इथेच संगीत उपचाराची खरी भूमिका सुरू होते. जेव्हा एखादा रुग्ण उत्तम, शास्त्रीय किंवा त्याच्या आवडीचं संगीत ऐकतो, तेव्हा त्याच्या चित्तवृत्ती आनंदित होतात. हा आनंद मज्जासंस्थेला सकारात्मक संदेश पाठवतो, ज्यामुळे शरीरात 'हॅपी हार्मोन्स'ची निर्मिती होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.

भारतीय योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात सात प्रमुख ऊर्जा केंद्र म्हणजेच चक्रं असतात. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध राग या चक्रांवर थेट आणि सकारात्मक परिणाम करतात. संगीत उपचार करताना आम्ही थेट गाणी ऐकवत नाही, तर सर्वप्रथम रुग्णाशी सविस्तर संवाद साधतो. त्यांची दिनचर्या, वैद्यकीय इतिहास आणि अगदी जन्मापासूनचा प्रवास समजून घेतो. या संपूर्ण निदानानंतर त्यांची कोणती चक्रं असंतुलित आहेत हे शोधून काढलं जातं आणि त्यानुसार त्यांच्यासाठी एक खास वैयक्तिक संगीत आराखडा तयार केला जातो. किमान दोन महिन्यांच्या या प्रक्रियेत विशिष्ट राग, सुरांची कंपनं आणि मंत्रोच्चार यांच्या मदतीने ही चक्रं संतुलित केली जातात, ज्यामुळे रुग्णाच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची पहाट उगवते.

माझ्या प्रवासातील एक जिवंत आणि अत्यंत भावूक करणारा अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. काही महिन्यांपूर्वी एक रुग्ण माझ्याकडे आले होते, ज्यांना तीव्र 'हिप जॉइंट पेन' (कमरेच्या सांध्याचे दुखणे) चा प्रचंड त्रास होता. शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत महागडं आणि वेदनादायी इंजेक्शन हाच एकमेव पर्याय सुचवला होता. आधीच आजाराने थकलेल्या त्या रुग्णाला आणखी एक इंजेक्शन घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यावर नियमित संगीत उपचार सुरू केले. उपचार सुरू होण्यापूर्वी त्यांच्या वेदनेची तीव्रता १० पैकी ९ या असह्य पातळीवर होती. पण आश्चर्य म्हणजे, केवळ काही आठवड्यांच्या संगीतोपचारानंतर आणि चक्र संतुलनानंतर ही तीव्रता १० पैकी थेट २ वर आली. हा कोणताही चमत्कार नव्हता, तर सुरांनी मज्जासंस्थेला दिलेल्या निरामय शांततेचा तो वैज्ञानिक परिणाम होता. आज ते रुग्ण कोणत्याही इंजेक्शनशिवाय आनंदी आयुष्य जगत आहेत.

संगीतोपचाराची ही व्याप्ती अथांग आहे. आजच्या काळात हायपरटेंशन, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीशीनिगडित आजारांवर हे उपचार रामबाण ठरत आहेत. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा त्यांच्या तरुणपणातील किंवा आवडीची जुनी परिचित गाणी ऐकवली जातात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते, त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि ते पुन्हा संवाद साधू लागतात, सामाजिक कार्यात भाग घेऊ लागतात. डिप्रेशन, नैराश्य, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं, पार्किन्सन, तीव्र पाठदुखी किंवा गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांसाठी संगीत हे संजीवनी ठरत आहे. कॅन्सर, पचनाचे आणि आतड्यांचे विकार, श्वसनाचे आजार किंवा डोळे, कान, घसा यांसारख्या कोणत्याही शारीरिक आणि मानसिक व्याधींवर पूरक उपचार म्हणून संगीत आपली तज्ज्ञता दाखवून देतं. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारा निद्रानाश, विस्मरण, ॲसिडिटी यावर तर हे उपचार अत्यंत प्रभावी आहेत.

लहान मुलांच्या विश्वात तर संगीत उपचार कमालीचा बदल घडवून आणतात. मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या, आत्मविश्वासाची कमतरता, अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव यावर संगीत मात करतं. विशेषतः दिव्यांग किंवा विशेष मुलांसोबत (Special Children) काम करताना मला संगीत उपचाराचा अफाट फायदा दिसला आहे. या मुलांना संगीताच्या तालावर 'टर्न टेकिंग' (याचाच अर्थ आपली वेळ येण्याची वाट पाहणे), 'सिटिंग टॉलरन्स' (एका जागी स्थिर बसण्याची क्षमता) आणि भावनिक विकास शिकवणं अत्यंत सोपं होतं. अगदी आयसीयू (ICU) मध्ये मृत्यूशी झुंज देणारे रुग्ण असोत किंवा जन्मानंतर एनआयसीयू (NICU) मध्ये असलेले लहान बाळ, सुरांची मंद कंपनं त्यांच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करतात, हे अनेक संशोधनातून आता सिद्ध झालं आहे व स्वीकारले गेले आहे.

१९८२ मध्ये फ्रान्समधून सुरू झालेली 'जागतिक संगीत दिनाची' संकल्पना आज जगभरात पोहोचली आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये संगीत उपचाराला (म्युझिक थेरपी) वैद्यकीय उपचारांइतकेच महत्त्व असले, तरी रागांच्या उपचारात्मक मूल्यांचा समृद्ध वारसा असूनही भारतात याबद्दल पुरेशी जागरूकता नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि स्क्रीनच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी 'डिजिटल डिटॉक्स' म्हणून संगीत उपचाराकडे वळण्याची मोठी गरज आहे.

sakshigujar999@gmail.com

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी