लाटांच्या पलीकडचं निवती 
अक्षररंग

लाटांच्या पलीकडचं निवती

समुद्राकडे पाहताना आपल्याला दिसतात त्या लाटा; पण समुद्रावर जगणाऱ्यांना त्याच लाटांमध्ये दिसत असतो उद्याचा दिवस. निवतीच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर ही जाणीव अधिक तीव्र झाली. सकाळच्या सोनेरी किरणांपासून संध्याकाळच्या डॉल्फिन्सपर्यंत आणि बंदरातील माशांच्या लिलावापासून निखाऱ्यावर भाजलेल्या बांगड्यापर्यंत, निवतीची ही भटकंती निसर्गाइतकीच माणसांच्या जगण्याचीही होती.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

समुद्राकडे पाहताना आपल्याला दिसतात त्या लाटा; पण समुद्रावर जगणाऱ्यांना त्याच लाटांमध्ये दिसत असतो उद्याचा दिवस. निवतीच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर ही जाणीव अधिक तीव्र झाली. सकाळच्या सोनेरी किरणांपासून संध्याकाळच्या डॉल्फिन्सपर्यंत आणि बंदरातील माशांच्या लिलावापासून निखाऱ्यावर भाजलेल्या बांगड्यापर्यंत, निवतीची ही भटकंती निसर्गाइतकीच माणसांच्या जगण्याचीही होती.

ऑक्टोबर महिन्याची चाहूल लागली की भटकंतीसाठी मन एखाद्या समुद्रकिनारी धावतं. उधाणलेला समुद्र हळू हळू शांत होत जात असतो. मासेमारी सुरू झालेली असते. समुद्रावर स्वार झालेल्या रंगीबेरंगी होड्या पाहत वेळ कसा जातो ते कळतही नाही. मला स्वतःला तळकोकणातले समुद्रकिनारे आवडतात. दोन वर्षांपूर्वी मी निवती किनारी गेले होते. निवती बंदर असलेला किनारा वेगळा आणि किल्ले निवती वेगळा.

तर मी बंदर आणि माश्यांचा लिलाव असणाऱ्या निवतीची भटकंती केली तीही सरत्या ऑक्टोबरमध्ये. लांबलचक समुद्रकिनारा, पसरलेले बॅकवॉटर, त्याच्या कडेने असणारी भातशेती आणि बंदर असे टुमदार गाव आहे निवती. तिथे राहण्यासाठी होमस्टे आहेत. मी जिथे राहिले होते तो 'ओशन व्हाइब्स होमस्टे' किनाऱ्याला लागूनच होता. त्यामुळे सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉकसाठी समुद्रकिनारी गेले. पाहते तर समुद्राच्या बाजुच्या कड्यावरून सूर्य वर येत होता. त्याची सोनेरी किरणं किनाऱ्यावर पसरत होती. सूर्यदेवाचे दर्शन घेऊन कड्याच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. निवतीचा हा किनारा अगदी लांबलचक असल्यामुळे या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला मला २० मिनिटं लागली. पण पोहोचल्यावर पाहते तर कमालीचा सुंदर नजारा दिसला. टोकावर उभं राहून पाहिलं तर उजव्या बाजूला सुंदर असं बॅकवॉटर आणि डाव्या बाजूला समुद्र. समोर श्रीरामवाडी गाव. बॅकवॉटरमध्ये शेकडो होड्या लावल्या होत्या. तो रंगीबेरंगी नजारा फोटोग्राफी करणाऱ्याला भुरळ पाडेल असाच आहे अगदी. जिथे हा पॉइंट होता तिथे उभी राहून मी समुद्र आणि बॅकवॉटर नजरेच्या एका टप्प्यात पाहू शकत होते. बॅकवॉटरकडून होड्या समुद्राच्या दिशेने यायच्या आणि स्वार होत मासेमारीसाठी जायच्या. होडी जाईल तशी मान डावीकडून उजवीकडे वळवत, पार होडी समुद्रात लांब जाईपर्यंत मी पाहत रहायचे. नुकतीच एक होडी मासेमारी करून आली होती. पुष्कळ बांगडे सापडले होते. जाळीतून बांगडे वेगळे करण सुरू होतं. आता हे बांगडे पुढे बंदरावर लिलावाला जातील.

त्यानंतर चालत मी निवती गावामध्ये गेले. किनाऱ्याला समांतर रस्ता गेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने घरं वसली आहेत. काही कौलारू आहेत, काही नवीन बांधणीची. पण आपलं अंगण, माड पोफळी राखून आहेत. किनाऱ्यापासून थोडी लांब भातशेती आहे. भातकापणी वेळी पाऊस आला होता त्यामुळे खूप नुकसान झालं होतं. तिथल्या एका घरात भात झोडणी सुरू होती. तिथेच काथ्यापासून पायपुसणी काही स्त्रिया बनवत होत्या.

सकाळचा फेरफटका मारून मी निवती बंदराकडे गेले. जशी जशी बंदराकडे जात होते तशी गर्दी दिसू लागली. माणसं पिशव्यातून मासे घेऊन घराकडे परतत होती. काही मासे आइस बॉक्समध्ये भरून टेम्पोमध्ये भरले जात होते. बंदर जसं जवळ येऊ लागलं तसा आवाज चढत जात होता. माश्यांची नाव आणि त्यांचे आकडे कानावर पडत होते. काही स्त्रिया बुट्टीभर बांगडे, बुट्टीभर मांदेली, सुळे, शिंपले लिलावात खरेदी करून गावातल्या, कुडाळतल्या तिठ्यावर मासे विक्रीला जात होत्या. आम्हीही बांगडे आणि पापलेट खरेदी केले. आमच्यासोबत होमस्टेचे मालक सोबत असल्यामुळे उत्तम दर्जाचा मासा मिळाला. रात्री एक वेगळ्या पद्धतीचा बांगडा करून दाखवतो असे ते म्हणाले. दुपारी जेवायला पापलेट फ्राय केला होता. जेवण अगदी झकास होतं पण आतुरता मात्र रात्रीच्या बांगड्याची होती.

संध्याकाळी होमस्टेच्या खाली असणाऱ्या सिट आऊट एरियामध्ये येऊन बसले. सूर्य अस्ताला जात होता. आणि त्यावेळी समोर एक अद्भुत नजारा दिसला. समुद्रात होडी घेऊन न जाताही, केवळ खुर्चीत बसून डॉल्फिन्स समोर दिसत होते. डॉल्फिन्स असे दिसतात त्यामुळे दुर्बिण ठेवली होती. दुर्बिण घेऊन पाहिलं तर त्यांची कांती अशी चकचकत वर यायची आणि समुद्रात गुडूप व्हायची. अविस्मरणीय क्षण होता तो अगदी. असे इतक्या जवळून डॉल्फिन दिसतील याची कल्पनाही केली नव्हती.

अंधार पडू लागला तसे काका सिट आऊट एरियामध्ये आले. ते सांगत होते की, ते दोन दोन, तीन तीन रात्र मासेमारीसाठी बोटीत राहायचे. सोबत केवळ भात आणि कोळशाची शेगडी असायची. त्यांचा बोटीवरचा आहार म्हणजे भात आणि मासेमारी करताना सापडलेले मासे. कोळशाचा शेगडीवर भाताची पेज करायचे आणि निखाऱ्यावर मासे भाजून खायचे. ते बोटीवर जसा मासा करायचे तसा बांगडा ते करून दाखवणार होते. हातात नारळाच्या सोडणी (सालं), कोळसा घेऊन आले. शेगडीत ठेवून ते चांगले फुलवले. नंतर ते बांगडे घेऊन आले. बांगडे काहीही मसाला न लावता, मॅरिनेशन् न करता तसेच त्या निखाऱ्यावर ठेवले. आलटून पालटून, निखाऱ्याला वारा देत बांगडा खरपूस भाजला जात होता. व्यवस्थित भाजल्यावर काकांनी अगदी अनपेक्षित गोष्ट केली. भाजलेले बांगडे मिठाच्या पाण्यात बुडवले आणि serve केले. मच्छीमार लोक बोटीवर असताना असेच मासे भाजायचे आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यात बुडवायचे आणि लागलीच भाताच्या पेजेसोबत खायचे. इथे पर्यटकांना देताना ते घरून मिठाचे पाणी करून आणतात आणि त्यात बुडवून तो भाजलेला मासा सर्व्ह करतात.

मी बांगड्यावरची करप काढली आणि मासा खायला सुरुवात केली. भाजका स्वाद माश्याला येत होता आणि बांगड्याची चव लागत होती. केवळ मिठाचा स्वाद त्या बांगड्याला होता तरीही तो उत्तम लागत होता चवीला. कित्येक दिवस बोटीवर मच्छिमार घालवतात. त्यांच्या आहारात काय असेल हा विचारही कधी केला नव्हता. पण या भटकंतीत मच्छीमारांच्या जगण्याची आणि आहाराची झलक दिसली.

  • जवळचे रेल्वेस्थानक - कुडाळ

  • जवळचे बस स्टँड - कुडाळ, मालवण

  • एअरपोर्ट - चिपी

  • स्वतःच्या गाडीने गेल्यास उत्तम.

  • रेल्वे स्थानक किंवा बस स्टॉपवरून रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष