अक्षररंग

एकना दिम तोकना, कत्था दिम डंडी...

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार यावर्षी २२ भाषांमधील तरुण लेखक-लेखिकांना मिळाला आहे. यातील एक नाव झारखंडमधील कवयित्री पार्वती तिर्की यांचे आहे. कुडूख आदिवासी संस्कृतीचं भावजीवन, त्यांचं सांस्कृतिक संचित आणि त्यांचा संघर्ष त्यांच्या काव्यातून व्यक्त होत आहे. आकाश आणि धरतीमधील समता, मोहांच्या फुलांचं काळासोबतचं नातं, वाघासोबतची दोस्ती आणि...

नवशक्ती Web Desk

दखल

भरत यादव

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार यावर्षी २२ भाषांमधील तरुण लेखक-लेखिकांना मिळाला आहे. यातील एक नाव झारखंडमधील कवयित्री पार्वती तिर्की यांचे आहे. कुडूख आदिवासी संस्कृतीचं भावजीवन, त्यांचं सांस्कृतिक संचित आणि त्यांचा संघर्ष त्यांच्या काव्यातून व्यक्त होत आहे. आकाश आणि धरतीमधील समता, मोहांच्या फुलांचं काळासोबतचं नातं, वाघासोबतची दोस्ती आणि कुडूख समूहाचं गाण्यासोबत असलेलं नातं अशा अनेक गोष्टी त्यांच्या कवितेतून आपली गोष्ट सांगतात.

कवितेच्या माध्यमातून मी बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. या अशा संवादामधूनच विविध जनसमूहांच्या वेगवेगळ्या लोकसंस्कृतींमध्ये समन्वय आणि विश्वासाचे नाते तयार होते. या जनसमूहांचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षासाठी आणि परस्परसंवादासाठी माझे लेखन आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार हा त्या संघर्षाचा आणि संवादाचाच सन्मान आहे. आणि म्हणूनच तो माझ्यासाठी आनंददायी आहे.”

हे मनोगत आहे झारखंडमधील आदिवासी युवा कवयित्री डॉ. पार्वती तिर्की यांचं. अलीकडेच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारांमध्ये त्यांच्या ‘फिर उगना’ या हिंदी कवितासंग्रहाचा समावेश आहे. हिंदी साहित्यामधील एक वेगळा स्वर म्हणून त्यांच्या कवितांकडे पाहिलं जातं. त्यांच्या कवितांमधून समोर येणारी आदिवासींची जीवनदृष्टी, निसर्ग आणि सांस्कृतिक परंपरा या गोष्टी मुख्य प्रवाहातील साहित्यासाठी नव्याच आहेत. पार्वती या झारखंड राज्यातील कुडूख या आदिवासी जमातीमधील आहेत.

या सन्मानामुळे आपला आत्मविश्वास वाढला असून आदिवासी बोली, संस्कृती यांच्यावर होत असलेल्या वाढत्या संकटांना भिडण्यासाठी बळ मिळालं असल्याचं त्या सांगतात.

पार्वती यांचा जन्म झारखंडमधील गुमला या जिल्ह्यातला. याच जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, तर काशी हिंदू विद्यापीठामधून त्यांनी हिंदी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. आपल्या शिक्षणामधून त्यांनी आदिवासी जगण्याशी आणि संस्कृतीशी असलेला आपला सहसंबंध कायम ठेवला. ‘कुडूख आदिवासी गीत : जीवनराग आणि जीवनसंघर्ष’ हा विषय घेऊन पीएचडी पूर्ण केली. गीतं गातच जगणाऱ्या आदिवासी विश्वाने त्यांना पारंपरिक लोकगीतांची आणि गाण्यांची गोडी लावली. आपली तीच आवड त्यांनी अभ्यासाच्या क्षेत्रात उभी करत गीतांच्या शब्दांना आणि सूरांना आदिवासी जगण्यातील संघर्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला. अभ्यासाच्या पलीकडे त्यांच्या मनातील खळ‌बळ त्यांच्या कवितांमधून-कथांमधून उमटू लागली. सध्या त्या रांची विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रामलखन सिंह यादव महाविद्यालयातील हिंदी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

कुडूख आदिवासी समाजातील स्त्री ही कणखर आहे. बळकट आहे. धानाची लावणी करताना असो किंवा गाणी म्हणताना असो, स्त्रीच पुढे असते. पुरुष तिच्यामागे असतो, शेतीकामात आणि गाणी म्हणतानासुद्धा. आदिवासी परंपरेत स्त्री कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही. उलट ती झाडावर चढलेली दिसेल, ओझी वाहताना दिसेल, बाजारात रानभाज्या-रानफळे विकताना दिसेल. तथाकथित पुढारलेल्या समाजाने आदिवासी समाजाकडे पाहण्याचा आपला पूर्वग्रहदूषित आणि पारंपरिक दृष्टिकोन आता बदलायला हवा. शिक्षण, ज्ञान, संपन्नता यांच्या व्याख्या नव्याने समजून घ्याव्यात. आदिवासी समाज हा पृथ्वीवरील आदिम लोकशाही मानणारा समाज आहे, म्हणून त्यांनी लोकशाही शिकण्याची गरज नाही, उलट त्यांच्याकडूनच तथाकथित सभ्य समाजाने लोकशाही शिकून घ्यायला हवी. आदिवासी जगण्यात सामूहिकपणे केलेली शिकार ही गावात समान हिश्शात वाटली जाते. कुठलीही आदिवासी व्यक्ती गाण्यांवर, गीतांवर आपला वैयक्तिक हक्क, अधिकार सांगत नाही. आदिवासी गाणी ही आदिवासींची सामूहिक निर्मिती असते आणि त्यांच्यावर सर्वांचा समान हक्क राहतो. ही गाणी पिढ्यान‌्पिढ्या समूहाने गायली जातात. मौखिक परंपरेच्या माध्यमातून आदिवासी गीतांचं हस्तांतरण होत राहातं. ही सामाजिकता त्यांना गीतांमधून मिळते. अवतीभवतीच्या वातावरणातून मिळते. कारण गीतांचं हस्तांतरण हे निव्वळ गीतांचं नसतं. ते एका अर्थाने सामाजिक मूल्यांचंच हस्तांतरण असतं.

कुडूख आदिवासींमध्ये ‘आखडा’ असतो. ‘आखडा’ म्हणजे आदिवासींचं सामूहिक केंद्र. इथे गायली जाणारी गीतं ही समूहाने गायली जातात. एकल गीतांची परंपरा आदिवासींमध्ये नाही. गाताना, नाचताना त्यांचा होणारा सराव हा समूहात राहण्याचाच सराव असतो. धानलावणी असो किंवा शेतातली अन्य कामं असोत, आदिवासी एकत्र येऊन सगळी कामं करीत असतात. सर्व आदिवासी गावकरी एकत्र येऊन संपूर्ण गावातल्या जमिनीवर लावणी करतात. आपल्यापुरता विचार ते कधीही करीत नाहीत. म्हणूनच स्वतःला आधुनिक आणि प्रगत मानणाऱ्यांनी आदिवासींचे असे अनेक गुण शिकले पाहिजेत. आदिवासींना निसर्गाचं ज्ञान आहे, हवामानाचं गणित त्यांना कळतं, माती-पिकं यांचीही त्यांना सखोल माहिती असते. म्हणूनच आजच्या शिक्षणपद्धतीच्या मापदंडाने आदिवासींच्या ज्ञानाला जोखणं चूक आहे. पार्वती तिर्की हेच सगळं आपल्या कवितांमधून व्यक्त करतात.

‘पृथ्वीच्या दिशेने’ या आपल्या कवितेत त्या लिहितात,

“पृथ्वीच्या दिशेने

अखंडाची परिक्रमा करणाऱ्या

शांतताप्रिय लोकांकडे

त्यांच्या पूर्वजांनी गाणी सोपवली,

त्यांनी गाणी गात गात

धरित्रीवर सहजीवन निर्माण केले,

गाणी गाणाऱ्या या समाजाने

पृथ्वीची परिक्रमा करताना

आकाश आणि धरतीमध्ये

समता स्थापन केली,

नंतर त्यांनी आपल्या नृत्य आणि ताल

यांनी धरतीला आश्वासन दिलं,

की मनुष्य कधीही त्या पाखरांचा

व्यापारी होणार नाही,

ज्यांनी त्याला गायला शिकवले,

जे त्याच्या गेय बोलीचे

आदिम शिक्षक होते...’’ (मराठी अनुवाद)

झारखंड राज्यात सुमारे सतरा लाख कुडूख आदिवासींची संख्या आहे. कुडूख समाज हा तिथला गाणारा समाज मानला जातो. कुडूख आदिवासींच्या गाण्यातून संस्कृती, परंपरा, प्रेम, विद्रोह अशा अनेक विषयांचं आणि भावभावनांचं दर्शन घडतं.

रांची शहराला आधी ‘रिची’ संबोधलं जायचं. त्याचा अर्थ एक चिमणी असा होता. चिमणीसारखं स्वच्छंद राहणारे गाव असं स्वरूप असलेल्या रांचीमध्ये ब्रिटिशांनी उभारलेल्या तुरुंगाला नुकतीच दीडशे वर्षं पूर्ण झाली आहेत. भांडवलशाही व्यवस्थेने लादलेल्या तुरुंग आणि अशा तत्सम गुलामीच्या कल्पना आदिवासी समाज झुगारून लावतो. आदिवासींचं सामाजिक जीवन सध्याच्या काळात अनेक तऱ्हेनं छिन्नविच्छिन्न केलं जात आहे. त्याचे पडसादही पार्वती यांच्या गीतांमधून उमटतात. गाण्यांमधून त्या आपली भूमिका व्यक्त करतात.

रे भावा! (लकडा)

“तू का माझी वाट अडवतोस?

मी तुझाच भाऊ आहे,

जंगलातून जाताना

वाघ समोर आला असता

कुणीतरी असे म्हणाले!

मग

वाघाने त्याची वाट

कधी नाही रोखली

तेव्हापासून तो मनुष्य

आणि वाघ

एका कुळाचे बनले...”

लकडा म्हणजे वाघ. कुडूख आदिवासींचे हे एक टोटेम-कुलचिन्ह आहे. या वाघाबरोबरचं पर्यायाने जंगलाबरोबरचं, निसर्गाबरोबरचं कुडूख आदिवासींचं नातं पार्वती स्पष्ट करत आहेत. मानवप्राणी आणि प्राणी यांचं सहजीवन त्या सांगत आहेत. आपण जंगलातल्या प्राण्यांना आपलं भाऊ मानलं, आपल्यातीलच एक मानलं तरच दोघांचं सहजीवन शक्य आहे, हे पार्वती या कवितेतून सांगत आहेत.

आपल्याला आदिवासी समाजजीवनातूनच कविता लिहिण्याची प्रेरणा मिळते, जंगल-झाडं-नदी-चंद्र-तारे आणि स्त्रीजीवन हे विषय आपल्या कवितांमधून आपसूक व्यक्त होतात, हे त्या आवर्जून सांगतात.

कुडूख बोलीतील एक गाणे आहे. त्याचा आशय पुढीलप्रमाणे,

“काळ निघून चालला आहे,

मोहाच्या फुलांचे गुच्छ तरी पाहा,

कुण्या पोरीच्या केसाच्या अंबाडाच वाटतोय,

सकाळी फुलतो, सायंकाळी गळून पडतो,

काळ निघून चालला आहे असे वाटतेय...”

हा असा निघून जाणारा काळ पार्वती तिर्की आपल्या शब्दांमध्ये पकडत आहेत.

अनुवादक आणि मुक्त पत्रकार

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video