अक्षररंग

स्त्री स्वातंत्र्याचा स्वतंत्र शोध घेणारी लेखिका

ठाणे इथं नुकतंच महिला साहित्य संमेलन झालं. सानिया त्याच्या अध्यक्ष होत्या. अर्थात हे एक निमित्त. एरवी सानिया वाचायला, समजून घ्यायला वाचक म्हणून आपण नेहमीच उत्सुक असतो. या अशा उत्सुकतेनेच सानिया यांच्या लेखन प्रवासाचा घेतलेला हा अल्प मागोवा.

नवशक्ती Web Desk

विशेष

प्राची बापट

ठाणे इथं नुकतंच महिला साहित्य संमेलन झालं. सानिया त्याच्या अध्यक्ष होत्या. अर्थात हे एक निमित्त. एरवी सानिया वाचायला, समजून घ्यायला वाचक म्हणून आपण नेहमीच उत्सुक असतो. या अशा उत्सुकतेनेच सानिया यांच्या लेखन प्रवासाचा घेतलेला हा अल्प मागोवा.

''दूर राहण्यातून अंतरं घडत जातात. तरीही थोडंफार काही ऋण? चांगल्या दिवसा-क्षणांचं?” सानिया असं काही आपणही जगताना अनुभवलेलं लिहितात. त्यांच्या लेखनात उगाचच आठवणींचे कढ आणि आंतरिक उमाळे नसतात. नायकाच्या आठवणीने उदास होऊन झुरत राहणं, रडत राहणं असं काहीही त्यांच्या नायिका करत नाहीत. जगताना त्यांचं असं काही होत नाही. त्यांच्या नायिकांना नावं असतात, पण आडनावं नाही. त्यांच्या नायिका शिकलेल्या, शहरी, निमशहरी भागात राहणाऱ्या, कधी कमावणाऱ्या, कधी घरी राहणाऱ्या असतात. पण त्या सगळ्याच स्वतःचं ठाम आणि स्वतंत्र मत असणाऱ्या आणि मुख्य म्हणजे विचार करणाऱ्या असतात.

सानिया साधारण १९७० च्या उत्तरार्धात लिहू लागल्या आणि लिहिता लिहिता त्यांची वाट जणू त्यांनाच सापडली, असं म्हणावं लागेल. ‘शोध’ या १९८० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या कथा संग्रहापासून ‘सुरुवातीचे दिवस’ या २०२० साली प्रकाशित झालेल्या चौदाव्या कथासंग्रहापर्यंत झालेला तब्बल चार दशकांचा हा प्रवास. सानिया यांच्या या विचारी, ठाम, जबाबदारीने वागणाऱ्या, स्वतंत्र विचार असणाऱ्या नायिका वाचत वाचतच आमची पिढी मोठी झाली आहे.

गौरी देशपांडे यांनी लिहिलेल्या आणि जणू परीकथा वाटावी इतक्या वेगळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक वातावरणातल्या स्त्रिया वाचकांना एका वेगळ्या, मुक्त जगाची भुरळ पाडत होत्या. पण गौरीच्या नायिका वाचताना ‘आपण अशा नाही’ किंवा ‘आपण अशा होऊ शकणार नाही’ असं कुठेतरी मनात डोकावून जात असे आणि मग नकळतपणे तिच्या कथा आणि आपण यात एका हाताचं का होईना पण अंतर पडत जाई. सानिया यांच्या कथांच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं होतं. कारण त्यांच्या नायिका एकीकडे आमच्यासारख्या घरातल्या वाटतील अशा बायका होत्या. पण तरीही त्या अनोळखी होत्या आणि हे नवखेपण त्या केवळ पुस्तकातल्या होत्या म्हणून नाही आहे, हे वाचकांना त्यांच्या कथा वाचतानाच आकळत होतं. म्हणजे सानिया आमच्यासारख्या वाचकांना त्यांच्या विचारी आणि विवेकी नायिका वाचताना विचार करायला शिकवत होत्या, अगदी आमच्याही नकळत आणि वाचक म्हणून हे फारच अप्रूप वाटणारं होतं. त्या आम्हाला काहीतरी समजावून सांगत होत्या, काहीतरी महत्त्वाचं, आमच्या कामी येईल असं, जणू त्या आमचं समुपदेशन करत होत्या.

त्या आम्हाला आमच्या जगण्याच्या परिघात आणि अवकाशात नसलेलं स्त्रीचं एक वेगळं आयुष्य नेमकं चिमटीत पकडून दाखवत होत्या. कौटुंबिक नात्यांचे पदर अगदी वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवत तर होत्याच, पण त्या नात्यांमधल्या सांदी कोपऱ्यातल्या कित्येक अंधाऱ्या जागांवर प्रकाश देखील टाकत होत्या. कारण त्यांच्या कथांमधली माणसं ही माणसं म्हणून वावरत, वागत होती. त्या व्यक्तींचे त्यांच्या कुटुंबातले कौटुंबिक स्थान, त्यांचं बाई किंवा पुरुष असणं, त्या कमवत असणारा किंवा नसणारा पैसा हे या कथांमध्ये कुठेही नेहमीच्या ढोबळ पद्धतीने, समजुतीने, आकलनाने मांडलेलं नव्हतं. म्हणजे या कथांमध्ये मानवी नाती, त्यातले गुंते, मानवी स्वभाव, जगण्याच्या पद्धती, आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन नव्हता का? तर अजिबात नाही, तो होता. उलट त्यांचा या सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा आपला एक स्वतंत्र आणि सार्वभौम असा वेगळाच दृष्टिकोन होता. सानिया यांनी हे सगळं एकाच वेळी उत्कटतेने आणि दुसऱ्याच क्षणी कमालीच्या तटस्थतेनं हाताळलं आहे. अगदी एका वाक्यातच म्हणायचं झालं तर ‘माणसांनी विवेकनिष्ठ असणं म्हणजे नक्की काय असतं?’ हे मराठी कथेच्या वाचकांना तरी सानिया यांच्या इतक्या ताकदीनं इतर कोणत्याही लेखकाने क्वचितच दाखवलं असेल.

एका अर्थाने बघितलं तर लेखक वाचकांची पिढीच घडवत असतात. सानिया तर गेली चार दशकं लिहीत आहेत. चार दशकांचा हा काळ संपूर्ण भारतीय समाज एकाच वेळी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर एका मोठ्या मन्वंतरातून गेला आहे. त्याचे साद, पडसाद त्यांच्या लेखनातूनही उमटत गेलेत. त्यांच्या कथेतली माणसं, त्यांच्या जगण्यात होत गेलेले बदल, त्यांची जगण्याची भूमिका या सगळ्यातून नेहमीप्रमाणे जाणवत राहते ती म्हणजे सानिया यांची विलक्षण वेधक आणि सम्यक अशी दृष्टी. जगण्याचं तारतम्य सांभाळत, आभासी दुनियेतल्या या भेलकांडून टाकणाऱ्या वेगात देखील स्वतःच तोल सावरत आणि माणूस म्हणून जगण्याची आपली स्वतःची, स्वतंत्र अशी लय शोधत त्यांच्या कथेतील माणसं आज देखील जगत असतात आणि नवल म्हणजे असं जगताना ती ना कधी शोक करतात, ना विलाप, ना खंत, ना निसटलेल्या क्षणांबद्दलचा खेद. त्याचवेळी ती माणसं बेगडी आदर्शवादी नसतात, ना कुठल्या राजकीय, सामाजिक क्रांतीच्या भावनेने प्रेरित झालेली असतात. ना ती असतात नियतीवादी, परिस्थितीला शरण गेलेली सामान्यातली सामान्य माणसं. मग असतात तरी कोण ही माणसं आणि कसं होतं एका लेखिकेला तिने जगलेल्या काळातल्या माणसांचं आकलन, हा खरा वाचक म्हणून आपल्याला पडणारा प्रश्न आहे. कारण सानिया यांच्या कथेतली त्यांची म्हणावीत अशी माणसं खरोखरच एकाच वेळी व्यावहारिक जगातल्या चार इतर माणसांच्या सारखीच बेरीज-वजाबाकीचं जगणं जगत असतानाच आपलं एक स्वतंत्र, समांतर आयुष्य देखील अगदी निर्धोकपणे जगत असतात.

तर, सानियांच्या कथा या माणसांना समजून घेणाऱ्या आणि ही माणसं इतरांना समजावून सांगणाऱ्या आहेत. त्यांच्या कथेतून त्या माणूस ही संकल्पनाच परत एकदा अधिक विवेकनिष्ठ आणि सम्यक रीतीने मांडत जातात. मग वाचता-वाचता आपण देखील आपल्याच आयुष्यात आलेल्या माणसांकडे निराळ्या अंशा-कोनातून बघू लागतो. मग हळूहळू माणूस म्हणून आपण सुद्धा संपूर्णपणे बदलून जातो आणि आपल्याला आपल्याच पायाखालचा आपला रस्ता अधिक स्पष्ट आणि स्वच्छ दिसू लागतो.

ललित लेखक आणि साहित्याच्या आस्वादक

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब