काम लहान की माणूस?  
अक्षररंग

काम लहान की माणूस?

शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचं ठिकाण नाही तर ती जीवनाची शाळा असते जिथे मुलं फक्त वाचायला-लिहायला शिकत नाहीत, तर जगायला शिकतात. काही वेळा एक छोटा प्रसंग, एक साधा प्रश्न किंवा एखादं अनुभवाचं बीज लेकरांच्या मनात आयुष्यभरासाठी विचारांचं झाड लावून जातं.… आजचा हा अनुभव तसाच मनाला भिडणारा आणि विचारांना दिशा देणारा.

नवशक्ती Web Desk

शिक्षणगुज

युवराज माने

शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचं ठिकाण नाही तर ती जीवनाची शाळा असते जिथे मुलं फक्त वाचायला-लिहायला शिकत नाहीत, तर जगायला शिकतात. काही वेळा एक छोटा प्रसंग, एक साधा प्रश्न किंवा एखादं अनुभवाचं बीज लेकरांच्या मनात आयुष्यभरासाठी विचारांचं झाड लावून जातं.… आजचा हा अनुभव तसाच मनाला भिडणारा आणि विचारांना दिशा देणारा.

शाळेत लेकरांना वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मी नेहमी संधी देत असतो. एक दिवस सहजच विषय घेतला- ‘तुम्हाला काय बनायचं आहे?’ वर्गात एक वेगळीच उत्सुकता होती…. कोणी म्हणालं डॉक्टर, कोणी इंजिनिअर, कोणी पोलीस, तर कोणी शिक्षक. स्वप्नं मोठी होती, उंच होती, सुंदर होती.

पण त्या सगळ्या उत्तरांमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसत होती- कोणालाही ‘शिपाई’ व्हायचं नव्हतं. क्षणभर मी शांत झालो. लेकरांच्या डोळ्यांत स्वप्नं होती, पण त्या स्वप्नांत काही कामं ‘लहान’ म्हणून बाजूला सारलेली दिसत होती.…

मनात एक विचार चमकून गेला- आपण मुलांना उंच भरारी घ्यायला शिकवत आहोत, पण जमिनीशी नातं जोडायला शिकवत आहोत का? मी लेकरांना आमच्या लहानपणीच्या शाळेतील होलिराम भाऊंची गोष्ट सांगितली.

शाळेचा पहिला दरवाजा उघडणारे- ते आणि शेवटी कुलूप लावून जाणारे- तेच. सकाळी ते शाळा अशी स्वच्छ करायचे, की जणू काही आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसावं. वर्ग, कार्यालय, ग्रंथालय सगळं टकाटक. त्यांच्या हातातून स्वच्छतेचा एक वेगळाच सुगंध यायचा आणि त्या सुगंधात आम्ही दिवसभर आनंदाने शिकायचो. त्यांना एकच गोष्ट ठाऊक होती, ‘कोणतंही काम करा पण असं करा की, लोकांनी तुमचं नाव घ्यावं!’

विशेष म्हणजे- कधीही त्यांनी एका मुलालाही साफसफाईसाठी सांगितलं नाही. स्वतःच सगळं करत राहिले. काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा नव्हता. फक्त समाधान होतं आणि ते समाधानच त्यांचं खरं बक्षीस होतं. लेकरं ही गोष्ट मन लावून ऐकत होती.

त्यांच्या चेहऱ्यावर विचार उमलत होते. मी हळूच पुढे म्हणालो, मोबाईल कितीही महागडा असो, चार्जर नसेल तर तो निरुपयोगीच. दवाखान्यात डॉक्टर जितके महत्त्वाचे, तितकीच नर्सताईही महत्त्वाची. घरात आईचं स्थान कुणी घेऊ शकतं का? ती नसती, तर आपल्या आयुष्याचा पाया किती कमकुवत झाला असता. क्रिकेटमध्ये कर्णधार, खेळाडू महत्त्वाचेच. पण खेळपट्टी तयार करणाऱ्यांचं योगदान कमी आहे का? मग लेकरांनो, काम लहान असतं का? की आपली दृष्टी लहान असते?

आणखी एक गुजगोष्ट सांगितली. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मधमाश्या त्या छोट्याशा जीवांनी बांधलेलं पोळं- किती परफेक्ट असतं! त्यांचे कष्ट, त्यांची चिकाटी आणि एकत्रित काम करण्याची ताकद आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि मग आठवली एक गोष्ट… मुंबईत अबीद सुरती नावाचा एक माणूस आहे तो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख असो वा नसो आणि बघतो- नळ गळतोय का? गळत असेल तर स्वतःच्या खर्चाने तो दुरुस्त करतो. एका माणसाच्या या छोट्याशा कामामुळे लाखो लिटर पाणी वाचलंय. विचार करा- पाण्याचा एक थेंब वाचवणं म्हणजे एखाद्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याइतकंच मोठं काम नाही का?

मी लेकरांना विचारलं, ‘आता सांगा… कोणतं काम लहान वाटतं का?’ वर्गात शांतता होती. पण त्या शांततेतच उत्तर होतं. त्या दिवशी मला जाणवलं- लेकरांनी फक्त उत्तर बदललं नाही, तर दृष्टी बदलली. शेवटी मी एवढंच सांगितलं- ‘तुम्ही काय बनता, यापेक्षा तुम्ही जे बनाल, ते काम किती मन लावून करता- हेच खऱ्या अर्थाने मोठेपण ठरवतं…’कारण… मोठं होणं म्हणजे पद नाही, तर कामातलं प्रामाणिकपण आणि मनातलं माणूसपण असतं…

शिक्षणगूज : लेकरांना स्वप्नं द्यायचीच पण त्याचवेळी प्रत्येक कामाचा सन्मान करायला शिकवणं हेच खऱ्या शिक्षणाचं गूज आहे.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.

yuvrajmane892@gmail.com

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा