अक्षररंग

पहाटेच्या निळाईत विरघळलेलं शिवरुप

पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर अरबी समुद्राच्या साक्षीने घडलेलं सोमनाथ दर्शन म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर मनाला शांत करणारा आणि अंतर्मनाला उजळवणारा एक अविस्मरणीय अनुभव होता.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर अरबी समुद्राच्या साक्षीने घडलेलं सोमनाथ दर्शन म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर मनाला शांत करणारा आणि अंतर्मनाला उजळवणारा एक अविस्मरणीय अनुभव होता.

बरोबर ब्रम्हमुहूर्तावर रेल्वे द्वारकेवरून सोमनाथच्या स्टेशनवर पोहोचली. गुजरातमधल्या प्रभास पाटण येथील श्री सोमनाथ मंदिर बघण्यासाठी आलेले भाविक स्टेशनवर अर्ध्या झोपेत उतरत होते. आम्हीसुद्धा डोळ्यावरची झोप शक्य तेवढी झटकून बॅग्स उचलून स्टेशनवर उतरलो. आम्ही म्हणजे आजोळातील मंडळी आणि मी. घरातच भक्तिमय वातावरण असल्यामुळे ही सहल आमच्यासाठी धार्मिक अन् अध्यात्मिक होती. याच अंधारात आम्हाला राहण्यासाठी हॉटेलही शोधायचे होते. हॉटेल सोमनाथ मंदिराजवळ असावे असे ठरवले. मामा रिक्षावाल्यांशी बोलत होता. थोडी घासाघीस झाली आणि रिक्षावाले आम्हाला सोमनाथ मंदिराजवळ सोडायला तयार झाले. दोन रिक्षाचा आवाज अंधारातली शांतता कापत चालला होता. पंधरा मिनिटांत रिक्षावाल्याने आम्हाला एका ठिकाणी पोहोचते केले. आजुबाजूला छोटी मोठी बरीच हॉटेल, लॉजेस, बोर्डिंग होते. नक्की मंदिराच्याजवळ सोडलेय ना हे पाहण्यासाठी मी गुगल उघडला. मंदिर किती दूर आहे ते बघितले. आम्ही जिथे उभे होतो तिथून मंदिर अगदीच चालत दहा मिनिटांवर होते. मी विचार केला आता गुगल मॅप आहे म्हणून हे सगळं शोधणं सुखकर झालं आहे. गुगल मॅप नव्हता तेव्हा लोक एकमेकांवर विश्वास ठेवूनच चालत असावीत.

आम्हाला हॉटेल शोधायला फार वेळ लागला नाही. एका छोट्या माडी असलेल्या घरातील दोन खोल्यांमध्ये आमचा मुक्काम होता. एका खोलीत आम्ही सगळ्या स्त्रिया होतो. आणि एका खोलीत पुरुषमंडळी. खोल्या जुन्या धाटणीच्या असल्या तरी ऐसपैस होत्या. झोप कुणालाही येत नव्हती. सर्वांच्या अंघोळी पार पडल्या आणि साधारण सकाळी साडेपाच वाजता काळोखात आम्ही मंदिराकडे जायला निघालो.

रस्त्यावरील लाईटच्या उजेडात सोमनाथचा प्रशस्त परिसर दिसत होता. मंदिराभोवती मोठी भिंत असल्याने पूर्ण मंदिर रस्त्यावरून दिसले नाही. पण मंदिराचे सोनेरी प्रकाशात तेजोमय वाटणारे भव्य शिखर पाहून मंदिर बघण्याची उत्सुकता वाढली. आम्ही बारा ज्योतिर्लिंगातील पहिल्या ज्योतिर्लिंगास्थळी श्री क्षेत्र सोमनाथ मंदिराजवळ आहोत, याचे समाधान वाटत होते. डोळे आणि मन शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी आसुसले होते.

मंदिराजवळ पोहोचल्यावर चप्पल स्टँडजवळ चप्पल काढले. मोबाईल, कॅमेरा काउंटरवर जमा केले आणि मंदिराकडे जायच्या रांगेत उभे राहिलो. मंदिरात व्यवस्था इतकी उत्तम होती की गर्दीगोंधळ उडायला जागाच नव्हती. शांततेत रांग पुढे सरकत होती. त्यामुळे गर्दीचे विशेष काही वाटलेच नाही. सिक्युरिटी चेक झाल्यावर प्रवेशद्वारातून मंदिर परिसर प्रवेश केला आणि मंदिराची भव्यता बघून डोळे दिपले. समोर मोठ मोठे मंडप असलेले, भव्य शिखर तोललेले, स्वर्गासमान भासणारे शिवमंदिर अरबी समुद्राच्या काठावर दिमाखात उभे होते. मंदिरात मोठे मोठे लॉन आहेत. मंदिराचे अवलोकन करत फिरायला जागा आहे. मंदिर बघता बघता माझी नजर आकाशाकडे गेली. पहाटेची चाहूल लागली होती. आकाशवर आता निळाईची झालर होती. सूर्यदेव वर येण्यासाठी मात्र अवकाश होता. चंद्राची कोर मात्र अजून उठून दिसत होती. अशा प्रहरी मंदिरात असणे म्हणजे सुख! अत्यंत समाधानाने मी मंदिरामध्ये प्रवेश केला. इथल्या सभामंडपात उभे राहिल्यावर देवाच्या भव्यदिव्य महालात उभे आहोत असेच वाटत होते. मी रांगेत ज्या ठिकाणी उभे होते, तिथे माझ्या डाव्या बाजूला नंदी होता आणि उजव्या बाजूला दूरवर मोठे दार दिसत होते. त्या दारातून अथांग समुद्र आणि पहाट झालेली दिसत होती. अगदी काही सेकंदात मी शिवशंकराच्या समोर उभी असणार होते. पण पुढे एकाएकी दर्शन रांग थांबवली. दोन चार माणसे तरीही गडबडीत दर्शन घेऊन पुढे निघून गेली. आणि मी सगळ्यात पुढे उभी राहिले. माझ्यासमोर सोन्याने मढवलेला गाभारा होता. भगवान सोमनाथांच्या समोर मी उभी होते. पूजा झाली होती. गंध, धुपारे, फुलं, अत्तर यांचा सुगंध दरवळत होता. गाभाऱ्याचे तेज माझे डोळे सहन करू शकत नव्हते. मी थक्क होऊन पिंडीकडे बघत होते. दर्शनरांग थांबवल्यामुळे मला पुढे चला म्हणणारे कोणीच नव्हते. त्यामुळे मी रेलिंगला टेकून स्तब्ध होऊन उभी होते. एकाएकी मंगल आरतीचे सूर कानावर पडू लागले आणि मी भानावर आले. मी डाव्या बाजूला खिडकीतून पाहिले तर आकाशावर गुलाबी रंग पसरला होता.. त्या क्षणी मी पार भारावून गेले होते. डोळे अश्रूंनी डबडबले होते. इथे येताना असा क्षण माझ्या आयुष्यात येणार आहे याची कल्पनाही मी केली नव्हती. पण देवाने त्याचा आशीर्वाद त्या क्षणाच्या रूपाने दिला होता. आरती झाल्यावर दर्शन रांग पुन्हा सुरू केली. देवाला पुन्हा एकवार मनोभावे नमस्कार केला आणि अत्यंत समाधानाने मंदिरातून बाहेर आले. पहाटेच्या वेळी दिसणारे अरबी समुद्राचे दृश्य खास वाटत होते.

आमचा त्या दिवसाचा मुक्कामही सोमनाथमध्येच होता. त्यामुळे आम्ही संध्याकाळी पुन्हा मंदिरात जायचे ठरवले. संध्याकाळी तिथे लाईट अँड साउंड शो असतो. सोमनाथचा इतिहास सांगणारा शो बघण्यासारखा आहे.

समुद्रावर आता रात्रीच्या शांततेचे राज्य होते. वरची चंद्रकोर मंदिराकडे पाहून स्मितहास्य करत आहे असे वाटत होते. हे मंदिर चंद्रदेवाने बांधले म्हणून या मंदिराचे नाव चंद्राच्या सोम या नावावरून आहे. सोमनाथ. याची आख्यायिका अशी की, चंद्रदेवाला दक्ष राजाने श्राप दिला होता की, तुझे तेज हळूहळू कमी होईल आणि तुझे अस्तित्व नाहीसे होईल. चंद्रदेवाने इथे भगवान शंकरांची आराधना केली. शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना श्रापमुक्त केले. तेव्हा चंद्रदेवानी हे सोमनाथचे मंदिर बांधले.

पूर्वी हे मंदिरही आजच्याप्रमाणेच दिमाखात उभे असेल. पण या मंदिरावर एक नाही तर अनेक परकीय आक्रमणे झाली. आता हे भव्य मंदिर बघायला मिळतेय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे. या मंदिराचा उल्लेख श्रीमद भागवत, स्कंदपुराण, शिवपुराणातही आहे. भारतातल्या इतक्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र स्थळी जाऊन अनुभवसंपन्न होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. संध्याकाळीही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेव्हाही सुदैवाने फार गर्दी नव्हती. त्याचे रूप डोळ्यात साठवले. खिडकीबाहेर टीमटीमणाऱ्या चांदण्या होत्या. माझ्या आतही अशाच प्रसन्नतेच्या तेजाळ चांदण्या टीमटीमत होत्या. सोमनाथच्या दर्शनाने भक्तीरसाची गोडी मला लावली. अर्थात धार्मिक पर्यटनातही अद्भूत, स्मरणात राहणारे आणि आपल्या अंतरंगाचा कायापालट करणारे अनुभवही येतात याची प्रचिती आली.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार