शिक्षणगुज
युवराज माने
वर्ग म्हणजे केवळ चार भिंती आणि बाकांची रांग नसते, तर ते एक जिवंत विश्व असतं. शिक्षक म्हणून केलेल्या प्रवासात उमजलेलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कुतूहलातून आकाराला आलेली ही एक 'अनुभवगाथा'. जिथे शिक्षक शिकवतो कमी आणि विद्यार्थ्यांसोबत जास्त शिकतो!
वर्ग म्हणजे काय? चार भिंती, एक फळा आणि बाकांची रांग..? तर वर्ग म्हणजे एक जिवंत विश्व, जिथे प्रत्येक दिवस नवा जन्म घेतो. गेल्या दोन दशकांच्या अध्यापन प्रवासात मला जाणवलं—वर्ग हा शिकवण्याचा मंच नसतो; तो शोधण्याची जागा असतो. शिक्षक म्हणून आपण धडे देतो, पण खरी उकल लेकरांच्या डोळ्यांतून होते. त्यांच्या प्रश्नांतून, त्यांच्या कुतूहलातून, त्यांच्या शांत निरीक्षणातून शिक्षणाचा अर्थ उलगडत जातो.
मी नेहमी प्रयत्न केला तो एवढाच— माझ्या बालपणी मला जसं वर्गाचं वातावरण हवं होतं, तसं वातावरण माझ्या विद्यार्थ्यांना द्यावं. भीतीमुक्त, संवादप्रधान, प्रयोगशील. वर्ग पहिलीपासून सातवीपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी जागा जिवंत राहावी म्हणून रचना बदलत गेली; पण तत्व एकच राहिलं—वर्ग हा मुलांचा आहे. म्हणूनच वर्गात परिसरातील वस्तू आल्या—मोडके कप, बश्या, बाटल्या, लाकडी ठोकळे, खेळभांडी. निसर्ग कोपऱ्यात पानं, दगड, पक्ष्यांची घरटी. वाचन कोपरा, संवाद कोपरा, कला कोपरा… आणि आसनव्यवस्था? जिथे मन रमेल तिथे बसा. या मोकळ्या रचनेने अभ्यासक्रम मर्यादित राहिला नाही; तो अनुभवांमध्ये विस्तारला. कुतूहलाची पहिली पायरी म्हणजे एकदा काही विद्यार्थ्यांनी—भाग्यश्री, खोमेश, मेघा, वर्षा, गुलशन आणि जितू—वर्गात वेगवेगळे दगड आणले.
त्यांच्या निरीक्षणातून चर्चा सुरू झाली—रंग का बदलतो? आकार वेगळा का? नदीतले असतील का? तो नियोजित धडा नव्हता; पण त्या दिवशी भूगोल, विज्ञान आणि निरीक्षण कौशल्य यांचा एकत्रित अनुभव झाला. मी केवळ प्रश्न विचारला— “हे दगड आपल्याला काय सांगत असतील?”
तेव्हा उमगलं—शिक्षकाने उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न जिवंत ठेवले पाहिजेत. दुसऱ्या एका दिवशी निसर्ग कोपऱ्यातील पक्ष्यांची घरटी पाहून ईश्वरीने प्रश्न विचारला— “पक्ष्यांना घरटं बांधायला कोण शिकवतं?”
खुशी, अरुण, आयुष यांनी तर्क मांडले. ईश्वरीने पुढाकार घेतला—“आपणच वेगवेगळ्या साहित्याने घरटं बनवून पाहू या.” गट तयार झाले. कल्याणी नोंदी करू लागली. अंकिता घरटं विणू लागली. निरीक्षण, तुलना, चाचणी सुरू झाली.
मी फक्त एकच प्रश्न विचारला— “पावसात कोणतं घरटं टिकेल?” त्या चर्चेतून मला जाणवलं—वर्गरचना योग्य असेल तर विद्यार्थ्यांत सहकार्य, नेतृत्व, चिकित्सक वृत्ती आणि जबाबदारी आपोआप विकसित होते.
वर्ग हा केवळ अध्यापनाचा भाग नसून संस्कारांची कार्यशाळा असतो. इथे मत ऐकण्याची सवय लागते. इथे मतभेदातही आदर राखायला शिकतो. इथे प्रश्न विचारण्याची हिंमत निर्माण होते. अनुभवातून उमगलेलं हे सत्य होतं.
गेल्या वीस वर्षांत एक गोष्ट ठाम पटली— आपण वर्ग घडवतो असं वाटतं; पण प्रत्यक्षात वर्ग आपल्याला घडवत असतो. विद्यार्थ्यांच्या बंद ओंजळीत जो आनंद असतो, तो आपण जपला तरच तो आपल्या हातात येतो. वर्ग हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जागा नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याची भूमी आहे.
शिक्षणगूज : वर्ग जिवंत ठेवा. प्रश्नांना मोकळं आकाश द्या. वस्तूंना स्पर्श करू द्या, विचारांना दिशा देऊ द्या. शिक्षक म्हणून आपण ज्ञानाचे स्रोत नसून प्रवासातील सहप्रवासी आहोत. विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला थांबवू नका; त्याला वाट दाखवा. कारण शेवटी धडा विसरला जाईल, पण अनुभव लक्षात राहील. आणि अनुभवातून घडलेला माणूसच शिक्षणाचं खरं यश ठरतो.
लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात
yuvrajmane892@gmail.com