तीजनबाई : पंडवानीचं धगधगतं पर्व... Wikipedia
अक्षररंग

तीजनबाई : पंडवानीचं धगधगतं पर्व...

छत्तीसगडच्या एका आदिवासी कुटुंबात जन्मलेली, बाराव्या वर्षी लग्न, बहिष्कार, दारिद्र्य, अपमान आणि पुरुषप्रधान परंपरेविरुद्धचा संघर्ष पेलणारी तीजनबाई यांनी पंडवानीला गावच्या चौपालीतून जगभरातील रंगमंचावर नेले. पद्मविभूषणाने सन्मानित या असामान्य लोककलावंताच्या निधनाने भारतीय लोकपरंपरेतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

नवशक्ती Web Desk

आठवण

प्रशांत पवार

छत्तीसगडच्या एका आदिवासी कुटुंबात जन्मलेली, बाराव्या वर्षी लग्न, बहिष्कार, दारिद्र्य, अपमान आणि पुरुषप्रधान परंपरेविरुद्धचा संघर्ष पेलणारी तीजनबाई यांनी पंडवानीला गावच्या चौपालीतून जगभरातील रंगमंचावर नेले. पद्मविभूषणाने सन्मानित या असामान्य लोककलावंताच्या निधनाने भारतीय लोकपरंपरेतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

रंगमंचावर सिंहासारखी गर्जना, भारदस्त नजरेत भरणारे व्यक्तिमत्त्व, उंच अंगकाठी, लालभडक साडी, केसांवर चमकते कुंकू, कपाळावर मोठी गोल बिंदी, पानाने रसिले झालेले ओठ, दातांमध्ये लालिमा…, हातात मोठा तंबोरा घेऊन ती जेव्हा रंगमंचावर उभी राहायची, तेव्हा काही क्षणातच संपूर्ण रंगमंच जणू कुरुक्षेत्रात रूपांतरित व्हायचा.… महाभारतातील पात्रे एकामागून एक जिवंत होत असल्याचा भास व्हायचा…, तिच्या कंठातून उमटणारा पंडवानी गायकीचा तो आलाप हा भारतीय लोकपरंपरा, संगीत आणि कथनकलेचा असा अद्वितीय संगम होता की, इतिहासालाच जणू श्वास मिळाल्यासारखे वाटे…. आज तो तंबोरा निःशब्द झाला आहे. पंडवानीची ती अखंड वाहणारी कथा थांबली आहे. पंडवानीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंत तीजनबाई यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने जणू छत्तीसगडच्या मातीतला सर्वात लाडका स्वर हरपला आहे. काळाच्या विशाल रंगमंचावर आता एक खोल, दीर्घ शांतता पसरली आहे.

छत्तीसगडमधील गनियारी या छोट्याशा गावातून आलेली एक आदिवासी मुलगी... जिने सुरुवातीच्या आयुष्यात ना मोठे रंगमंच पाहिले, ना प्रकाशझोत अनुभवला; पण आपल्या असामान्य कंठसामर्थ्याने तिनेच त्या रंगमंचांना नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. तीजनबाई यांनी पंडवानी या लोककलेला घराघरांतल्या अंगणातून, गावच्या चौपालांतून बाहेर काढून जगभरातील प्रतिष्ठित रंगमंचांवर नेली.

त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रायपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंडवानी हे छत्तीसगडमधील एक प्रसिद्ध कथाकथन रूप आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकात यक्षगान, केरळात कथ्थकली आणि इतर राज्यांत विविध लोककला आहेत, त्याचप्रमाणे पंडवानीमध्ये पौराणिक कथा संगीताच्या माध्यमातून सादर केल्या जातात. यामध्ये प्रसंगानुरूप गाणे थांबवून गोष्ट सांगणे किंवा पात्रांचे संवाद गाऊन प्रेक्षकांसमोर मांडणे या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने कथा सादर केली जाते.

तीजनबाई यांच्या तंबोऱ्याच्या प्रत्येक सुरात लोकसंस्कृतीचा आत्मा स्पंदत असे आणि त्यांच्या अभिनयातून महाभारतातील प्रत्येक पात्राला जणू देह आणि प्राण लाभत. द्रौपदीचा करुण आक्रोश, भीमाचे अजिंक्य सामर्थ्य, अर्जुनाची अस्वस्थता आणि कृष्णाचे गूढ स्मित हे सारं पंडवानी सादर करताना त्यांच्या स्वरात जिवंत होत असे. त्या केवळ महाभारत कथन करत नसत; त्या लोकस्मृती गात असत. खांद्यावर गदेप्रमाणे तंबोरा टेकवत त्या भीमाचे प्रसंग रंगवत, तेव्हा प्रत्येक श्रोत्याच्या अंतर्याम्यात एखादा भीम जागा झाल्याचा भास होत असे. पंडवानीच्या रंगमंचावरून त्या केवळ कथा सांगत नव्हत्या; इतिहासाच्या ओझ्याखाली दडपल्या गेलेल्या आवाजांना त्या मुक्त करत होत्या.

त्यांच्या हातून पंडवानी ही केवळ एक लोककला राहिली नाही; ती इतिहास, स्त्रीअनुभव, संघर्ष आणि संगीत यांचा एक सशक्त संवाद बनली. रंगमंचावर तीजनबाई उभ्या राहिल्या की प्रेक्षक केवळ प्रेक्षक राहत नसत; तेही त्या कथेत सहभागी होत. लोककलेला थेट लोकजीवनाशी जोडून टाकण्याची हीच त्यांची अद्भुत जादू होती. तीजनबाई यांनी पंडवानीचे केवळ जतन केले नाही, तर तिला नवी ओळख, नवे व्यासपीठ आणि जागतिक प्रतिष्ठाही मिळवून दिली. लोककला एखाद्या मर्यादित मंचाची मोहताज नसते, ती माणसांच्या मनामनांत घुमणारी चिरंतन कथा असते, हे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याने सिद्ध करून दाखवले.

आणि म्हणूनच छत्तीसगडच्या एका छोट्याशा गावापासून ते पॅरिसपर्यंत तीजनबाईंनी जेव्हा पंडवानीचे सादरीकरण केले, तेव्हा श्रोत्यांनी फक्त भाषा नाही ऐकली, तर त्यांच्या कलेचा आत्माच अनुभवला. पंडवानी गायिका तीजनबाई लहानपणी कधीच शाळेत गेल्या नव्हत्या, साक्षरता मोहिमेद्वारे त्या केवळ पाचवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकल्या. मात्र तरीही ‘भारतरत्न’ वगळता पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारखे सर्वोच्च नागरी सन्मान त्यांच्या गळ्यातील अलंकार बनले. चार वेळा ‘डी.लिट.’ पदवी मिळवणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. मात्र तीजनबाई यांचा साधेपणा कधीच बदलला नाही. त्या आयुष्यभर लोककलेच्या लेकीच राहिल्या. आज तो तंबोरा निःशब्द पडला आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत जणू एका युगाचा आलापच थांबून गेला आहे, असे वाटते.

सांस्कृतिक कार्यक्रमांवरच उपजीविका अवलंबून असलेल्या तीजनबाई यांना ७ जुलै १९८६ रोजी भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या भिलाई इस्पात संयंत्रात नोकरी मिळाली होती. किमान दरमहा निश्चित पगार मिळेल आणि आयुष्याला काही प्रमाणात स्थैर्य लाभेल, या समाधानात त्या होत्या. ही जवळपास २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईत झालेल्या लोककला महोत्सवामध्ये तीजनबाईंनी पंडवानी सादर केले होते.

मी त्यांना विचारले, “आज तुमची कीर्ती जगभर पोहोचली आहे. अशा वेळी भिलाई इस्पात कंपनीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करणे, लोकांना पाणी पाजण्याचे काम करणे तुम्हाला योग्य वाटते का?”

तीजनबाईंनी हळू आवाजात उत्तर दिले, “मी आज मिठाई खाते, तरी जळालेल्या भाकरीची चव आणि आठवण मी कधीच विसरत नाही.”

तीजनबाई यांच्या त्या उत्तरात भूतकाळाच्या वेदना होत्या आणि त्या वेदना शांतपणे स्वीकारण्याची ताकदही होती.

तीजनबाईंचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी भिलाईजवळील ‘गनियारी’ गावात, अत्यंत गरीब आणि सामाजिकदृष्ट्या वंचित अशा जंगलात राहणाऱ्या ‘बनफरा’ जमातीत झाला. हा समाज मजुरी आणि बांबूच्या वस्तू बनवून गुजराण करत असे. तीजनबाईंच्या घरात संगीत आणि कलेची परंपरा होती; त्यांचे वडील चुनुक राम पारंपरिक बांबूचे वाद्य (‘बास’) वाजवायचे, तर आई सुखवती ‘बासगीत’ गात असत. त्या आपल्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठ्या होत्या.

छत्तीसगडमध्ये बांबूच्या वाद्याच्या सुरांच्या साथीने गायक कथा सांगत जातो. याच लोकपरंपरेतून तीजनबाईंना घरात संगीत आणि कथाकथनाचा वारसा मिळाला. अत्यंत गरिबीमुळे लहानपणी शेतात काम करावे लागत असतानाही त्या करमा, ददरिया आणि सुआ ही लोकगीते गात असत. इतकेच नव्हे, तर लहानपणी नारळाची पैज लावून होणाऱ्या गाण्याच्या स्पर्धांमध्येही त्या बहुतांश वेळा जिंकत असत. लहानपणी त्या आपल्या आईचे काका बृजलाल पारधी यांना पंडवानी सादर करताना पाहत आणि लपूनछपून त्यांचे गायन ऐकत बसत. हळूहळू महाभारतातील अनेक प्रसंग त्यांच्या पाठ झाले. दरम्यान, अवघ्या १२व्या वर्षी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. ज्यांच्याशी त्यांचे लग्न झाले, त्यांची यापूर्वीच दोन लग्ने झाली होती. त्या घरात सतत वादविवाद आणि कलहाचे वातावरण असे. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या पतीने चौथ्या महिलेला घरी आणले. त्यानंतर तीजनबाई माहेरी परतल्या. पुढे त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र तीन मुलांची आई झाल्यानंतरही त्यांनी गायन आणि पंडवानी सोडली नाही. पुढे त्यांच्या पतीने स्पष्ट शब्दांत सांगितले, “एकतर मला निवड किंवा पंडवानीला.” तीजनबाईंनी आपल्या तीन मुलांना सोबत घेतले, घर सोडले आणि पंडवानीचीच वाट निवडली.

पंडवानी ही कला फक्त पुरुषांसाठीच मर्यादित असताना, तीजनबाईंनी ही परंपरा मोडून काढत पंडवानी गाणारी पहिली स्त्री बनण्याचा मान मिळवला. त्यांनी ही कला संपूर्णपणे नव्या आणि वेगळ्या ढंगात रंगमंचावर आणून प्रेक्षकांना थक्क केले. त्यांच्या या बंडामुळे सवर्ण समाजाने त्यांच्यावर विषारी टीका केली, त्यांच्या कुटुंबावर आणि गावाकडून बहिष्कार टाकला, तसेच त्यांची अब्रू लुटण्याचा प्रयत्नही केला. या तीव्र विरोधाला आणि छळाला कंटाळून शेवटी त्यांना गावातून परागंदा व्हावे लागले.

तीजनबाईंनी पहिल्यांदा आपली कला पेश केली त्यावेळी पंडवानी स्त्री गायिका फक्त बसून गायच्या. रंगमंचाखाली बसून पुरुष गायकांच्या सूरात सूर द्यायच्या. केवळ पुरुष गायकांनीच उभे राहून गायचं असा प्रघात होता. हा प्रघात त्यांनी मोडीत काढला. हा एकप्रकारे पुरुषप्रधान मानसिकतेवर केलेला जोरदार प्रहार होता. त्यांची शैली तुफान लोकप्रिय झाली. लोक त्यांच्या पंडवानीचा आस्वाद घ्यायला रात्री धावत-पळत यायचे. गावं-खेडी-शहरातल्याच नाही तर दुर्गम-पहाडी-आदिवासी-जंगल परिसरातल्या साऱ्या रसिकांच्या गळातल्या त्या ताईत झाल्या. इतकी अमाप लोकप्रियता त्यांनी मिळवली. त्यांची कीर्ती देशापर्यंतच सीमित न राहता परदेशातही पोहचली. अख्तरीबाई, हिराबाई बडोदेकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसची आई), गौहर खान, सुब्बालक्ष्मी, जानकीबाई, गिरिजादेवी आदी दिग्गज कलावंतांसारखी ख्याती त्यांनी मिळवली.

त्यांच्या असामान्य कलेमुळे त्यांना केवळ छत्तीसगडमध्येच नव्हे, तर देश-विदेशातही मोठी प्रतिष्ठा मिळाली. ज्येष्ठ रंगकर्मी हबीब तन्वीर यांनी त्यांचे सादरीकरण ऐकले आणि त्यानंतर भोपालमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित केला. पुढे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानापासून देशातील विविध भागांत त्यांच्या पंडवानीचे कार्यक्रम आयोजित होऊ लागले. यानंतर त्यांनी हबीब तन्वीर यांच्या ‘नया थिएटर’ या नाट्यसंस्थेसोबत काम करण्याचे ठरवले. ‘मिट्टी की गाड़ी’ या नाटकासाठी त्यांनी काही दिवस तालीमही केली.

त्या पुढे म्हणत, “पण पॅरिसमध्ये झालेल्या भारत महोत्सवात मी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर माझी ओळखच बदलून गेली. देशभरातील लोक मला ओळखू लागले. पॅरिसहून एका व्यक्तीने मला पत्र पाठवले होते. त्यावर फक्त ‘तीजनबाई, इंडिया’ असा पत्ता लिहिला होता. गंमत म्हणजे ते पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेही.” या साऱ्या प्रवासात पंडवानीची कथा दुर्ग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सीमांपलीकडे जात देशभर आणि जगभर दुमदुमत राहिली. फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली आणि ब्रिटनसह अनेक देशांत त्यांनी पंडवानीची प्रभावी सादरीकरणे केली. १९८८ मध्ये दूरदर्शनवरील गाजलेल्या ‘भारत एक खोज’ या मालिकेतही त्यांनी आपल्या कलेची छाप उमटवली.

पंडवानीच्या कापालिक परंपरेच्या गायिका म्हणून तीजनबाई आणि पंडवानी हे जणू एकमेकांचेच समानार्थी बनले. मात्र एवढी जागतिक कीर्ती मिळूनही अटारी गावातील त्या निरागस आदिवासी स्त्रीच राहिल्या. २०१८ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारानंतर काही दिवसांतच त्यांनी पुन्हा पंडवानीचे सादरीकरण सुरू केले आणि देशातील विविध भागांत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. मात्र २०२३ मध्ये त्यांचा मुलगा शत्रुघ्न याच्या निधनाने त्या पूर्णपणे खचून गेल्या. त्याआधीच दुसरा मुलगा कौशल याचाही मृत्यू झाला होता. तीन मुलांपैकी दोघांना गमावल्याचा आघात त्या कधीच पचवू शकल्या नाहीत. जून २०२३ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. पक्षाघातानंतर त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. जणू काळानेच आपल्या सुरांची दिशा बदलली होती. तब्येत अचानक ढासळली आणि त्यानंतर त्यात सुधारणा झाली नाही. त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. संवाद कमी होत गेला आणि आठवणींचाही धागा हळूहळू सुटत गेला. जो आवाज कधीकाळी संपूर्ण महाभारत जिवंत करून दाखवत होती, तो स्वर आता कायमचा शांत झाला होता. घरच्यांच्या सांगण्यानुसार, आयुष्याच्या अखेरीस त्या जणू पुन्हा आपल्या बालपणात परतल्या होत्या. लहान मुलांसारख्या निरागस गप्पा मारत असत. जणू जीवनाचे वर्तुळ पूर्ण झाले होते. तीच निरागसता, तोच निष्कपट स्वभाव; फक्त त्यांचा तंबोरा मात्र निःशब्द पडला होता.

गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी, छत्तीसगड राज्योत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून तीजनबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना रायपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्या पुन्हा आपल्या गावी परतल्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर दीर्घ आजाराशी झुंज देत शनिवारी उशिरा रात्री त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

लेखक ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’चे संपादक आहेत.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल