खादाडीचा ‘अस्सल’ रुबाब 
अक्षररंग

खादाडीचा ‘अस्सल’ रुबाब

पदार्थाची चव जितकी महत्त्वाची, तितकीच तो खाण्याची पद्धतही! वाटीत फुटणारा लाडू असो वा मुठीने खाल्ला जाणारा भडंग, प्रत्येक घासामागे एक शास्त्र आणि एक वेगळीच मज्जा असते. चमच्याने खाण्याच्या आजच्या 'हायजीनिक' जमान्यात, हाताने ओरपून खाण्यातल्या त्या हरवलेल्या सुखाचा आणि आठवणींचा हा एक चविष्ट प्रवास!

नवशक्ती Web Desk

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

पदार्थाची चव जितकी महत्त्वाची, तितकीच तो खाण्याची पद्धतही! वाटीत फुटणारा लाडू असो वा मुठीने खाल्ला जाणारा भडंग, प्रत्येक घासामागे एक शास्त्र आणि एक वेगळीच मज्जा असते. चमच्याने खाण्याच्या आजच्या 'हायजीनिक' जमान्यात, हाताने ओरपून खाण्यातल्या त्या हरवलेल्या सुखाचा आणि आठवणींचा हा एक चविष्ट प्रवास!

एखादा पदार्थ खाण्याची पद्धती किंवा तो पदार्थ सर्व्ह करण्याची तऱ्हा वेगवेगळी असते. अर्थात हे व्यक्तिसापेक्ष असतं म्हणा, तरीही सर्वसाधारण पद्धत आपण पाहू शकतो. म्हणजे बेसन किंवा रवा लाडू हा वाटीत का दिला जायचा? ताटलीत किंवा बशीत दिल्यावर काय चव बदलली असती? तर अनेकदा लाडूच्या पहिल्या घासालाच तो फुस् कन फुटण्याची शक्यता असते आणि खाली वाटी धरलेली असेल तर लाडूचा भुगा बाहेर पडत नाही. आता काही मंडळी लाडू एका घासातच खाऊन टाकतात, म्हणजे अख्खा लाडू तोंडात टाकतात आणि गाल फुगवून खात बसतात. बेसन किंवा रवा नीट भाजला असेल तर लाडू तोंडात छान विरघळतो, अन्यथा टाळ्याला चिकटून बसतो. मग जीभ वेडीवाकडी करत, बोबडं बोलत टाळा स्वच्छ करायचा. असो, तर सांगत काय होतो, माझ्या मते लाडू लहान लहान घास घेत, त्यातल्या बेदाणा, चारोळीच्या वेगळ्या चवीचा आनंद घेत खाण्यात मज्जा आहे.

आता चकलीचं पाहा ना, ती डाव्या हातात पकडून, उजव्या हाताने तिचे छोटे छोटे तुकडे मोडून.....(आणि सोबत चहा असेल तर सोनेपे सुहागा) मस्त चहात बुडवून तोंडात टाकायचे. कोण जाणे काय पण एक मस्त तिखट आणि चहाचं झकास कॉम्बिनेशन जिभेवर उतरतं.

भडंग किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, कुणाकडे गेल्यावर चहासोबत समोर आला की, माझी तरी फार गोची होते. तो खाण्यासाठी सोबत चमचे ठेवलेले असतात. पण अरे हा पदार्थ काय चमच्याने खायचा आहे का ? तो मुठीत घेऊन तोंडात बकाणा भरला की, त्याची गोडी वाढते आणि समाधान मिळतं.

आता लुसलुशीत काजू कतली किंवा केशर जायफळयुक्त मऊशार गोल पेढा असेल ना, तर तो ही लहान घास घेत मटकवायला जो आनंद मिळतो ना तो शब्दात वर्णन करणं कठीण आहे. प्रत्येक घासाला डोळे मिटले जातात, मुखावर त्याचा/तिचा गोडवा दाटून येतो....पण एकाने समाधान मात्र होत नाही, दोन तीन पेढे किंवा कतलीच्या चार वड्या मुखात गेल्या कीच अंतरात्मा थंड होतो.

सारस्वती पद्धतीची नारळाचा रस घालून केलेली कोळंबी किंवा सुरमईच्या दूरदुरीत आमटीसोबत, कुकरमधला नाही तर वाळवून केलेला उन उन भातच हवा. वाफा येणारा आंबेमोहोर तांदळाचा भरपूर पांढराशुभ्र भात, त्यावर चवदार आमटी आणि सोबत सरंगा किंवा बांगड्यांचा तळलेला तुकडा. एकत्रित घास मुखात जाऊ लागताच, ब्रम्हानंदी लागली टाळी, मज देहाते कोण सांभाळी अशी अवस्था होऊन जाते. फक्त भाताच्या राशितला थोडा थोडा भात ओढून घ्यायचा, माशाच्या आमटिने त्याला न्हाऊ घालायचं आणि घास मुखात सोडायचा.

पाणीपुरी शेवपुरी घरी करायचीच का म्हणतो मी? प्रत्येक घासाला आपणच पुरी घ्यायची ती फोडायची, त्यात सगळ्या गोष्टी आपणच भरायच्या आणि मग ती तोंडात जाणार. कोणी सांगितलय हे सगळं करायला ?? तर म्हणे hygienic. कसलं hygienic आणि काय. मस्त आपल्या ठरलेल्या भेळवाल्या भैय्यासमोर जाऊन उभं राहायचं,आणि ऑर्डर द्यायची. हातातल्या द्रोणात सटासट पाणीपुऱ्या येत जातात. आपण पुरीसोबत फक्त आंबट तिखट गोड पाण्याचा आनंद घेत त्या स्वाहा करायच्या बस्स.

लहानपणी आंब्यांच्या मोसमात मनसोक्त आंबे खाताना आम्हा मुलांना उघडेबंब बसवायचे, करणं खाताना कपड्यावर आंब्याचा डाग पडला तर तो जात नसे. समोर आंब्यानी भरलेलं ताट असायचं. खात खात मस्ती करताना, कोपरापर्यंत हात, आतून बाहेरून तोंड, गाल, पोट असं सगळं शरीर आंबेमय होऊन जायचं. आणि आंबा खायची हीच पद्धत आम्हाला माहीत होती. साल काढून, सुरीने फोडींचे तुकडे करून, त्यांना काचेच्या बाउलमध्ये भरून काट्याने खाण्यात कसली आलीय मजा??

संपूर्ण आंबा चोखून किंवा आंब्याची फोड तोंडात घालून दातांनी सगळा गर ओढून खाण्यात काय मज्जा होती.

पूर्वी.....म्हणजे माझ्या बालपणी मस्त भाजलेली (baked)टम्म बटर किंवा लांबडे काळया मनुका घातलेले टोस्ट मिळायचे. खरपूस आणि कुरकुरीत. आता हे खाण्याची पद्धत सांगतो, तर त्यांना चहाच्या बशीत झोपवायचं, वरून ते पूर्ण बुडेपर्यंत त्यावर चहा ओतायचा आणि टोस्ट बटर मंडळी छान चहा पिऊन तृप्त झाली की हातानेच किंवा चमच्याने त्यांना तोंडात सोडायचं. कुठे मिळणार हा आनंद सांगा ??

ताजा हिरवागार मटार......म्हणजे गावठी किंवा नाशिकचा बरं, दिल्ली मटार अजिबात नाही. तर त्याची, ओलं खोबरं भरपूर घालून सुकी उसळ बनवतो आम्ही. मटारचे गोळे म्हणतो त्याला. पोळी सोबत, भात आमटी सोबत खाऊन झाल्यावर थोडी शिल्लक ठेवायची. मग त्यामध्ये छान अधमुरं दही घालायचं, घरात असेल तर फरसाण, शेव पेरायचे आणि...आणि हे मस्त मिश्रण हाणायचं. दही सायीचं असेल तर सोन्याहून पिवळं.

सकाळचं दाट वरण उरलेलं असलं, तर त्यात थोडं लाल तिखट घालायचं, घरचं लोणकढं तूप सोडायचं सगळं एकत्र करून त्यासोबत तांदळाची किंवा नाचणीची भाकरी ओरपायची. अहो पंचपक्वान्न सुद्धा याची बरोबरी करू शकणार नाहीत.

शिळ्या पोळीचा कुस्करा काय वर्णावा....एखाद दोन दिवस गृहास्वामिनी घरी नसेल आणि आदल्या दिवसाच्या दोन तीन पोळ्या उरल्या असतील, तर लगेच हा पदार्थ प्रत्यक्षात आणायचा. कांदा तेलात मस्त परतून त्यात राई, जिरं, कडीपत्ता,हळद, मीठ आणि पोळीचा कुस्करा घालायचा, शक्य असेल तर शेंगदाणे तळून टाकायचे, कोथिंबीर वरून पेरायची आणि जिभेवर ताबा ठेवत फक्कड चहा करायचा आणि खमंग पोळीचा कुस्करा डिशमध्ये वाढून घ्यायचा, असले तर बारीक शेव वर आंथरायचे, फ्रीजमध्ये ओलं खोबरं खवून ठेवलेलं मिळालं तर आनंदी आनंद. त्यानंतरची स्टेप म्हणजे चहा गाळून घ्यायचा. कुस्कराची डिश आणि चहा दोन हातात घेऊन, डायनिंग टेबलवर न बसता आरामात हॉलमध्ये पाय सोडून बसायचं आणि खमंग कुस्कऱ्यासोबत चहाचे घोट घेत डिश सफाचट करायची आणि तृप्ततेचा ढेकर द्यायचा.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड