सुकी खाणी - घरची ते विकतची 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
अक्षररंग

सुकी खाणी - घरची ते विकतची

पूर्वी घराघरांत तयार होणाऱ्या सुक्या खाण्यांनी भूक भागवण्याबरोबरच नात्यांमध्ये गोडवा आणला. आजच्या पॅकेज्ड खाद्यसंस्कृतीच्या काळात हरवत चाललेल्या त्या घरगुती चवींची ही आठवण.

नवशक्ती Web Desk

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

पूर्वी घराघरांत तयार होणाऱ्या सुक्या खाण्यांनी भूक भागवण्याबरोबरच नात्यांमध्ये गोडवा आणला. आजच्या पॅकेज्ड खाद्यसंस्कृतीच्या काळात हरवत चाललेल्या त्या घरगुती चवींची ही आठवण.

'सुकी खाणी’ हा आपल्या दैनंदिन आहाराचा, चहाच्या वेळेचा किंवा प्रवासाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये बिस्किटे, विविध प्रकारचे लाडू आणि चिवडा यांसारख्या चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ केवळ चवीलाच छान असतात असं नाही, तर योग्य पद्धतीने बनवल्यास ते आरोग्यासाठीही उत्तम ठरू शकतात.

बेसन लाडू, डिंक लाडू, खपली गव्हाचे लाडू किंवा मेथीचे लाडू हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. आजकाल साखरेऐवजी सेंद्रिय गुळ, खजूर, ओट्स आणि सुका मेवा वापरून पौष्टिक लाडू बनवण्याची पद्धत लोकप्रिय आहे. हे शरीराला ऊर्जा देतात. चिवडा हा मुख्यत्वे पातळ किंवा जाड पोहे, मुरमुरे किंवा मक्याच्या लाह्यांचा बनवला जातो. यामध्ये शेंगदाणे, सुकं खोबरं आणि काजू घातल्यामुळे प्रथिनांचं प्रमाण वाढतं.

म्हणूनच चिवडा, लाडू, चकली, शेव इ. जे पूर्वी घराघरातल्या आज्जी, आई भरपूर करून ठेवायच्या. मुलं शाळेतून, खेळून आली, “आज्जी भूक लागलीय...” म्हणाली की, ताटलीत चिवडा, बेसन किंवा रव्याचा लाडू काढून समोर ठेवायची. आता आज्जी का? तर हे साठवणीचे सुके पदार्थ फडताळात तिच्या नजरकैदेत असायचे. ही सुकी खाणी, आजच्यासारखी तेव्हा विकत आणलेली मला तरी आठवत नाहीत.

घरातले पितळी डबे या पदार्थांनी नेहमीच भरलेले असायचे. आला गेला पै पाहुणा अतिथी म्हणून आला तरी पंचाईत होत नसे. बरं पदार्थ घरी बनत असल्याने त्यातली मूलभूत सामग्री, तेल चांगल्या प्रतिचं असायचं.

आज जेव्हा मी शाळेत जाणारी मुलं दुकानातून वेफर्स किंवा तत्सम कुरकुरीत पदार्थांच्या चकचकीत जाहिरात केलेल्या गुळगुळीत पुड्या, ज्यामध्ये हवा अधिक आणि पदार्थ नावालाच भरलेले असतात ते विकत घेताना दिसतात किंवा त्यांचे पालकच या पुड्या दुकानातच फोडून पाल्याच्या डब्यात भरताना दिसतात, तेव्हा खरंच आमचं बालपण आठवतं.

आमच्या लहानपणी छान खरपूस भाजलेले लांबडे कडक टोस्ट मिळायचे. हे टोस्ट चहात बुडवून इतके चविष्ट लागायचे की काही विचारू नका.

तशीच कुरकुरीत, पदर सुटलेली खारी बिस्किटं मिळायची. ही बिस्किटं चहात बुडवली की ती चहा शोषून घ्यायची. मुखात घालताच चहाची गोड आणि बिस्किटांची कुरकुरीत किंचित खारट चव यांची युती होऊन एका मस्त चवीची अनुभूती मिळायची.

आज नामांकित खाद्यपदार्थ उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांनी मुलांची आणि मुलांच्या पालकांची मानसिकता नेमकी जोखलेली आहे. आजच्या पिढीतल्या आईवडिलांना स्वयंपाक करायला वेळ नसतो इतकं ते आपल्या करिअरमध्ये, ऑफिस टार्गेटमध्ये गुंतून गेलेले असतात. सुकी खाणी घरी बनवणं तर दूरच राहिलं. अर्थात हे सरसकट विधान नाही करत मी, कारण अनेक घरातल्या तरुण आई ही कसरत सांभाळत घर आणि सहचराच्या मदतीने यशस्वीपणे निभावून नेत असतात.

मुलांच्या मानसिकतेत बदल झालाय तो असा. पूर्वी भूक लागली की मुलं म्हणायची, “आई, खूप भूक लागलीय, मला एक लाडू, चकली आणि थोडी शेव दे.”

आजची मुलं खेळून आली की म्हणतात,

“आई मी पिझ्झा मागवू... किंवा मागवतो.”

“आई मी गजाननकडून वडा आणि समोसा घेऊन येतो...”

आता त्यांची आई नुकतीच दमून आलेली असते, तिलाही भूक लागलेली असते, तिच्यात काही खायला करून देण्याचे त्राण नसतात. कारण तिला जेवणाचं बघायचं असतं. ती या मागणीला उदार अंतःकरणाने परवानगी देते.

पूर्वी बाहेर मिळणारी ही सुकी खाणी, चकचकीत वेष्टनात, कंपनीच्या ठळक जाहिरातींसह दुकानात लटकलेली दिसत नव्हती. तर लाडू, चिवडा, बिस्किटं, शेव, चकली हा खाऊ काचेच्या बरण्यात भरून ठेवलेला असायचा. ग्राहकाच्या मागणीनुसार, पाव किलो, अर्धा किलो मापात तोलून हा खाऊ दिला जायचा. थोडक्यात मुलाचं लक्ष वेधण्याचं काम कंपन्या करत नव्हत्या. आज या खाद्यपदार्थांच्या जाहिराती पालकांसाठी नसतातच, तर त्या असतात मुलांसाठी. त्यामुळे मुलंच आईबापाला याबाबत मार्गदर्शन करतात.

दिवाळी आली की अक्षरशः अनेक पदार्थ घरात बनले जात होते. आज्जी, आई, ताई, काकू, आत्या सगळ्यांचा हे बनवण्यात हातभार लागायचा. घरातले सगळे पितळी डब्बे चकचकीत घासून विविध पदार्थांनी शिगोशिग भरले जायचे. मुलांची तर चंगळच असायची. मुळात निगुतीने बनवलेल्या या पदार्थांना घरच्या मायेच्या हातांची चव असे.

मुलांच्या जिभेला बाहेरच्या खाण्याची चटक लागलेली नसल्यामुळे घरच्या खाण्याला, “शीऽऽऽ! हे काय खायचं? मी बाहेरून मागवतो ना...” हे म्हटलं जात नव्हतं.

आज विकत मिळणाऱ्या चिवड्यात अधूनमधून चार शेंगदाणे, नावाला काजू टाकलेले असतात. वेष्टनावरचं चित्र मात्र काजू, शेंगदाण्यांनी भरलेलं असतं. लाडूचा आकार आणि किंमत याचा जराही जवळचा संबंध नसतो आणि आजचे आईवडील म्हणतात, कशाला आणायचा तो फराळ विकत? कोण खाणार? मुलं हातही लावत नाहीत.

आमच्या पिढीने घरातल्या चवीचा आनंद मनमुराद लुटला. त्यामुळे विकतचं कितीही चांगलं असलं, तरी त्याची तुलना घरच्या चवीशी केली जायची.

आज मुलांना घरचे खाद्यपदार्थ मिळण्याची शक्यताच कमी होत चाललीय, कारण आज जीवनशैलीच पार बदलून गेलीय. घरची चव जिभेला लागत नसल्यामुळे जे बाहेरचे, रेस्टॉरंटमधले खाद्यपदार्थ खाल्ले जातात तेच चविष्ट, टेस्टी, यम्मी वाटतात त्याला कोण काय करणार.

टेलिव्हिजन वाहिन्यांवर एक इंच आलं, पाव चमचा अमुक या मापानी विविध पाककृती मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या पाककृती सांगणारे शेफसुद्धा, “आज आपण अमुक पदार्थाची अगदी रेस्टॉरंट स्टाईल पाककृती पाहणार आहोत...” अशी सुरुवात करतात. त्याबरोबर हा कार्यक्रम पहायला तमाम महिला सरसावून बसतात.

फार विचार न करता, ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका..’ या कवितेच्या ओळीनुसार, आलिया भोगासी... म्हणत पुढे जायचं इतकंच.

kprasad1959@gmail.com

...........................

Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; CSMT ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

मुंबई-पुणे प्रवासाची भिस्त ST वर; रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा परिणाम

अयोध्या देणगी चोरी प्रकरण : अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी नसल्याने चंपत राय मोकाट; SIT च्या कचाट्यातून सुटले

Monsoon Update : पुढील सात दिवस पाऊस रजेवर; पुणे वेधशाळेचा अंदाज

Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली