अक्षररंग

वीगनचे मिथक आणि वास्तवाचा सामना

वीगन म्हणजे केवळ शाकाहार नाही, तर प्राणीजन्य कुठलाच पदार्थ खायचा नाही. त्यामुळेच वीगन आहारात दूध आणि दुग्धजन्य इतर पदार्थही नाकारले जातात. वीगन आहाराची जाहिरात करताना सातत्याने नैतिकतेचा, हिंसेचा मुद्दा उपस्थित केला जातो. पण निसर्गाचं चक्र नीट तपासून पाहिलं असता नेमकं काय दिसतं? निसर्गाची नैतिकता कोणती? याचा आढावा घेणारा हा लेख.

नवशक्ती Web Desk

फूडमार्क

श्रुति गणपत्ये

वीगन म्हणजे केवळ शाकाहार नाही, तर प्राणीजन्य कुठलाच पदार्थ खायचा नाही. त्यामुळेच वीगन आहारात दूध आणि दुग्धजन्य इतर पदार्थही नाकारले जातात. वीगन आहाराची जाहिरात करताना सातत्याने नैतिकतेचा, हिंसेचा मुद्दा उपस्थित केला जातो. पण निसर्गाचं चक्र नीट तपासून पाहिलं असता नेमकं काय दिसतं? निसर्गाची नैतिकता कोणती? याचा आढावा घेणारा हा लेख.

गेल्या काही वर्षांपासून भारतामध्येही वीगन फूड ट्रेंड रूजू पाहत आहे. खरंतर शाकाहारी अन्न हा आपल्या अन्नाचा अविभाज्य भाग असल्याने वीगनचं तसं आपल्याला फार काही अप्रूप वाटायला नको. पण पाश्चिमात्य देशांमध्ये जिथे मांसाहार रोज केला जातो तिथून हा ट्रेंड सुरू झाल्याने त्यांना याचं कौतुक फार. मग ओघाने त्याची होणारी जाहिरात, अनेक सेलिब्रिटींनी स्वीकारलेली ही आहारपद्धती, मोठमोठ्या कंपन्यांनी यामध्ये उतरून तयार केलेली महागडी वीगन उत्पादनं हे आलंच.

वीगन म्हणजे शाकाहाराबरोबरच दूध आणि दुग्धजन्य पदार्थही खायचे नाहीत. त्यासाठी मग प्राणी हिंसाविरोधी भूमिका, आरोग्यविषयक फायदे अशी विविध कारणं सांगितली जातात. पण हे वीगन अन्न भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये महागडं आहे. ते गरीबांसाठी नाही. प्राणीविरोधी हिंसा या अन्नाच्या उत्पादनात होत नसल्याने हे नैतिक, नैसर्गिक अन्नं असल्याचा दावा केला जातो. पण हा दावा अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यासाठी मुळात नैतिकता नक्की कशात आहे, हे तपासून पाहावं लागेल. त्यासाठी ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या जुन्या संस्कृत वाक्याची थोडी शास्त्रीय पद्धतीने उकल करूया.

जीवो जीवस्य जीवनम्

पृथ्वीवर साधारण दोन दशलक्ष प्राणी, जीव आहेत. माणूस शिकार करण्यापासून ते शेती करून स्थिरावण्याच्या काळात त्यातील केवळ ४० प्राणी हे माणसाशी संबंधित किंवा पाळीव झाले. उदाहरणार्थ, बायसन या पशूचं पाळीव रुप म्हणजे म्हैस आणि रेडा. माणसाने आपल्या गरजेप्रमाणे त्यांना बारीक, जाड, उंच, प्रेमळ बनवलं. पण माणसाबरोबर राहणं ही त्यांचीही गरज होती. त्यासाठी त्यांनीही आपल्याला बदलवलं. रानटी कुत्र्यांना मानवाच्या बाजूने राहणं फायदेशीर वाटलं. कारण त्यांना बरीच उरलेली शिकार मिळायची. नंतर ते मानवांसोबत शिकारीसाठी धावू लागले. त्यामुळे अन्न मिळण्याची शक्यता वाढली. त्यामुळे माणसाची गरज म्हणून या प्राण्यांना पाळीव बनवण्यात आलं नाही. त्यांचीही ‘अन्न मिळवणं आणि जगणं’ ही गरज असल्याने ते ‘पाळीव’ झाले. भक्ष्य असल्याशिवाय भक्षक जगू शकत नाही, तसंच भक्षक नसेल तर भक्ष्याचंही संतुलन बिघडतं. नुसती हरणं वाढून चालणार नाहीत. त्यांची शिकार करायला म्हणजेच त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायला वाघ-सिंहही लागतात. त्याशिवाय निसर्गाचं चक्र चालणारच नाही. वनस्पतींचंही तसंच आहे. ४,२२,००० वनस्पतींपैकी केवळ लहानसा टक्का हा खाण्यास उपयुक्त आहे.

वीगन डाएटसाठी प्राण्यांना मारणं, त्यातून होणारी हिंसा, प्राण्यांना मिळणारी क्रूर वागणूक, अमेरिकेसारख्या देशात मांसाचं झालेलं व्यापारीकरण आणि त्यातून होणारे प्राण्यांचे हाल हे एक प्रमुख कारण दिलं जातं.

आता आपले पूर्वज मांस खात होते याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. शिकारी अवस्थेतून सुरुवात करून माणूस शेतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अमेरिकेतील विज्ञान आणि पर्यावरण प्राध्यापक व पत्रकार मायकल पोलन यांच्या मते, गवत खाणाऱ्या गाय-म्हैस, हरिण, काळवीट या प्राण्यांनी आपल्याला दूध, मांस, चरबी याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केल्याने आपल्या मेंदूचा आकार वाढला.

परस्परावलंबी जीवन

प्राण्यांना मारणं ही हिंसा असेल तर त्या न्यायाने वनस्पतीला मारणं ही सुद्धा हिंसा आहे. वनस्पतीही फुलण्यासाठी, बहरण्यासाठी प्राण्यांचा, किडे, पक्षी यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून घेतात. गवत खाणारे प्राणी (ग्रेजर्स) नसतील, तर जमीन हळूहळू वाळवंटात रूपांतरित होते. कारण गवत न खाल्ल्यामुळे पेरेनिअल वनस्पती वाढतात आणि त्यांच्या सावलीमुळे झाडाच्या मुळांची वाढ थांबते. रवंथ करणारे प्राणी (ruminants) गवतातील सेल्युलोज पचवतात आणि त्यातून मिळालेले पोषक घटक पुन्हा मूत्र व विष्ठेद्वारे जमिनीत परत करतात. गवत हे प्राण्यांच्या खतावर (नायट्रोजन, खनिजे, जिवाणू), त्यांच्या चरण्यावर आणि त्यांच्या मृत्यूनंतर जमिनीत परत येणाऱ्या घटकांवर अवलंबून असते. म्हणजेच गवत आणि गवत खाणारे प्राणी परस्परांवर अवलंबून आहेत, जसे शिकारी आणि भक्ष्य. एकूणच वनस्पती आणि इतर सजीव हे एकमेकांच्या सहाय्याने वाढतात, जगतात.

हिंसा आणि वनस्पती

वनस्पती आपल्या जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी लाखो रसायनं निर्माण करत असतात, त्यातून किडे आकर्षित होणं, त्यांना खाऊ पाहणारे जीव मारणं, या क्रिया घडत असतात. वनस्पती १० कोटी वर्षांपासून प्रजननासाठी प्राण्यांचा वापर करत आहेत. काहींनी परागीकरणासाठी वाऱ्याचा वापर केला, तर काहींनी प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी रंग, वास, चव निर्माण केले. यात वनस्पती आणि प्राणी एकत्र उत्क्रांत झाले.

वनस्पतींना मज्जासंस्था नाही म्हणून त्यांना प्राण्यांप्रमाणे वेदना होत नाहीत, असंही सांगितलं जातं. स्टीफन हारोड बुह्नर यांनी आपल्या ‘द लॉस्ट लँग्वेज ऑफ प्लांट्स’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे वनस्पती स्वतःचे, एकमेकींचे रक्षण करतात, संवाद साधतात, इतर जातींना आपल्यात समाविष्ट करून एक टिकाऊ समुदाय तयार करतात. कधी कधी सर्वांच्या हितासाठी स्वतःचा त्यागही करतात. बुह्नर लिहितात की, वनस्पती आणि त्यांचे समुदाय आश्चर्यकारक हालचाली करू शकतात. त्यांची हालचाल हेतुपूर्ण असते. ते हजारो मैल प्रवास करतात. स्थानिक पातळीवर, चढणाऱ्या वेलींना आधार हवा असेल तर त्या आपोआप आधाराच्या दिशेने वाढतात, आधार बदलल्यास त्या जागा बदलतात. काही बियांचे नैसर्गिक प्रसारण तर १५,००० मैलांपर्यंत पोहोचलेले आहे.

त्यामुळे वनस्पती, भाज्या खाणं हीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या हिंसाच आहे. त्यात त्यांना आपण फक्त तोडत नाही तर कापतो, शिजवतो, दळतो, उकडतो. वीगन मंडळी जो युक्तिवाद करतात, त्यानुसार या सर्व प्रक्रिया म्हणजे क्रूरताच म्हणायला हवी.

फळांचे बदलते रूप

आता प्रश्न फळांचा. अनेक फळं ही माणसाला खाण्यायोग्य बनवण्यात आली आहेत. त्याचं मूळचं स्वरूप वेगळं होतं. उदाहरणार्थ, सफरचंद ही मूळ कझाकिस्तानच्या पर्वतरांगांमध्ये आंबट आणि कडू स्वरूपाची होती. मायकेल पोलन यांच्या मते, वन्य सफरचंद खाताना ती ‘आंबट बटाट्यासारखी किंवा थोडी ओली ब्राझिल नटसारखी’ लागतात. त्यांच्यात सुधारणा करून आजची खाण्यायोग्य जात निर्माण झाली.

फळझाड मला अन्न देते आणि मी त्या बिया परत निसर्गाला देतो, जेणेकरून दुसरी झाडं उगवतात, असा भाबडा युक्तिवादही केला जातो. खरंतर फळं ही मनुष्यासाठी बनलेली नाहीत. त्यांचा हेतू झाडांच्या वाढीचा आहे. पण फळं खाताना बिया आपण टाकून देतो आणि सीडबॉल किंवा नुसत्या बिया जमिनीत पुरल्याने त्या रुजतीलच याची काही खात्री नसते.

मांसाच्या व्यापारीकरणाचा मुद्दा योग्य

यातील मांसाच्या उत्पादनाचं व्यापारीकरण आणि त्यात मल्टिनॅशनल कंपन्यांनी उतरून सुरू केलेला धंदा हा एक मुद्दा एकदम योग्य आहे. कारण या अशा फार्ममध्ये प्राण्यांना अनैसर्गिक पद्धतीने वाढवलं जातं, अनेकदा औषधं देऊन त्या प्राण्यांना जाडजूड बनवलं जातं. गाय-बैलांसारख्या प्राण्यांचा गवत हा प्रमुख आहार असताना किंवा कोंबड्या या निसर्गातील कीडे वगैरे खात असताना त्यांना धान्य आणि विशेषतः मका यावर वाढवलं जातं. त्यामुळे त्यांचा आकार, वजन नक्कीच वाढतं आणि पर्यायाने मासांची किंमतही. अमेरिकेमध्ये धान्य खाऊन वाढवलेले गायी/बैल हे प्राणी नऊ ते १२ महिन्यांत बाजारासाठी तयार होतात, तर नैसर्गिक आहारावर त्यांना वाढीसाठी दोन वर्षं लागतात. अशाच पद्धतीने कोंबड्याही काही आठवड्यांत प्रौढ होतात. डुकरांचीही तीच तऱ्हा आहे. त्यांनाही मका खायला घालून जाडजूड बनवलं जातं. अशाप्रकारे अनैसर्गिक पद्धतीने वाढवल्या जाणाऱ्या प्राण्यांचं मांस खाऊन माणसांवरही परिणाम होतोच.

नैसर्गिक चक्रात हस्तक्षेप नको

प्राणी आणि माणूस यांचं परस्पर संबंध हा केवळ प्रेम आणि भावनिक नाही. माणूस जे खाऊ शकत नाही - उदाहरणार्थ, गवत किंवा वनस्पती, अशा गोष्टी हे प्राणी खातात. त्याचं प्रथिनं व चरबीत रूपांतर होतं, जे माणूस खाऊ शकतो. हे चक्र नैसर्गिकच आहे. त्यात क्रूरता नाही. यातील एक प्रक्रिया थांबली तर उलट नैसर्गिक चक्र कोसळून पडेल.

अनेकदा कोंबडा हा खाण्यासाठी फार लोकप्रिय नसल्याने पिल्लू असतानाच त्याची हत्या होते. तीच तऱ्हा आता अनेक ठिकाणी बैलांची आहे. शेतीसाठी त्यांचा उपयोग राहिला नाही. त्यामुळे भारतासारख्या देशात जिथे गोमांसावर धार्मिक बंधनं आहेत तिथे जन्मतःच त्याची अनेकदा हत्या केली जाते. खाण्याच्या चक्रातून एखादा प्राणी बाहेर पडला म्हणजे त्याची उपयोगिता राहिली नाही तर तो नष्ट होऊ शकतो. कारण हे सर्व पाळीव प्राणी प्रजननासाठी माणसावर अवलंबून असतात. जंगली प्राण्यांप्रमाणे ते स्वतः प्रजनन करू शकत नाहीत. त्यामुळेच भारतामध्ये बैलांची संख्या कमी होत आहे हे पशुगणनेवरून सहज लक्षात येतं. थोडक्यात प्राणी न खाणं म्हणजे तो प्राणी नष्ट होण्याच्या दिशेने नेणं होय.

वीगनच्या इतर दाव्यांबद्दल पुढच्या भागामध्ये चर्चा करू.

मुक्त पत्रकार आणि अन्नविषयक घडामोडींच्या अभ्यासक

shruti.sg@gmail.com

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन