वृक्षवल्ली आम्हा सोयरी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

पावसाच्या सरींसोबत एका छोट्याशा बियाण्यामुळे चिंटूची निसर्ग, वृक्षवेली आणि पर्यावरणाशी जुळलेली अनोखी मैत्री उलगडणारी ही हृद्य कथा.

नवशक्ती Web Desk

गोष्ट

प्रेमा खांडवे

पावसाच्या सरींसोबत एका छोट्याशा बियाण्यामुळे चिंटूची निसर्ग, वृक्षवेली आणि पर्यावरणाशी जुळलेली अनोखी मैत्री उलगडणारी ही हृद्य कथा.

टप टप पावसाचे टपोरे थेंब छतावर वाजू लागताच घराघरातील आम्ही मुलं अंगणात चौखुर उधळलो.

“अरे पक्या, अरे मन्या, अरे संजू या रे या,” पाऊस आला रे आला करीत पावसात धुमशान घालत नाचू लागलो, खेळू लागलो.

धुमधडाड धूम, गर्जना करीतच पावसाने कडक सलामी दिली. सोसाट्याचा थंडगार वारा आम्हा मुलांच्या कानात शिरला आणि उंडारलेल्या वासरागत आम्ही सारीच मुलं पावसात नाचू लागलो, गाऊ लागलो, येरे, येरे, पावसा...

अर्धा तास पावसाच्या धुमशान सरीत मनसोक्त भिजल्यानंतर आम्ही सारे तृप्त झालो. घरातूनही हाकारे सुरू झाले, चला रे आता घरात, बस झालं पावसात खेळणं. उद्यापासून शाळा आहे.

“अग, आई थांब ना ग पाच मिनिटं” असं करीत करीत आम्ही मुलांनी आणखी अर्धा तास धिंगाणा घातला.

सरतेशेवटी आई आता काठी घेऊन येईल या भीतीने आम्ही सारे घरात परतलो.

आज शाळेचा पहिला दिवस. अहाहा! शाळेचा पहिला दिवस किती आनंदाचा असतो ना? रात्री झोपताना उद्याच्या दिवसाची सोनपाखरं डोळ्यांत येऊन बसतात आणि रात्री स्वप्नात फडफडतात. सकाळी आईने उठवायच्या आधीच ही सोनपाखरं पापण्यांवर येऊन बसतात आणि म्हणतात,

“ए चिंटू, उठ आज शाळेचा पहिला दिवस ना, उठ लवकर आणि मग सारे चिंटू, पिंटू, टिनू, मनू असेच टुणकन उठून बसतात.

“अरे वा! आज मी हाक मारायच्या आधीच उठली स्वारी”

“अगं आई आज शाळेचा पहिला दिवस आहे ना ग!” आई तुला सांगू का पहिल्या दिवशी शाळेत जाताना खूप मज्जा वाटते. सगळं कसं नवीन असतं ना, नव्या कोऱ्या ड्रेसचा सुगंध खूप छान येतो ग. पायात चकचकीत नवीन बूट, पांढरे शुभ्र मोजे,

टाप टाप चालताना तर असं रुबाबदार वाटतं ना, एकदम भारी!”

“बरं, बरं आटपा लवकर आता, नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर व्हायचा.”

छ्या! ही मोठी माणसं एकदम बोरिंगच असतात. आईला नवीन गोष्टीचा आनंद कळतच नाही.

आता हे नवीन दप्तर कसं झपकन उघड बंद होतं. मला तर मज्जाच येते उघड बंद करताना, पण लगेच आईचा ओरडा पडतो. अरे चिंट्या सारखं सारखं उघड बंद करू नकोस. खराब होईल त्याची स्ट्रीप.

ही मोठी माणसं कायमच हिशेबी असतात. त्यांना जराही छोट्या छोट्या गोष्टीत गंमत वाटतच नाही. सतत हे खराब होईल, ते खराब होईल, हे करू नको, ते करू नको. पैसे वाया जातील, असा हिशेबच करत असतात.

“आई, आज डब्यात काय देशील ग? काहीतरी छानसं, शिरा किंवा पुरी वगैरे दे.”

“अरे, शाळेला चालला आहेस की पिकनिकला?” दादा लगेच पचकला. हा दादटला फारच खडूस आणि आगाऊ आहे.

“अरे चिंट्या, यावर्षीच्या तुझ्या नवीन टीचर आहेत ना त्या फारच मारकुट्या आहेत बरं. मी तुला आधीच सावध करतो.

“ए राजा, काहीतरी सांगू नकोस. नाही रे चिंटू चांगल्या आहेत त्या मॅडम. काही चुकीचं वागलं तरच शिक्षा देतात.”

“बघ ना ग ताई, हा दादटला मला उगीचच घाबरवतो आहे.”

“बरं बरं चिंटू महाराज, जा आता तुम्ही शाळेला.”

आज चिंटू शाळेतून परत आला तोच आनंदाने ओरडत उड्या मारत.

“आई हे बघ आज आम्हाला शाळेत मॅडमनी

काय दिलं..”

“बघू बघू दे बरं चिंट्या. अरे या तर बिया आहेत.”

“अगं हो, आम्हाला मॅडमनी या बिया कुंडीत पेरायला दिल्या आहेत. बिया कुंडीत पेरून त्याची योग्य काळजी घेऊन दोन महिन्यांनी आलेली रोपं मॅडमना नेऊन दाखवायची आहेत. आई मला एक छानशी रंगीबेरंगी कुंडी आणून देशील ना ग?”

संध्याकाळी चिंटूने रंगीबेरंगी कुंडी आणली. कुंडीतल्या मातीत पाणी घातलं आणि खोलवर हात घालून बियाणं पुरलं व कुंडी अंगणात ठेवली.

दुसऱ्या दिवशी ऑटोमधून जाताना चिंटू व सुजयच्या गप्पा रंगल्या. “सुजय, मी माझी कुंडी अंगणात ठेवली. पावसाचं टप टप पाणी कुंडीत पडेल व तो टप टप आवाज माझ्या बियांच्या कानात घुमेल. त्या बिया ते टपोरे थेंब अलगद झेलतील आणि हलके हलके मातीतून रोप बाहेर डोकावतील.”

“चिंट्या, तू अगदीच चुकीचं केलंस. अरे कुंडी बाहेर ठेवलीस तर चिमण्या त्यातले बी उकरून खाऊन टाकतील. मी तर माझी कुंडी माझ्या खोलीसमोरच्या गॅलरीत ठेवली आहे. अगदी माझ्या नजरेसमोर.

मॅडमनी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपली.

मुलांनो, आपापल्या कुंड्या उद्या घेऊन या आणि हो उद्या रंगीबेरंगी पोशाख करून या.”

अरे वा पावसाळ्याची हिरवळ आपल्या वर्गात अवतरली. चला मुलांनो, एकेकाने येथे येऊन आपली कुंडी दाखवा.

चिंटूची कुंडी बघताच साऱ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. कारण चिंटूच्या कुंडीत खूप सारी तरारलेली रोपं आली होती. गोड गुटगुटीत बाळासारखी ती मोहक दिसत होती.

त्यानंतर आला सुजयचा नंबर.

“अरे बाळा सुजय, तुझी रोपं अशी अशक्त

का बरं?”

चिंटू मध्येच ओरडला, “मॅडम, याने कुंडी गॅलरीतच आपल्या नजरेसमोर ठेवली होती.”

“होय सुजय, तू कुंडी मोकळ्या अंगणात ठेवली नाहीस.”

“मॅडम चुकलं माझं” सुजयच्या टपोऱ्या डोळ्यांत पाणी दाटलं.

अरे बाळा, रडू नकोस. अजून पावसाळा संपला नाही. मी तुला पुन्हा बियाणं देते. तू पुन्हा पेर आणि यावेळी कुंडीला खुल्या मोकळ्या वातावरणात ठेव. ऊन-वारा-पाऊस सारं मिळू दे.

बघा ज्यांनी ज्यांनी आपल्या कुंड्या मोकळ्या वातावरणात ठेवल्या त्यांची रोपटी चांगली वाढली. मुलांनो, गंमत सांगू का. त्या छोट्या छोट्या अबोध बिया असतात ना त्यांना पावसाचं संगीत जाणवतं, पावसाचा स्पर्श समजतो. तो स्पर्श त्यांच्यात चैतन्य निर्माण करतो.

मुलांनो वृक्ष, वेली, रोपं या सर्वांना आपल्यासारख्याच भावभावना असतात. तुम्हाला जसं तुमचं परिचित वातावरण लागत ना, तसंच रोपांना त्यांचं परिचित वातावरण हवं असतं. विस्तीर्ण आकाश, चमचमत ऊन, थंडगार वारा स्पर्श, असा सारा निसर्ग हाच त्यांचा खरा अधिवास! मुलांनो, वृक्षांना त्यांच्या विश्वात सुखी राहू द्या. ते आपले सखे, सोबती, जीवनदाते आहेत.

संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हां सोयरी...

जेष्ठ लेखिका

premakhandwe8@gmail. com

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च