माणसांचे पूर्वज कोण होते? 
अक्षररंग

माणसांचे पूर्वज कोण होते?

मेंदूचा आकार वाढण्यापूर्वीच माणसाने दोन पायांवर चालायला सुरुवात केली होती? आगीच्या एका शोधाने मानवी संस्कृती कशी जन्माला घातली, या उत्क्रांतीच्या चक्रातील काही रंजक आणि न ऐकलेल्या गोष्टी...

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

मेंदूचा आकार वाढण्यापूर्वीच माणसाने दोन पायांवर चालायला सुरुवात केली होती? आगीच्या एका शोधाने मानवी संस्कृती कशी जन्माला घातली, या उत्क्रांतीच्या चक्रातील काही रंजक आणि न ऐकलेल्या गोष्टी...

एखाद्याने वेडेचाळे केले किंवा वेड्यावाकड्या हालचाली केल्या तर पटकन ‘अगदी आपल्या पूर्वजांसारखा वागतो आहेस!’ म्हणून त्याची चेष्टा केली जाते. इथे माणसाचे पूर्वज म्हणजे ‘माकड’ असं जरी अभिप्रेत असलं तरी प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या चक्रात माणूस काही माकडांपासून निर्माण झालेला नाही. पण जंगलातल्या वन्यप्राण्यांतील माकडं आणि माणसं यांच्यात काही शारीरिक समानता, काही समान वर्तन पाहायला मिळतं आणि त्यामुळेच माणूस माकडापासून निपजला या चुकीच्या वचनावर पटकन विश्वास बसतो. मात्र उत्क्रांतीचा इतिहास सांगतो की माकड हा काही माणसाचा पूर्वज नाही. साधारण साडेतीन-चार कोटी वर्षांपूर्वी आजच्या माकडांचे पूर्वज पृथ्वीवर अवतरले. पुढच्या आठ-दहा कोटी वर्षांमध्ये माकडांचे वेगवेगळे प्रकार विकसित झाले. त्यातच एप्स म्हणजे कपी या गटातली माकडे निर्माण झाली. या माकडांना इतर माकडांप्रमाणे शेपटी नव्हती, हे एप्स इतर माकडांपेक्षा आकाराने मोठे होते, शिवाय त्यांचे खांदे झाडाच्या फांद्यांवर झोके घ्यायला सोयीचे होते आणि मुख्य म्हणजे एप्सचा मेंदू अधिक विकसित होता. त्यामुळे माकडांपेक्षा ते जास्त बुद्धिमान होते. म्हणूनच एप्स त्यांची भाषा विकसित करू शकले आणि त्यांना इतरांच्या भाषेचं आकलनही होऊ लागलं. मात्र एप्सच्या काही मोजक्याच प्रजाती निर्माण झाल्या आणि टिकल्या, तर माकडांच्या मात्र शेकडो प्रजाती पृथ्वीवर वेगवेगळ्या परिसरात नांदताना दिसतात.

मग या एप्समधील इतर सभासदांचं आणि माणसाचं नातं काय आहे? यातल्याच एखाद्या सभासदापासून आजचा माणूस उत्क्रांत झाला आहे का? एप्सच्या गटातले आज दिसणारे सभासद म्हणजे चिपँझी, गोरिला, ओरँग उटान, बोनोबो. या सगळ्यांचे माणसाशी म्हटले तर नाते आहे आणि नाहीही. कारण सुमारे साठ ते ऐंशी लाख वर्षांपूर्वी या एप्समधून एक वेगळा सभासद निर्माण झाला, जो आजच्या माणसाचा पूर्वज मानला जातो. जेव्हा सगळे एप्स एकसारखेच होते त्या गटाला होमिनिड असे म्हणतात, तर त्यांमधून माणूस वेगळा झाला आणि मग त्याच्या नवनवीन आवृत्त्या तयार होत गेल्या. म्हणजे आर्डिपिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, पॅरान्थ्रोपस आणि आधुनिक मानव या सगळ्यांना मिळून ‘होमिनिन’ म्हटलं जातं. या गटातले सर्वात आद्य सभासद म्हणजे सुमारे साठ ते चाळीस लाख वर्षांपूर्वीचे ओर्रोनिन, आर्डिपिथेकस, सहेलांथ्रोपस. या आदिमानवांमध्ये एप्स आणि माणूस या दोन्हीचा अंश होता. यांच्यातूनच पुढे म्हणजे साधारण पस्तीस ते वीस लाख वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलोपिथेकस हा गट विकसित झाला. या गटाची ओळख पटवणारी ‘ल्यूसी’ जगप्रसिद्ध आहे. १९७४ मध्ये इथिओपियामध्ये हा सांगाडा सापडला, ज्यात सुमारे ४०% भाग शिल्लक होता. या तीस लाख वर्षांपूर्वीच्या सांगाड्यावरून त्या काळातील माणसाची शारीरिक वैशिष्ट्ये समजायला मदत झाली. या सांगाड्यामुळेच हे सिद्ध झालं की मेंदूचा आकार वाढण्यापूर्वीच मानव दोन पायांवर सरळ उभा राहून चालायला शिकला होता. त्यामुळे शस्त्र किंवा हत्यारे तयार करण्याआधी आणि आकलनात्मक कौशल्ये विकसित करण्याआधी दोन पायांवर चालणं या गोष्टीमुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसू लागला होता.

ऑस्ट्रेलोपिथेकस नंतर होमो हा जिनस निर्माण झाला. सुमारे तेवीस ते पंचवीस लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या जिनसमुळे मानवी उत्क्रांतीने एक मोठीच उडी घेतली. पुढच्या लाखो वर्षांमध्ये होमो इरेक्टस, होमो हायडलबर्गेनसिस, होमो सेपियन्स अशा मानवाच्या अधिकाधिक सुधारित आवृत्त्या निर्माण होत गेल्या. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या माणसांच्या पूर्वजांनी एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आणि माणसाची वैयक्तिक व संघटित स्वरूपाची प्रगती होत गेली. होमो हॅबिलसने सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी दगडाची हत्यारे वापरायला सुरुवात केली. या हत्यारांमुळे त्याला शिकार करणे सोपे जाऊ लागले आणि मास कापणे, हाडे फोडणे जमू लागले. त्यामुळे त्याचा आहार अधिक प्रथिनयुक्त झाला आणि त्याच्या मेंदूचा आकार वाढू लागला. होमो इरेक्टसने सुमारे १८ लाख वर्षांपूर्वी आगीचा वापर सुरू केला. आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे अन्न शिजवून खायला सुरुवात झाली, त्यामुळे पचन सुधारले आणि मेंदूची वाढ वेगाने झाली. शिवाय थंडीपासून आणि हिंस्त्र वन्यप्राण्यांपासून आगीमुळे संरक्षण मिळाले. रात्री आगीच्या भोवती सगळे एकत्र बसू लागल्याने आपोआप संवाद सुरू झाला आणि मानवी संस्कृतीचा पहिला धागा विणला गेला.

आजच्या माणसाचा थेट पूर्वज मानला जातो तो ‘होमो सेपियन’ सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीवर अवतरला. त्यावेळी पृथ्वीवर निॲण्डरथल आणि डेनिसोवन्स या दोन गटातले मानव वावरत होते. यातले निॲण्डरथल हे साधारणपणे चार ते तीन लाख वर्षांपूर्वी अवतरले होते आणि डेनिसोवन्सही याच काळात अवतरले होते. निॲण्डरथल्स हे प्रामुख्याने युरोपमध्ये पसरलेले होते, तर डेनिसोव्हन्स हे आशिया-सायबेरियात राहात होते. डेनिसोव्हन्स मानवाचा पूर्ण सांगाडा मिळालेला नाही. त्यामुळे त्याची उंची, वजन याविषयी काही अंदाज बांधता येत नाही. पण उपलब्ध पुराव्यांवरून ते अतिशीत प्रदेशात आरामात राहात होते आणि निॲण्डरथल मानवापेक्षा अधिक दणकट होते हे लक्षात येतं. तसंच ते कशामुळे आणि नेमके कधी नामशेष झाले याची कारणेही कळू शकलेली नाहीत. निॲण्डरथल मानव हे अधिक कल्पक आणि उद्योगी म्हणता येतील. या मानवांनी साधारण ६४ हजार वर्षांपूर्वी काढलेली चित्रे स्पेनमधल्या गुहांमध्ये पाहायला मिळातात. हे आपल्या मृत बांधवांचे अंत्यसंस्कार करत होते आणि त्यांच्या स्मरणार्थ फुले वाहात होते, असंही लक्षात आलं आहे. निॲण्डरथल अन्न शिजवायला तर अग्नीचा उपयोग करतच होते पण ते शस्त्र बनवण्यासाठीही आग वापरत असत. हा गट साधारण चाळीस हजार वर्षांपूर्वी नामशेष झाला.

आज जगभरात जे मानव आहेत ते होमो सॅपियन याच गटातले आहेत. ‘होमो सेपियन’ या शब्दाचा अर्थ होतो ‘शहाणा माणूस’. आफ्रिकेत अवतरलेल्या होमो सेपियन्सनी आता सगळं जग व्यापलेलं आहे. बदलत्या आहाराच्या सवयी, भटक्या जीवनशैलीकडून स्थिरावलेल्या जगण्याकडे झालेला प्रवास यामुळे होमो सेपियन्सच्या शरीर रचनेत फरक होत गेले. त्याचबरोबर कल्पनाशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्यांमुळेही होमो सेपियन्सची प्रगती होत गेली. त्यामुळे आज पृथ्वीवर दिसणारा मानव हा याच निसर्गातून अवतरला आहे, मात्र माकड किंवा वानरांपासून उत्क्रांत झालेला नाही, तर निसर्गाने जणू एक स्वतंत्र प्राणी म्हणून मानवाला आकार दिला आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

Mumbai : सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा खीळ; पहिल्या गर्डर लाँचिंगला विलंब, १५ ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर

Mumbai : मीरा-भाईंदरमध्ये मराठी असल्याने भाड्याचे घर नाकारले; घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Thane : शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर परिवहन विभाग ताळ्यावर; ST स्टँडमध्ये पंखे, शौचालयाची मोफत सुविधा आणि नवीन खुर्च्यांची व्यवस्था

Mumbai : जे. जे. रुग्णालयातील प्रसूती विभागाचा कायापालट; दानशूरांच्या आर्थिक मदतीने नूतनीकरण