अक्षररंग

स्त्रिया आणि पाणी यातील गूढ - 'एका कवितेचा रौप्यमहोत्सव'

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा नुकताच इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय कांडर यांच्या ‘आवनओल’ या कवितासंग्रहात तिचा समावेश झाला.

नवशक्ती Web Desk

रसास्वाद

संजीवनी पाटील

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा नुकताच इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय कांडर यांच्या ‘आवनओल’ या कवितासंग्रहात तिचा समावेश झाला. ही कविता चिरंतन आहे, असं कौतुक ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांनी त्यावेळी केलं होतं. समीक्षक, नामवंत साहित्यिक यांनी नावाजलेल्या या कवितेचा आजवर चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश झालेला आहे. तिचा हिंदी आणि उर्दू भाषेत अनुवादही झाला आहे. गेली २५ वर्षं ही कविता सतत चर्चेत आहे.

मराठी कवितेच्या प्रांतात काही कविता लोकप्रिय होतात, तर काही कविता वाचकांशी थेट संवाद साधतात. त्यांच्या मनालाच साद घालत राहतात. अशीच एक कविता म्हणजे कवी अजय कांडर यांची ‘बाया पाण्याशीच बोलतात’ ही होय. यावर्षी तिला पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत.

‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेची निर्मिती आणि आपल्या समाजात जागतिकीकरणाचा झालेला प्रवेश जवळजवळ एकाच टप्प्यावरचे आहेत. आज जागतिकीकरणाने काही विकासाच्या वाटा समाजात निर्माण झाल्यात, पण त्या वाटेवर पाण्याचे दुर्भिक्ष्य आजही आहे. अशा वेळेला ही कविता म्हणजे पाण्याच्या काठावर उभी राहात, बायांची व्यथा मांडत एक सामाजिक पट उभी करते. म्हणूनच या कवितेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष चर्चासत्र आयोजित करावं असं ‘संस्कृती प्रतिष्ठान’, इचलकरंजी यांना वाटलं. २८ सप्टेंबरला ‘नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स’, इचलकरंजी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला.

या कवितेतून पाणी आणि स्त्री याचा सहबंध उलगडत जातो. त्यामध्ये जसं वास्तवाचं चित्र येतं तसंच प्रतीकात्मक अर्थसूचनही येतं. सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक संवेदन ताकदीनिशी व्यक्त करणारी ही कविता अधिक अर्थवलयांची नांदी ठरते. अवघ्या आठ ओळींच्या रचनाबंधामध्ये कवितेतून हे चित्र उभे करताना कवी अजय कांडर यांनी निसर्गातील पाणी हा केंद्रबिंदू वापरून स्त्रीविषयक जाणिवांचा एक प्रदेशच अधोरेखित केलेला आहे. वाढत्या उन्हाळ्यातील तिचं तुटक होत जाणं म्हणूनच फक्त पाण्याशी निगडित राहत नाही, तर ते स्त्री-पुरुष नात्याकडेही एक बोट दाखवतं. हे बोट आहे सहसंवेदनाचं. जर हे सहसंवेदन अधिक आश्वासक, उबदार असेल तर कदाचित झराही आटणार नाही आणि तीही सुकणार नाही. तिच्या मनातील भावविश्व पाण्यासारखेच नितळ, पारदर्शी आणि तितकेच भावपूर्ण होईल. कवितेतील ही प्रतीकात्मकता अशी उमजून घ्यायला हवी.

कवितेचं शीर्षकच इतकं बोलकं आहे की त्यातून बाई आणि पाणी यांचं नातं अधोरेखित होतं. ग्रामीण कष्टकरी स्त्रीला ज्या अनेक गोष्टींसाठी झगडावं लागतं त्यामध्ये पाण्याचाही समावेश आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि त्यासाठी झुंजणारी स्त्री हे वास्तव आजही आहे. उन्हाळा सुरू व्हायच्या आधी आणि सुरू झाल्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये गावोगावच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या बातम्या असतात. पाण्याचे टँकर, पाण्यासाठी लागलेल्या बायांच्या रांगा, तळ गाठलेल्या कोरड्याठक्क विहिरी आणि त्या तळापर्यंत कसरत करत पोहोचणाऱ्या बाया असे प्रातिनिधिक फोटो असतात. हे प्रातिनिधिक चित्र म्हणजे या कवितेतून येणारे प्रारूप आहे.

ग्रामीण भागातील उन्हाळ्याच्या दिवसांमधल्या स्त्री जीवनाचं हे वास्तव आहे. घरातील केरकचरा, स्वयंपाक, धुणीभांडी, लहान-मोठ्यांचं खाणं आणि यासोबतच पाणी शोधणं हे तिचं काम असतं. ही पायपीट वाढत्या उन्हाळ्यात वाढतच जाते. या पायपिटीतच दिवसभराचं रहाटगाडगं ती ओढते. शेतातही जाते. तिचा दिवस असाच जातो. झोपतानाही तिच्या डोक्यात उद्याच्या पाण्याचं गणित असतं आणि नवी पहाट पुन्हा तशीच सुरू होते.

स्त्रीच्या मनातील हे ‘पाणी विश्व’ जितक्या तीव्रपणे भयावह होत जातं तितक्याच गतीनं तीही सुकत जाते तनामनाने. म्हणूनच हे विश्व तिच्या अंतरंगाचंही आहे. तिला पाण्यासारख्याच नितळ भावनांचा झरा अपेक्षित आहे. तिच्याही मनाला थेंबभर मायेचे शब्द हवे असतात. ही माया ज्या जोडीदाराकडून मिळायला हवी, तिथं बरेचदा आटलेपण असतं. हे आटलेपण स्वीकारून तिला मात्र आहे त्याच गतीनं चालावं लागतं. अशा कोरड्या वाटचालीत तिचा जीव आतून ओलावा हरवत जातो. आतील हरवलेल्या ओलाव्याचा हा धागा शब्दात ओवताना कविता अधिकाधिक गडद होत जाते. साहित्याच्या दृष्टीने विचार केल्यास आतापर्यंत पाणी निर्मळ, शितल, जीवनदायी याच आशयाने कवितेतून येत होतं. पण बायांच्या कवितेतून आलेल्या या पाण्याने त्यातील हा आशयच बदलून टाकला. स्त्री आणि पाणी यांच्या नात्याला अधोरेखित करत आधुनिक ग्रामजीवनातील स्त्रीची व्यथा शब्दातून चित्रित केली.

अशा या कवितेच्या रौप्यमहोत्सवी विशेष चर्चासत्राच्या निमित्ताने समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे, कवी रफिक सुरज आणि कवी एकनाथ पाटील यांनी या कवितेचा एक-एक धागा उलगडत, त्यातील आशय-विषयाचा प्रतिमाबंध रसिक प्रेक्षकांसमोर मांडला. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी मराठी कवितेतील पाण्याच्या संदर्भात येणारे साहित्य आणि त्यामध्ये असणारे या कवितेचे वेगळेपण यावर प्रकाश टाकत कवितेमधील चित्रणाचा वेध घेतला. कवी एकनाथ पाटील यांनी या कवितेची प्रादेशिकता समोर ठेवत तेथील समाजजीवन आणि पती-पत्नी नाते यावर प्रकाश टाकत एका वेगळ्या दृष्टिकोनातून या अनुबंधाचा शोध घेतला. सुचकता आणि अनेकार्थता याची एकेक पायरी चढणारी ही कविता पंचवीस वर्षांपूर्वीचा कोकणातील चाकरमानी आणि त्याची पत्नी यातील वास्तव मांडते. तिचा होणारा भावनिक कोंडमारा, शारीरतेचे दमन करणारी ही स्त्री तहानलेली आहे. या अर्थाने स्वतःवरच पहारा ठेवणारी ती आणि मुका होत जाणारा झरा हे सूचन अधिक बोलके होते. या सूचकार्थाने भावनिक तहान वाढविणारा ताण तिच्या वेदनेच्या मुळाशी आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

प्रतीकात्मकतेच्या संदर्भाने बोलताना रफिक सुरज यांनी त्यातील स्त्री-पुरुष मनाचे पदर उलगडले. ‘बाई’ ‘पाणी’ आणि ‘बोलणे’ या तीन शब्दांच्या संदर्भातून ही कविता कथनात्मकतेच्या अंगाने येते. दोन विरोधात्मक शब्दांच्या मधून येणारी रचना एका समांतर भावनेतून व्यक्त होते. संवाद साधण्यासाठी इच्छुक असणारी ती आणि मुका होत जाणारा झरा यांचे एक अस्वस्थ करणारे,मनाला भिडणारे चित्रण म्हणजे ही कविता आहे.

साहित्याच्या प्रांतात केवळ एका कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा होणे, अशी ही एकमेव घटना आहे. या कवितेचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झालेले आहेत. याच कवितेवर आधारित ‘कळत्या न कळत्या वयात’ या नाटिकेची निर्मिती झालेली आहे. कवितेच्या निमित्ताने जेव्हा अशी गोष्ट घडते, तेव्हा ती कविता फार उंचीवर पोहोचते. अशी ही रौप्यमहोत्सवाची मानकरी ठरलेली कविता..बाया पाण्याशीच बोलतात!

बाया पाण्याशीच बोलतात
एक घागर भरत नाही, दुसरी रिकामीच, तरी रांगाच रांगा जातात वाढत बाया झऱ्यापाशी उभ्या, आटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत. डुंगलीतील झरा वाचवू पाहतोय जीव, तिथे सर्वांचेच प्राण तहानलेले चढणीचा घाट चढून उतरून बायांच्या पायांत गोळे आणि डोळे ओले. सुकून जावा कोंब तसा वाळून गेला जीव, सोसून उन्हाच्या झळा थेंबाथेंबानेच पाणी त्या करू पाहतात आपल्याशी गोळा. किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना दिवसरात्र बाया पाण्याशीच बोलतात, झरा मुका होत जाताना.

साहित्याच्या अभ्यासक व आस्वादक

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

ओबीसी नेते आक्रमक! २ सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी, १० ऑक्टोबरच्या मोर्चावरही ठाम

राज्यात १२ ऑक्टोबरनंतर पावसाची 'एक्झिट'; ६ ते ८ दरम्यान पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज