गोष्ट
प्रेमा खांडवे
माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारी संजू आणि गब्बूची गोष्ट.
शाळेची व्हॅन सायनतारा इमारतीसमोर येऊन थांबली आणि आम्हा दहा-बारा मुलांचा घोळका गाडीतून खाली उतरला. संजू, नितीन आणि मनीष यांनी ठरवलं की घरी जाऊन पटकन खाऊन-पिऊन खेळायला यायचं आणि सगळी मंडळी पसार झाली.
संजूने घरी येताच लाडात गाणं गात गात आईकडे खेळायला जाण्यासाठी लवकर खायला मागितलं. पण आईने त्याला आधी हात-पाय धुवायला, कपड्यांची नीट घडी करून कपाटात ठेवायला आणि बूट-मोजे व्यवस्थित जागच्या जागी ठेवायला सांगितलं. तसं केल्याशिवाय खायला मिळणार नाही, असं आईने स्पष्ट बजावलं. संजूने आईचं ऐकलं आणि तो डायनिंग टेबलवर आला. आईने त्याचा आवडता पास्ता केला होता. पास्ता खाताना संजूने शाळेत झालेली एक मज्जा सांगितली. त्यांच्या वर्गात पावसात ओलं झालेलं मांजराचं एक छोटं, थरथरणारं पिल्लू आलं होतं. मधल्या सुट्टीत सगळ्या मुलांनी नॅपकिनने पुसून त्याला कोरडं केलं, तेव्हा कुठे त्याची थरथर थांबली.
आईने विचारलं, “तुला मांजराची भीती नाही वाटली?”
संजू म्हणाला, “नाही गं, मला फक्त कुत्र्यांची खूप भीती वाटते. ते भो भो करत मागे धावतात ना, तेव्हा चावतील की काय अशी भीती वाटते.”
आईने त्याची समजूत काढली की, “अरे कुत्रे-मांजर हे पाळीव प्राणी आहेत आणि ते माणसाचे मित्र असतात. आपण त्यांच्याशी प्रेमाने वागलो की तेही आपल्याशी प्रेमाने वागतात.” आईने असंही सुचवलं की, “आपण घरी एखादा कुत्रा पाळूया, म्हणजे तुझी भीती पळून जाईल.” हे ऐकून संजूने आनंदाने पास्ता संपवला. जाताना आईने दिलेली पाण्याची बाटली आणि एक केळं घेऊन तो मैदानात धावला.
मैदानावर सगळं टोळकं जमलं आणि क्रिकेटचा खेळ सुरू झाला. पण काही वेळातच बॅट आणि बॉल ज्यांच्या मालकीचे होते, त्यांच्यात जास्त वेळ बॅटिंग आणि बॉलिंग करण्यावरून वाद सुरू झाला. इतरांनी चिडून त्यांना चान्स देण्यावरून टोकलं, तेव्हा बॅट-बॉलच्या मालकांनी ‘आमच्या वस्तू आहेत, म्हणून आमचाच जास्त हक्क’असा हेका धरला. मग मुलांनी दुसरा खेळ खेळायचं ठरवलं. पण संजूने कुत्र्यांच्या भीतीने धावाधावीचा खेळ खेळायला नकार दिला. ‘तळ्यात की मळ्यात’ खेळण्यावरूनही मुलांमध्ये मतभेद झाले. भांडणात वेळ वाया जातोय हे पाहून अखेर दोन्ही बाजूंचा समेट झाला. सर्वांना दोन-दोनदा चान्स मिळण्याचं ठरलं आणि क्रिकेटचा खेळ पुन्हा जोमाने रंगला.
खेळात इतका वेळ गेला की कधी अंधार झाला ते कोणाला कळलंच नाही. घरी ओरडा पडेल या भीतीने मुलं निघायला लागली. एका मुलाने तळमजल्यावरील अंधाराची भीती व्यक्त केली, तेव्हा संजू त्याला ‘भित्री भागुबाई’ म्हणून हसला. त्यावर त्या मुलाने संजूला त्याच्या कुत्र्यांच्या भीतीची आठवण करून दिली.
संजू म्हणाला, “अरे, कुत्रा सजीव आहे म्हणून भीती वाटते, अंधाराला काय जीव असतो होय? लाईट लावला की गायब!”
सगळी मुलं आपापल्या घरी गेली. संजू घराकडे निघाला असताना त्याला आईने दिलेलं केळं आठवलं. त्याने केळं सोलून तोंडात एक तुकडा टाकला. त्याच क्षणी झोपड्यांसमोर घुटमळणाऱ्या एका बेवारस कुत्र्याने त्याला पाहिलं आणि ते भुंकत त्याच्या मागे लागलं. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या न्यायाने संजू रडत-धावत सुटला, तसा तो कुत्रा अधिकच त्वेषाने त्याच्या मागे धावला. संजू दुसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटकडे धावणार, इतक्यात कुत्रा अगदी जवळ आला. संजूने गॅलरीतील कुंड्यांच्या मागे आसरा घेतला. पण कुत्र्याने कुंड्यांना जोरदार धडक दिली आणि संजू धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या रडण्याचा आणि पडण्याचा खूप मोठा आवाज झाला.
इमारतीतील लोक दरवाजे उघडून बाहेर आले. संजूला कुत्र्यांची भीती वाटते हे माहिती असल्यामुळे लोकांनी त्या कुत्र्याला पकडून मारलं आणि म्युनिसिपाल्टीच्या स्वाधीन केलं. आईने संजूला घरी आणून औषध लावलं आणि झोपवलं.
पण संजूच्या डोळ्यांसमोर कुत्र्याची ती केविलवाणी नजर सारखी येत होती. त्याच्या मनात विचार आले की, ‘हे कुत्रे बेवारस का फिरतात? त्यांना जर घर आणि खायला मिळालं, तर ते कुणाच्याच मागे धावणार नाहीत. कदाचित माझ्या हातातलं केळं पाहून त्याला भूक लागली असेल, म्हणून तो मागे लागला असावा. मी जर त्याला केळं दिलं असतं, तर हा अनर्थ टळला असता. माझ्यामुळे उगीच त्याला पिंजऱ्यात नेलं.’
तिकडे पिंजऱ्यात बसलेला तो बेवारस छोटा कुत्राही मनोमन पश्चात्ताप करत होता, ‘माझं चुकलं, मी केळ्यासाठी त्या लहान पोराच्या मागे धावायला नको होतं. मला खूप भूक लागली होती म्हणून माझी चिडचिड झाली होती. देवा, मला बोलता येत नाही, नाहीतर मी प्रेमळ स्वरात केळं मागितलं असतं. मला क्षमा कर!’ वर स्वर्गात बसलेला देवबाप्पाही विचारात पडला की, दोष नक्की कोणाचा? माणूस आणि प्राण्यांमधील हा संघर्ष कसा सुटावा?
दुसऱ्या दिवशी संजू बाबांना म्हणाला, “बाबा, आपण एखाद्या बेवारस कुत्र्याला घरी घेऊन येऊया. आता मी कुत्र्याला घाबरणार नाही, उलट त्याच्याशी दोस्ती करीन. कुत्रा आपला शत्रू नाही, त्याला बोलता येत नाही म्हणून आपणच त्याला समजून घेतलं पाहिजे.”
संजूचा हा समंजसपणा पाहून बाबांनी दुसऱ्याच दिवशी म्युनिसिपाल्टीच्या ऑफिसातून त्याच छोट्या कुत्र्याला घरी आणलं. संजूने त्याला छान आंघोळ घातली, गळ्यात सुंदर पट्टा बांधला, बसायला पोतं आणि खायला दूध-पोळी दिली. संजूने लाडाने त्याचं नाव ‘गब्बू’ ठेवलं. आता गब्बू आणि संजूची मस्त मैत्री झाली होती. स्वर्गातील देवबाप्पालाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्यांनी प्रसन्न होऊन ‘तथास्तु’ म्हटलं.
ज्येष्ठ लेखिका
premakhandwe8@gmail. com