मुंबई : देशातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने जगातील पहिली CNG बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने तिला फ्रीडम असं नाव दिलं आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या गेल्या काही काळापासून जगभर विकल्या जात आहेत, पण सीएनजीवर चालणारी मोटारसायकल पहिल्यांदाच बाजारात आली आहे. कंपनीने या नव्या सीएनजी बाईकला तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन टँक बसवण्यात आले आहेत.
Bajaj Freedom CNG किंमत आणि फीचर्स: बजाज फ्रीडम ड्रम व्हेरियंटची किंमत ९५,००० रुपये, ड्रम एलईडी व्हेरियंटची किंमत १,०५,००० रुपये आणि टॉप डिस्क व्हेरियंटची किंमत १, १०,००० रुपये (एक्स शोरूम) आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, बजाज फ्रीडम १२५ सीएनजी बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. तिची डिलिव्हरी सर्वप्रथम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू होईल. यानंतर, उर्वरित राज्यांमध्ये वितरण केले जाईल. तुम्ही ती सात ड्युअल-टोन कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
Bajaj Freedom CNG डिझाईन: फ्रीडम सीएनजी बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास बजाज फ्रीडम सीएनजीला स्पोर्टी स्टाईल लूक देण्यात आला आहे. एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ग्राफिक्ससह ड्युअल कलर स्कीम आणि लिंक्ड मोनोशॉक सस्पेन्शन यांसारखी खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
लांब सीट असलेली नवी फ्रीडम 125 सीएनजी बाईक बजाजने सादर केली आहे. बाईकमध्ये दोन लिटरची पेट्रोल टाकी आणि दोन किलोची सीएनजी टाकी आहे. ही बाईक चालवण्यासाठी प्रति किलोमीटर १ रुपये खर्च येईल, असा कंपनीचा दावा आहे.
बाईकच्या सीटखाली सीएनजी टाकी देण्यात आली आहे. इंधन टाकी नेहमीच्या बाईक सारखीच आहे. दोन्हींसाठी कॉमन कॅप देण्यात आली आहे. म्हणजे एकच पॉइंट उघडून तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही भरू शकता.
Bajaj Freedom CNG पॉवरट्रेन आणि मायलेज: बजाज फ्रीडममध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ९.५ पीएस पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर चालू शकते. सीटखाली सीएनजी टाकी देण्यात आली आहे.
कंपनीचा दावा आहे की, बजाज फ्रीडम दोन्ही इंधनांसह एकूण ३३० किलोमीटर अंतर कापते. याशिवाय, बजाज फ्रीडममध्ये हँडलबारच्या उजव्या बाजूला एक स्विच दिलेला आहे, जो दाबून तुम्ही पेट्रोलवरून सीएनजीवर स्विच करू शकता.
बजाजचा दावा आहे की फ्रीडम १२५ सीएनजी इंधनासह २१३ किलोमीटर अंतर कापू शकते, तर पेट्रोलसह ११७ किलोमीटर अंतर कापू शकते. एकूण ३३० किलोमीटरचा प्रवास आरामात करू शकता.
बजाज फ्रीडम १२५ मध्ये उत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्ससाठी डिस्क आणि ड्रम ब्रेक्सचा पर्याय आहे. याशिवाय बाईकमध्ये १७ इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारपेठेत या बाईकची कोणत्याही बाईकशी थेट स्पर्धा नाही.