मुंबई: पुढील वर्षी भारतात पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी येऊ शकते. होय, तुम्ही बरोबर वाचलं! देशात लवकरच आकाशात उडणाऱ्या टॅक्सी दिसणार आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या पुढाकाराने ePlane कंपनीने विकसित केलेल्या प्रोटोटाइपची छायाचित्रे त्यांनी शेअर केली आहेत.
फ्लाईंग टॅक्सीचा कमाल वेग २०० किमी प्रतितास-
प्राथमिक माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी 200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम असेल. हेलिकॉप्टरप्रमाणे ती सरळ वर उडण्यास आणि खाली उतरण्यास सक्षम असेल. फ्लाइंग टॅक्सीची क्षमता 200 किलोग्रॅम असेल, म्हणजेच ती एकाच वेळी दोन प्रवासी सहजपणे वाहून नेऊ शकते. तिचा सामान्य वेग 160 किलोमीटर प्रति तास असेल, तर कमाल वेग ताशी 200 किलोमीटर असू शकतो.
आनंद महिंद्रांनी शेअर केले फ्लाईंग टॅक्सीचे फोटो-
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टमध्ये ही माहिती शेअर करताना म्हटले आहे की, "आयआयटी मद्रासमधील एक कंपनी पुढील वर्षी फ्लाइंग इलेक्ट्रिक टॅक्सी बनवणार आहे."
महिंद्रा यांनी आयआयटी मद्रासचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की "आयआयटी मद्रास हे जगातील सर्वोत्तम इनक्यूबेटर्सपैकी एक बनले आहे. त्यांच्यामुळे, भारताकडं यापुढे असा देश म्हणून पाहिलं जाणार नाही, जिथं नाविण्यपूर्ण गोष्टी साकारल्या जात नाहीत."
रोड टॅक्सीच्या तुलनेत १० पट वेगवान-
ePlane कंपनीचे हे दोन आसनी इलेक्ट्रिक एअर व्हेइकल ePlane e200 म्हणून ओळखले जाईल. शहरामध्ये प्रवास करण्यासाठी आणि वस्तू वाहून नेण्यासाठी ती उपयोगी ठरू शकेल. रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक टॅक्सी रोड टॅक्सीच्या तुलनेत 10 पट वेगवान असू शकतात. भारतात इलेक्ट्रिक एअर टॅक्सी आल्याने शहरांमधील रस्त्यांच्या जामची मोठी समस्या देखील टाळता येईल. इलेक्ट्रिक टॅक्सी हवेत उडून ट्रॅफिक जाम टाळू शकतात, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल.
दुर्गम भागात पोहोचण्यास सक्षम-
इलेक्ट्रिक टॅक्सीमुळे प्रदूषण होणार नाही. अशा परिस्थितीत, भारतातील जी शहरे वायू प्रदूषणाच्या समस्येशी झुंज देत आहेत, त्यांच्यासाठी ती फायदेशीर ठरेल. तसेच इलेक्ट्रिक टॅक्सी रस्ते नसलेल्या भागातही पोहोचू शकते. जे दुर्गम भागात राहतात किंवा ज्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक आहे, अशांसाठी ही उडणारी टॅक्सी विशेष फायदेशीर ठरेल.