बिझनेस

‘हाऊ इंडिया इट्स’चा अहवाल; अन्न सेवा बाजारपेठ १२५ अब्ज डॉलरवर जाणार

भारताची अन्न सेवा बाजारपेठ २०३० पर्यंत १२५ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या पातळीच्या तुलनेत संघटित क्षेत्र दुप्पट वाढून असंघटित क्षेत्राला मागे टाकेल, असे एका अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताची अन्न सेवा बाजारपेठ २०३० पर्यंत १२५ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या पातळीच्या तुलनेत संघटित क्षेत्र दुप्पट वाढून असंघटित क्षेत्राला मागे टाकेल, असे एका अहवालात म्हटले आहे.

सध्या भारतातील अन्न सेवेची बाजारपेठ अंदाजे ७८ अब्ज डॉलरची आहे, असे स्विगी आणि कर्नी यांच्या ‘हाऊ इंडिया ईट्स’ या अहवालात नमूद केले आहे.

२०१९ मध्ये अन्न सेवा बाजारपेठ ४९ अब्ज डॉलर होते. ते २०३० पर्यंत १२५ अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. एकूण वाढीपैकी ६० टक्क्यांहून अधिक वाढ संघटित क्षेत्रामुळे होईल आणि ते असंघटित क्षेत्राला मागे टाकेल, असेही त्यात नमूद केले आहे.

देशाचा प्रति व्यक्ती विकास दर वाढल्यास अन्न सेवांवरील खर्च वाढतो. येत्या सात वर्षांत भारताचा हा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल. सध्या भारताचा अन्न सेवा क्षेत्राचा जीडीपीमध्ये हातभार १.९ टक्के आहे, तर चीनमध्ये तो ५ टक्के आणि ब्राझीलमध्ये ६ टक्के आहे. त्यामुळे भारतात या क्षेत्रात मोठी वाढीची संधी आहे.

“ही वाढ ही अटळ ग्राहक मागणी आणि सक्षम पुरवठा यांचा परिणाम आहे,” असे अहवाल म्हणतो. क्लाउड किचन, क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स) आणि डेझर्ट पार्लर हे सरासरीपेक्षा जास्त वाढ दाखवत अग्रभागी राहतील.

वाढते उत्पन्न, डिजिटल स्वीकार आणि सोयीसाठी वाढलेल्या मागणीमुळे अन्न सेवा क्षेत्राची वाढ होत असली, तरी भारतीय ग्राहक आता अधिक प्रयोगशील झाले आहेत. प्रत्येक ग्राहकाने मागवलेल्या वेगवेगळ्या खाद्य प्रकारांमध्ये २० टक्क्यांची वाढ आणि ऑर्डर दिलेल्या रेस्टॉरंट्सच्या संख्येत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

आरोग्यदायी आणि ‘बेटर-फॉर-यू’ प्रकारातील जेवणांची मागणी एकूण ऑर्डर्सपेक्षा २.३ पट वेगाने वाढत आहे. यात प्रथिनांचे सेवन वाढवणे, कॅलरीकडे लक्ष देणे आणि जास्त साखर टाळणे यावर भर दिला जात आहे.

गोमंतक, बिहारी पाककृतींची मागणी वाढतेय

गोमंतक, बिहारी आणि पहाडी अशा हायपर-प्रादेशिक पाककृती मुख्य प्रवाहातील पाककृतींपेक्षा २ ते ८ पट वेगाने वाढताना दिसत आहेत. त्याच वेळी कोरियन, व्हिएतनामी आणि मेक्सिकन पाककृती अनुक्रमे १७ पट, ६ पट आणि ३.७ पट वेगाने मुख्य प्रवाहात येत आहेत.

ताक, सरबतांची मागणी वेगाने वाढली

ताक आणि सरबत ४ ते ६ पट वेगाने वाढत आहेत. ज्यामुळे जागतिक क्यूएसआरना भारतासाठी नवकल्पना करण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्याचबरोबर ‘बोबा टी’ आणि ‘मॅचा टी’ यांच्या शोधांमध्ये अनुक्रमे ११ पट आणि ४ पट वाढ झाली आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट