बिझनेस

एसआयपीतील गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर; शेअर बाजाराच्या तुलनेत म्युच्युअल फंडांची उजवी कामगिरी

एप्रिल २०१६ मध्ये एसआयपीचा प्रवाह ३,१२२ कोटी रुपये होता आणि मार्च २०२० मध्ये ८,५०० कोटी रुपयांवर पोहोचला होता. कोविड-१९ नंतर एसआयपी गुंतवणुकीने आणखी वेग घेतला आणि सप्टेंबर २०२१ मध्ये प्रथमच १० हजार कोटी रुपयांची पातळी ओलांडली आणि त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये प्रथमच २० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला.

Swapnil S

मुंबई : नकारात्मक कामगिरी केलेल्या गेल्या महिन्यात देशात म्युच्युअल फंडांची एसआयपी मात्र विक्रमी टप्प्यावर राहिली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये २४.१९ लाख एसआयपी खाती जोडली गेली आहेत. तर एसआयपीतील रक्कम गेला महिनाअखेर विक्रमी अशा २५ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.

म्युच्युअल फंडातील मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे गुंतवणुकीने शेअर बाजारातील कामगिरीच्या तुलनेत लक्षणीय प्रवास नोंदविला आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (अम्फी) या म्युच्युअल फंडांसाठी उद्योग संघटनेने ११ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीमध्ये असे दिसून आले की, ऑक्टोबरमध्ये एसआयपीतील रक्कम २५,३२२.७४ कोटी रुपये राहिली. आधीच्या महिन्यातील- सप्टेंबरमधील २४,५०९ कोटी रुपयांच्या तुलनेत हा सार्वकालीन उच्चांक आहे.

सप्टेंबरमधील ९.८७ कोटींच्या तुलनेत ऑक्टोबर २०२४ मध्ये एसआयपी खात्यांची संख्या आतापर्यंतची सर्वोच्च १०.१२ कोटी होती. ऑक्टोबरमध्ये निव्वळ २४.१९ लाख एसआयपी खाती जोडली गेली. ती भारतीय बाजारांवर किरकोळ गुंतवणूकदारांची उत्साही भूमिका दर्शवते. ऑक्टोबर २०२४ मध्ये नोंदणीकृत नवीन एसआयपीची संख्या ६३.६९ लाख होती.

गेल्या महिन्यात शेअर बाजाराच्या कमकुवत कामगिरीमुळे एसआयपीमध्ये वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ५.७७ टक्के आणि ६.२२ टक्के घसरले.

मालमत्ता व्यवस्थापनाखालील एसआयपी याआधी ऑगस्ट २०२४ च्या १३.३९ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर २०२४ मध्ये १३.८१ लाख कोटी रुपयांचा उच्चांक गाठला होता.

ऑक्टोबरमध्ये नुकसानामुळे एसआयपीतील रक्कम महिन्याच्या अखेरीस १३.३० लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. एकूणच गेल्या महिन्यातील आकडेवारीवरून ओपन-एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रवाह मासिक आधारावर २१.६९ टक्क्यांनी वाढून ऑक्टोबरमध्ये संपूर्ण इक्विटी फंड विभागामध्ये ४१,८८७ कोटी रुपये झाल्याचे स्पष्ट होते.

अम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चालसानी यांनी सांगितले की, एसआयपी खात्यांमधील सततची वाढ ही आता २५,३२२.७४ कोटी रुपयांच्या विक्रमी मासिक एसआयपी योगदानासह १०.१२ कोटींहून अधिक आहे. ही बाब भारतीय गुंतवणूकदारांमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीला वाढणारी पसंती दर्शवते. म्युच्युअल फंड हे प्रत्येक भारतीय गुंतवणूकदारासाठी संपत्ती निर्मितीचा आधारस्तंभ बनवत आहे. म्युच्युअल फंडांच्या एसआयपीद्वारे २०१६-१७ पासून सातत्याने वाढ होत आहे.

जर्मिनेट इन्व्हेस्टर सर्व्हिसेसचे सह-संस्थापक आणि मुख्याधिकारी संतोष जोसेफ यांनी सांगितले की, ऑक्टोबरमधील गुंतवणुकीचा कल हा अभूतपूर्व आहे. शेअर बाजारातील वाढीच्या पार्श्वभूमीवर फंडातील निधी ओघ लक्षणीय आहे. लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये मोठी निधीआवक तसेच क्षेत्रीय आणि थीमॅटिक फंडांमध्ये सतत स्वारस्य हे गुंतवणूकदार याकडे लक्ष देत असल्याचे सूचित करते. अल्पकालीन बाजारातील चढउतारांच्या पलीकडे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे, हे गुंतवणूकदारांचे ध्येय असल्याचेही यातून दिसते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी