बिझनेस

RBI ची कारवाई; मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध; चिंताग्रस्त खातेदारांची बँकेबाहेर गर्दी

खातेदारांना त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यांमधून पैसे काढता येणार नाहीत. तसेच, बँकेला नवीन कर्ज देणे, विद्यमान कर्जांचे नूतनीकरण करणे, नवीन ठेवी स्वीकारणे आणि कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता, १३ फेब्रुवारी २०२५ पासून बँकेला नवीन कर्ज देणे, विद्यमान कर्जांचे नूतनीकरण करणे, नवीन ठेवी स्वीकारणे आणि कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यांमधून पैसे काढता येणार नाहीत.

RBI ने बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत निरीक्षण केल्यानंतर निर्बंधांची अंमलबजावणी केली आहे. खातेदारांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांसाठी हे निर्बंध राहणार आहेत. या बँकेच्या व्यवहारांवर लक्ष असेल, असे आरबीआयने सांगितले आहे. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि बँकेच्या आर्थिक स्थितीला स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेच्या परिस्थितीनुसार, या निर्बंधांमध्ये बदल किंवा शिथिलता आणली जाऊ शकते.

मार्च २०२४ अखेरीस, बँकेकडे एकूण २,४३६ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. RBI च्या ठेवी विमा योजनेनुसार, पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या रकमेपैकी ५ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम काढता येऊ शकेल. त्यासाठी ठेवीदारांनी बँकेकडे आपले दावे सादर करावेत.

दरम्यान, बचत किंवा चालू खात्यांमधून कोणतीही रक्कम काढण्यास मनाई केल्यामुळे बँकेच्या अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर खातेदारांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक खातेदार, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला बँकेच्या बाहेर रांगेत उभे आहेत. खातेदारांना ठेवींबाबत कमालीची चिंता वाटत असून, बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video