मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२५ मध्ये दोनवेळा व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केल्यानंतर शुक्रवारी ०.५० टक्क्यांची व्याजदर कपात करून हॅटट्रिक केली आहे. या वर्षात आतापर्यंत आरबीआयने व्याजदरात १ टक्का कपात केली. यामुळे गृह, वाहन व वैयक्तिक कर्ज स्वस्त होण्यास मदत मिळणार आहे.
आरबीआयचे द्विमासिक पतधोरण गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले. यापूर्वी फेब्रुवारी व एप्रिलमध्ये अनुक्रमे ०.२५ टक्के कपात करण्यात आली होती.
रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात करून तो ५.५ टक्के केला आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने लोक घर खरेदी करण्यापासून परावृत्त होताना दिसत आहेत. तसेच आरबीआयने ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (सीआरआर) १०० बेसिस पॉइंटने घटवले. हा दर ४ वरून ३ टक्के केला. ‘सीआरआर’ कमी झाल्याने अतिरिक्त २.५ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतील.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, रेपो दरात कपात केल्याने देशात गुंतवणूकदारांना मोठ्या संधी मिळतील. जागतिक विकास दर रोडावला असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल. तसेच घरगुती मागणी अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न केले जातील.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲॅल्युमिनियम व पोलादाचे टॅरिफ ५० टक्के केले आहे. भारत हा दोन्ही उत्पादनाचा मोठा निर्यातदार देश आहे. हा भारताला मोठा झटका आहे.
भविष्यात व्याजदर कपात कमी होणार
सीआरआर व रेपो दरात कपात केल्याने गृह कर्जावरील व्याजदरात कपात करणे सोपे होणार आहे. आतापर्यंत रेपो दरात १०० बेसिस पॉइंट कपात केल्याने भविष्यात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता कमी आहे.
गृह कर्जाचे पैसे किती वाचतील?
२० वर्षांवरील ५० लाखांच्या गृहकर्जावरील ‘ईएमआय’ ३,१६४ रुपये दरमहा कमी होणार आहे. एक कोटी व दीड कोटीच्या कर्जासाठी ६,३२९ रुपये ९,४९३ रुपये ‘ईएमआय’ कपात होईल.
महागाई ३.७ टक्के राहण्याचा अंदाज
आरबीआयने २०२५-२६ साठी महागाईचा दर घटवून ३.७ टक्क्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. देशातील महागाईचा दर आरबीआयच्या निकषापेक्षा खूपच कमी झाला आहे.
विकास दर ६.५ टक्के राहणार
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विकास दर ६.५ टक्के राहील. विकास दर पहिल्या तिमाहीत ६.५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.७ टक्के, तर तिसऱ्या तिमाहीत ६.६ टक्के, तर चौथ्या तिमाहीत ६.३ टक्के राहील.
सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्के कर्ज मिळणार
आरबीआयने सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्के कर्ज देण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास परवानगी होती. मात्र, ही सवलत २.५ लाख रुपयांच्या कर्जापर्यंत मिळणार आहे.