नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय आणि बँकांनी कर्जरकमेच्या दुप्पट वसुली केल्याने या प्रकरणी दिलासा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे फरारी उद्योगपती विजय मल्ल्या यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मल्ल्या यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीतून १४,१३० कोटी रुपयांहून अधिक वसूल करून सार्वजनिक बँकांकडे हे पैसे जमा केल्याचे निवेदन संसदेत केल्यानंतर मल्ल्या यांची प्रतिक्रिया आली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टच्या मालिकेत मल्ल्या म्हणाले, कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरणाने केएफए (किंगफिशर एअरलाइन्स) चे कर्ज १२०० कोटी रुपयांच्या व्याजासह ६,२०३ कोटी रुपये निश्चित केले. त्यांनी पुढे लिहिले, अर्थ मंत्र्यांनी संसदेत घोषणा केली की, ईडीमार्फत बँकांनी माझ्याकडून १४,१३१.६ कोटी रुपये हे ६,२०३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी वसूल केले आहेत आणि मी अजूनही आर्थिक अपराधी आहे.
जोपर्यंत ईडी आणि बँका यांनी कायदेशीररीत्या दुप्पट कर्ज कसे वसूल केले याचे समर्थन करू शकत नाहीत, तोपर्यंत मी त्याचा मी पाठपुरावा करेन. मंगळवारी लोकसभेत अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या पहिल्या बॅचवरील चर्चेला उत्तर देताना, सीतारामन म्हणाल्या की, मल्ल्या यांच्या मालकीच्या १४,१३१.६ कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निधी देण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये यूकेला पळून गेलेला मल्ल्या किंगफिशर एअरलाइन्स (KFA) ला अनेक बँकांनी कर्ज दिलेले ९ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी भारताला हवा आहे.