नवी दिल्ली : व्यवसायात आव्हाने असूनही दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या मागणीच्या जोरावर २०२४ मध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीमध्ये दरवर्षी ९ टक्क्यांनी वाढ झाली, असे डीलर्सची संघटना ‘फाडा’ने मंगळवारी सांगितले. २०२३ कॅलेंडर वर्षातील २,३९,२८,२९३ युनिट्सच्या तुलनेत मागील वर्षी एकूण वाहन नोंदणी २,६१,०७,६७९ युनिट्स झाल्याने विक्रीमध्ये ९ टक्के वाढ झाली.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये उष्णतेची लाट, लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका आणि असमान पावसासह अनेक समस्या असूनही, वाहन उद्योग लवचिक राहिला.
दुचाकी विभागामध्ये, सुधारित पुरवठा, नवीन मॉडेल्स आणि मजबूत ग्रामीण मागणी यामुळे वाढीस चालना मिळाली. तथापि, अर्थपुरवठ्यांवर मर्यादा आणि वाढती ईव्ही स्पर्धा आव्हाने उभी आहेत, असे त्यांनी नमूद केले.
प्रवासी वाहन (पीव्ही) विभागाला मजबूत नेटवर्क विस्तार आणि उत्पादन लाँचचा फायदा झाला, जरी जास्त इन्व्हेंटरीमुळे मार्जिनचा दबाव आहे. त्यामुळे दुसऱ्या सहामाहीत सवलतीचे ‘युद्ध’ सुरू झाले, असे विघ्नेश्वर म्हणाले. निवडणूक आधारित अनिश्चितता आणि पायाभूत सुविधांवर होणारा खर्च कमी झाल्याने व्यावसायिक वाहन विभागातील कामगिरी कमी झाली, असे त्यांनी नमूद केले.
डिसेंबर २०२४ मध्ये वाहनांची किरकोळ विक्री दरवर्षी १२ टक्क्यांनी घटून १७,५६,४१९ युनिट्सवर आली, तर डिसेंबर २०२३ मध्ये १४,५४,३५३ युनिट्सच्या तुलनेत दुचाकींची नोंदणी १८ टक्क्यांनी घसरून ११,९७,७४२ युनिट्सवर आली आहे. तसेच डिसेंबर २०२३ मधील २,९९,३५१ युनिट्सच्या तुलनेत प्रवासी वाहन किरकोळ विक्रीही २ टक्क्यांनी घसरून २,९३,४६५ युनिट्सवर गेली.
प्रवासी वाहन विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ
२०२३ मध्ये ३८,७३,३८१ युनिट्सच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढून प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षी ४०,७३,८४३ युनिट्सवर गेली, तर दुचाकी वाहनांची विक्री २०२३ मध्ये १,७०,७२,९३२ युनिट्सच्या तुलनेत २०२४ मध्ये १,८९,१२,९५९ युनिट्स होऊन वर्षभरात तब्बल ११ टक्क्यांनी वाढली. तीनचाकी वाहनांची नोंदणी २०२३ मध्ये ११,०५,९४२ युनिट्सच्या तुलनेत वर्षभरात ११ टक्क्यांनी वाढून १२,२१,९०९ युनिट्स झाली. तसेच ट्रॅक्टरच्या विक्रीत वर्षभरात ३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,९४,११२ युनिट्स झाली, तर २०२४ मध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री १०,०४,८५६ युनिट्स झाली.