बिझनेस

घाऊक महागाई १५ महिन्यांच्या उच्चांकावर; खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाईचा दर मे महिन्यात २.६१ टक्के या १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात तो १.२६ टक्के होता. घाऊक अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये ५.५ टक्के आणि मे २०२३ मध्ये ४.८२ टक्क्यांवरून मे महिन्यात ७.४ टक्के झाली. घाऊक किमती मे मध्ये मासिक आधारावर ०.२ टक्का वाढल्या. अन्नपदार्थ, विशेषतः भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यात सलग तिसऱ्या महिन्यात २.६१ टक्क्यांपर्यंत वाढली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर गेल्या महिन्यात १.२६ टक्के होता. मे २०२३ मध्ये तो (-) ३.६१ टक्के होता.

अन्नपदार्थांच्या किमती, अन्न उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल व इतर उत्पादने महागल्याने मे २०२४ मध्ये चलनवाढीचा दर वाढला आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांची महागाई मे महिन्यात ९.८२ टक्क्यांनी वाढली होती, तर एप्रिलमध्ये ती ७.७४ टक्के होती. मे महिन्यात भाज्यांची महागाई ३२.४२ टक्के होती, जी मागील महिन्यात २३.६० टक्के होती. कांद्याचा भाव ५८.०५ टक्के तर बटाट्याचा भाव ६४.०५ टक्के वाढला. मे महिन्यात डाळींच्या महागाईचा दर २१.९५ टक्क्यांनी वाढला आहे. इंधन आणि उर्जा विभागातील महागाई दर मेमध्ये १.३५ टक्के राहिला असून एप्रिलच्या १.३८ टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे. उत्पादित उत्पादनांची महागाई एप्रिलमध्ये (-) ०.४२ टक्क्यांवरून ०.७८ टक्क्यांवर पोहोचली.

बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ आदिती गुप्ता यांनी सांगितले की, देशातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे अन्नधान्य महागाईचा दरही वाढण्याची शक्यता आहे. मान्सून कसा राहील, यावर अन्नधान्य चलनवाढ अवलंबून राहील. देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहिल्याने, जून २४ मध्येही भाज्या आणि फळांच्या किमतीत वाढ होत आहे आणि नजीकच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, जागतिक धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन श्रेणीतील महागाई वाढण्यास हातभार लागला आहे. उत्पादित उत्पादनांमध्ये मे महिन्यात महागाईचा दर ०.७८ टक्के होता, जो एप्रिलमधील (-) ०.४२ टक्क्यांपेक्षा जास्त होता.

बार्कलेज इकॉनॉमिस्ट श्रेया शोधनी यांनी सांगितले की, उत्पादन किंमत निर्देशांक (ज्याचा डब्ल्यूपीआयमध्ये सर्वाधिक हिस्सा ६४ टक्के आहे) सलग चौथ्या महिन्यात वाढला आहे. ते पाहता कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येते.

इक्राच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की कोअर-डब्ल्यूपीआय (नॉन-फूड मॅन्युफॅक्चरिंग डब्ल्यूपीआय) तब्बल १४ महिन्यांनंतर मे २०२४ मध्ये महागाई वाढली आहे. एप्रिल २०२४ च्या तुलनेत महागाई १३० बीपीएस वाढीमध्ये ५७ बीपीएस इतके योगदान दिले. इंधन आणि उर्जा विभागामध्ये महागाई १.३५ टक्क्यांवर आहे, एप्रिलमधील १.३८ टक्क्यांपेक्षा किरकोळ कमी आहे. जून २०२४ मध्ये कच्च्या तेलाच्या भारतातील उत्पादनासह जागतिक वस्तूंच्या किमती देखील मासिक आधारावर घसरल्या. त्यामुळे डब्ल्यूपीआयमध्ये वाढ झाली. एकूणच प्रतिकूल परिस्थिती पाहता ‘इक्रा’ला जून २०२४ मध्ये डब्ल्यूपीआय चलनवाढ माफक प्रमाणात तीन टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे नायर म्हणाल्या.

मे महिन्याच्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या तुलनेत मेमधील डब्ल्यूपीआयमध्ये वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) पतधोरण तयार करताना प्रामुख्याने किरकोळ महागाईचा विचार करते. किरकोळ चलनवाढ मे महिन्यात १ वर्षाच्या नीचांकी ४.७५ टक्क्यांवर आली, असे या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. आरबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला सलग आठव्यांदा व्याजदरात बदल केला नाही. गेले वर्षभर डब्ल्यूपीआय चलनवाढीत असताना या वर्षी घाऊक किमतीत झालेली वाढ हळूहळू किरकोळ किमतींमध्ये भर घालणे अपेक्षित आहे. आम्ही डिसेंबर २०२४ मध्ये एकूण ५० बीपीएसने व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला