मनोरंजन

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

मुंबईत गुरूवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कार्तिक देखील उपस्थित होता.

Swapnil S

घाटकोपर छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या दोन नातलगांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत तब्बल ५५ तासांनंतर बुधवारी रात्री दोन जणांचे मृतदेह सापडले. मुंबई विमानतळाचे एअर ट्रॅफिक कंट्रोलचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोज चंसोरिया (६०) यांच्यासह पत्नी अनिता या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हे दोघेही कार्तिक आर्यनचे नातलग होते आणि गुरूवारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कार्तिक देखील उपस्थित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरवरून कामानिमित्त ते मुंबईत आले होते आणि काम संपवून पुन्हा जबलपूरला जाणार होते. मात्र जबलपूर ते मुंबई त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. कामानिमित्त मुंबईत आलेले मनोज चंसोरिया काम संपल्यावर सोमवारी ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. काही रिपोर्ट्समध्ये, हे दाम्पत्य व्हिसा संबंधित औपचारिकतेसाठी मुंबईत आले होते आणि त्यांचा मुलगा यश याला अमेरिकेत जाऊन भेटण्याची योजना आखत होते, असे म्हटले आहे. पेट्रोल पंपावर थांबले असतानाच वादळीवाऱ्यासह पावसाच्या तडाख्यामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. मार्च महिन्यात सेवानिवृत्त झालेले मनोज चंसोरिया यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे. अमेरिकेतून त्यांचा मुलगा संपर्क साधत होता, मात्र बराच वेळ वडील फोन उचलत नसल्याने अखेर मुलाने मुंबई पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ मोबाईल ट्रेस केला असता, मोबाईलचे लोकेशन घटनास्थळाचे दाखवले.

मोबाईल लोकेशन छेडानगर येथील पेट्रोल पंपाचे असल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत चंसोरिया दांपत्य सुखरूप बाहेर यावे, यासाठी देवाची प्रार्थना सुरू केली. मात्र बुधवारी रात्री मनोज चंसोरिया व पत्नी अनिता या दोघांचे मृतदेह सापडल्याने परिवारात हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल