Amitabh Bachchan Birthday : वयाच्या ८४ व्या वर्षीही फिट! जाणून घ्या बिग बींच्या आहाराचे रहस्य X/@SrBachchan
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday : वयाच्या ८४ व्या वर्षीही फिट! जाणून घ्या बिग बींच्या आहाराचे रहस्य

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या आहारातील बदलांविषयी माहिती दिली होती.

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज, ११ ऑक्टोबर रोजी ८४ वर्षांचे झाले आहेत. अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान असलेले अमिताभ बच्चन या वयातही चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच शिस्तबद्ध दिनचर्या आणि आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही अनेकांना उत्सुकता निर्माण करते. वयानुसार त्यांनी आपल्या आहारात अनेक बदल केले आहेत. मांसाहार, मिठाई आणि भात खाणे बंद करून त्यांनी साध्या आणि संतुलित भारतीय आहाराला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, ते सन २००० पासून शाकाहारी आहार घेत आहेत. त्यांच्या आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश असतो, जाणून घेऊया.

भात आणि खीर खाणेही केले बंद

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या आहारातील बदलांविषयी माहिती दिली होती. त्यांनी भात आणि खीर खाणे बंद केल्याचे सांगितले. त्यांची पत्नी जया बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्यासाठी आंब्याची खीर बनवली होती. अमिताभ यांनी नेहमीची खीर आणि भात खाणे सोडल्यामुळे जया यांनी आंब्यापासून वेगळी खीर तयार केली. याबद्दल अमिताभ यांनी त्यांचे आभारही मानले.

सकाळच्या आहारात आवळ्याचा रस, बदाम आणि फळांचा समावेश

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर सकाळच्या दिनचर्येविषयीही लिहिले आहे. त्यांच्या सकाळच्या आहारात तुळशीची पाने, प्रथिनयुक्त पेय, बदाम, दलिया, नारळपाणी, आवळ्याचा रस आणि फळांचा समावेश असल्याचे त्यांनी एका ब्लॉगमध्ये नमूद केले होते.

व्यायाम करतानाही ते खाण्यापिण्याची काळजी घेतात. व्यायामादरम्यान खजूर आणि सफरचंदाच्या फोडी खाणे तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणे यांचाही त्यांच्या दिनचर्येत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

२००० पासून मांसाहार आणि मिठाईपासून दूर

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये तरुणपणी खाण्याच्या सवयी वेगळ्या होत्या, मात्र आता त्यांनी मांसाहार, गोड पदार्थ आणि भात खाणे सोडल्याचे सांगितले होते. त्यांच्या आहारातील हा बदल त्यांच्या वैयक्तिक निवडीचा भाग आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आहाराविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. मात्र, त्यांनी स्वतःसाठी निवडलेला आहार प्रत्येकाने तसाच पाळावा, असे नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज आणि आरोग्याची स्थिती वेगवेगळी असते.

नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत साधा आहार

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, लखनऊमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान अमिताभ बच्चन यांनी मांसाहारी पदार्थांऐवजी साध्या आहाराला प्राधान्य दिले होते. त्या हॉटेलच्या आचाऱ्याने त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल माहिती दिली होती.

आचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमिताभ बच्चन नाश्त्यात दूध आणि मिरची न घातलेली अंड्याची भुर्जी खातात. दुपारच्या जेवणात दोन ते तीन पोळ्या, साधी डाळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. एकदा त्यांनी पनीर भुर्जीची मागणीही केली होती.

कामाच्या व्यस्त वेळापत्रकात रात्री सूपला पसंती

चित्रपट किंवा कार्यक्रमाच्या चित्रीकरणामुळे काम उशिरापर्यंत सुरू असल्यास अमिताभ बच्चन रात्रीच्या जेवणात सूप घेण्यास प्राधान्य देतात, अशी माहिती संबंधित हॉटेलच्या आचाऱ्याने दिली होती. काही वेळा ते पूर्ण जेवणाऐवजी केवळ सूप घेतात. त्यांच्या आहारात साधे आणि विविध पोषक घटकांचा समावेश असलेले पदार्थ दिसून येतात.

'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या पर्वात व्यग्र

अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १८ व्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. तसेच 'कल्की २८९८ एडी'च्या पुढील भागात ते पुन्हा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षातही काम सुरू ठेवणारे अमिताभ बच्चन यांची शिस्तबद्ध दिनचर्या आणि साध्या आहाराची पद्धत चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान