भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 60 आणि 70 च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. त्या ७९ वर्षांच्या आहेत. अभिनयाच्या बळावर त्यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1959 ते 1973 पर्यंत त्यांनी बॉलिवूडवर जादू केली. त्यावेळी आशा पारेख यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते.
आशा पारेख यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आशा पारेख यांनी राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली.
आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची जोडी पडद्यावर सुपरहिट म्हणून ओळखली जात होती. दोघांनी मिळून 'दिल दे के देखो', 'जब प्यार किसी से होता है', 'तीसरी मंझील' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कटी पतंग' या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच, 1992 मध्ये भारत सरकारने आशा पारेख यांना त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.