‘बिग बॉस १९’चा महाअंतिम सोहळा अखेर पार पडला आणि या भव्य फिनालेमध्ये गौरव खन्नाने बाजी मारत ‘बिग बॉस’ची चमचमती ट्रॉफी आपल्या नावे केली. गेल्या १०० दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या या शोमध्ये फरहान भट, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि गौरव खन्ना हे टॉप ५ फायनलिस्ट होते. सर्वांवर मात करत गौरवने ‘बिग बॉस १९’वर नाव कोरलं. विजयानंतर सह-स्पर्धकांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
फिनालेमध्ये गौरव आणि फरहाना यांच्यात अंतिम लढत झाली. गौरवच्या विजयानंतर फरहानाला फर्स्ट रनर-अप म्हणून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तरीही आपल्या भावना व्यक्त करताना फरहानानं सांगितलं की ट्रॉफी जिंकता आली नसली तरी लोकांची मने जिंकण्यात तिनं यश मिळवलं आहे.
‘बिग बॉस १९’मध्ये शांत, संयमी आणि हुशार खेळासाठी गौरव खन्ना विशेष चर्चेत होता. भांडणं मिटवणं, मर्यादा सांभाळून बोलणं आणि अनाठायी गोंधळ न घालणं, ही त्याची शैली प्रेक्षकांना भावली. शेवटपर्यंत स्थिर डाव साधत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आणि अखेर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
लोकप्रिय स्टँडप कॉमेडियन आणि गौरवचा खास मित्र आणि प्रणित मोरेनंही गौरवचं मनापासून अभिनंदन केलं. टीव्ही इंडस्ट्रीत गेली २० वर्षे कार्यरत असल्यामुळे गौरवला चाहत्यांचा जबरदस्त पाठिंबा लाभला. त्याच प्रेम आणि सपोर्टमुळेच आज तो ट्रॉफीचा मानकरी ठरला.
"ते विचारत राहिले - 'जीके काय करेल?' आणि मी… ट्रॉफी घरी आणली!"
ग्रँड फिनालेनंतर गौरव खन्नानं केलेली पहिली इंस्टाग्राम पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. “ते विचारत राहिले, ‘जीके काय करेल?’ आणि मी… ट्रॉफी घरी आणली!” अशा दमदार शब्दांत त्याने आपला भावनिक प्रवास सांगितला.
गौरवच्या टीमनं त्याच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो ट्रॉफीसोबत पोझ देताना दिसतोय, तर दुसऱ्यात पत्नी आकांक्षा चमोलासोबत दिसतो. या फोटोंसोबत टीमनं लिहिलं, “अखेर तीन महिन्यांचा प्रवासाची सांगता झाली… आणि किती सुंदर शेवट झाला! ट्रॉफी अखेर घरी आली. ‘जीके काय करणार?’ याचं उत्तर त्याने आज आपल्यासाठी ट्रॉफी घेऊन दिलं”
चाहत्यांचे आभार मानताना टीम पुढे म्हणते, “हा प्रवास भावनिक अनुभवांनी भरलेला होता. गौरवसोबत आपण प्रत्येक यश-अपयशाचं क्षण जगलो. आजचा त्याचा हा विजय प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक वाटतोय, कारण हा त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला वोट्स केले आणि त्याला कायम साथ दिली. आज आपण केवळ ट्रॉफी जिंकलो नाही, तर आपल्या एकतेचा आणि प्रेमाचा विजय साजरा करत आहोत.”
एका वर्षात दोन मोठे टायटल्स - गौरवचा विक्रम
गौरव खन्नानं ‘बिग बॉस 19’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि आपल्या कारकिर्दीतील दुसरं मोठं टायटल आपल्या नावे केलं. याच वर्षी त्यानं ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’चा किताब जिंकलेला. एका वर्षात दोन मोठे रिअॅलिटी शो जिंकून गौरवने चाहत्यांसमोर मोठा इतिहास रचला आहे.
‘बिग बॉस 19’ जिंकल्याबद्दल गौरव खन्नाला चमकदार ट्रॉफीबरोबरच ५० लाख रुपयांचं प्राईज मनीही मिळालं आहे.