पूनम अपराज
मुंबई : सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि चकमकफेम दया नायक यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. २००४ मधील ‘अब तक छप्पन’ या क्राईम थ्रिलर चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेल्या ‘इन्स्पेक्टर साधू आगाशे’ या पात्रासाठी दया नायक यांच्याच आयुष्याची प्रेरणा घेतली होती.
दया नायक यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या ‘एक्स’ वर शेअर करत त्यांना जवळचा मित्र आणि भाऊ म्हटले आहे. एका भावूक पोस्टमध्ये नायक यांनी लिहिले, ‘तुम्ही निघून गेला आहात यावर माझा विश्वास बसत नाही. आमची काही दिवसांपूर्वीच बोलणी झाली होती आणि ती आमची शेवटची चर्चा होती, यावर विश्वास ठेवणे मला कठीण जात आहे." नाना पाटेकरांच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेची आठवण काढत नायक म्हणाले की, अभिनेत्याने केवळ एक पोलीस पडद्यावर साकारला नाही, तर युनिफॉर्ममागील माणूस, त्यावरील ताणतणाव, मानवी बाजू आणि पोलीस असण्याचा खरा अर्थ काय असतो, हे त्यांनी प्रेक्षकांना समजवले.
नायक यांनी लिहिले, ‘एक अतिशय अष्टपैलू अभिनेता आणि तुम्ही प्रत्येक पात्रात जी जीव ओतून रंग भरले, ते खऱ्या अर्थाने अद्भूत होते. माझ्यावर प्रेरित असलेल्या पात्राची भूमिका साकारून तुम्ही मलाच प्रेरित केले होते.’
नायक पुढे म्हणाले, ‘पण अभिनेत्या पलीकडे ते एक चांगले मित्र होते. नाना ज्याच्यावर मी नेहमीच डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत होतो. प्रेमळ, विश्वासू, उदार आणि गरज भासेल तेव्हा कायम मदतीसाठी तत्पर असणारे. मी तुम्हाला खूप मिस करेन. तुम्हाला ओळखायला मिळाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माझा मित्र व भाऊ म्हणवून घेता आले, याबद्दल मी स्वतःला अतिशय नशीबवान समजतो.’
नायक यांनी सांगितलेले किस्से आणि पोलीस खात्यातील अनुभवांचा आधार घेऊन चित्रपटातील अनेक प्रसंग अगदी तसेच चित्रीत करण्यात आल्याचेही त्यांनी आठवले. ‘खूप खूप आभार. माझ्या करिअरला थोड्या उंचीवर नेण्यात तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे,’ असे नाना पाटेकर यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.