मराठी सिनेविश्वात दरवर्षी नवे चेहरे झळकतात, परंतु काही कलाकार आपल्या पहिल्याच कामगिरीतून प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अभिनेता धैर्य घोलप यानेही असाच ठसा उमटवला आहे. ‘एक नंबर’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटात, साकारलेल्या दमदार भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर मराठी 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार' (Best Debut – Male) प्राप्त झाला आहे.
या चित्रपटात धैर्यने साकारलेली प्रताप ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अभिनयातील त्याची निष्ठा, मेहनत आणि आत्मविश्वास या साऱ्यांचं प्रतिबिंब त्याच्या परफॉर्मन्समध्ये दिसले. पुरस्कार मिळाल्यानंतर धैर्यने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“मी हा पुरस्कार कृतज्ञतेने आणि जबाबदारीने स्वीकारतोय. 'एक नंबर' चित्रपटाची संपूर्ण टीम माझ्या पाठीशी होती म्हणूनच मी प्रताप या भूमिकेला न्याय देऊ शकलो. माझ्या सगळ्या 'एक नंबर' माणसांचे आणि टीमचे आभार,” असं तो म्हणाला.
विशेष म्हणजे, या पुरस्काराचे श्रेय त्याने माननीय राज ठाकरे यांना दिलं असून, त्यांचे नाव घेत धैर्यने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
धैर्य घोलप आता पुढेही अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्याच चित्रपटात मिळालेलं हे यश म्हणजे त्याच्या अभिनयप्रवासाची भक्कम सुरुवात मानली जात आहे.