अलीकडेच नेटफ्लिक्सवर आलेली 'आय सी ८१४ द कंदहार हायजॅक' ही वेबसिरिज वादात सापडली आहे. यामध्ये विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची खरी ओळख लपवल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची दखल घेत नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स बजावले आहे.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आयसी ८१४ द कंदहार हायजॅक' ही वेबसिरिज २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान आयसी ८१४ दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. याचीच कथा या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.
आयसी ८१४ विमानाचं अपहरण करणाऱ्यांची खरी नावं इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर, सनी अहमद, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी होती. मात्र, वेबसिरिजमध्ये त्यांची नावं बदलून 'भोला' आणि 'शंकर' ठेवण्यात आल्याचे म्हणत रविवारी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हिंदू नावांचा वापर केल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सिरीजवर जोरदार टीका झाली. त्यावर, 'दहशतवाद्यांनी एकमेकांसाठी कोडनेम वापरले होते आणि या सीरिजसाठी योग्य अभ्यास आणि माहिती घेण्यात आली आहे', असे स्पष्टीकरण या सीरीजचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी दिल्यावरही नेटकऱ्यांचा रोष काही कमी झाला नाही. या सीरिजवर बहिष्कार घालण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू झाली. दरम्यान, भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि खासदार कंगना राणावत यांनीही यावरुन टीका केली. त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची दखल घेत नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स बजावले आहे.
खरी नावं काय होती?
केंद्रीय गृह मंत्रालयाने ६ जानेवारी २००० रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार अपहरणकर्त्यांची खरी नावे खालीलप्रमाणे होती.
> इब्राहिम अतहर, बहावलपुर
> शाहिद अख्तर सईद, गुलशन इकबाल, कराची
> सनी अहमद काजी, डिफेंस एरिया, कराची
> मिस्त्री जहूर इब्राहिम, अख्तर कॉलोनी, कराची
> शाकिर, सुक्कुर सिटी