सरे : प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे शहरातील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा कॅफे काहीच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र, बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री या कॅफेवर गोळीबार करण्यात आल्या. अज्ञात हल्लेखोरांनी या कॅफेवर किमान नऊ गोळ्या झाडल्याची माहिती आहे. बंदी घातलेला दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) कार्यकर्ता हरजीत सिंग ऊर्फ लड्डी याने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी पहाटे २ वाजता सरे येथील १२० स्ट्रीटच्या ८४०० ब्लॉकवर असलेल्या शर्मा याच्या नव्याने उद्घाटन झालेल्या कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला. काही वेळातच सरे येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना असे आढळून आले की, या गोळीबारात त्यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान कॅफेमधील कर्मचारी आत उपस्थित होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरे पोलिसांच्या स्टाफ सार्जंट लिंडसे हॉटन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, अधिकारी या परिस्थितीची चौकशी करत आहेत, परंतु या हल्ल्यामागील हेतूविषयी आताच सांगितले जाऊ शकत नाही.
राहणे बनले कठीण
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आठ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये कॅफेवर हँडगनमधून गोळ्या झाडल्या जात असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडीओ एका गाडीतून शूट करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, सरेमध्ये दक्षिण आशियाई व्यवसायांना लक्ष्य करण्यात आल्याची ही पाचवी घटना आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सरे येथील रहिवाशांपैकी एक सतीश कुमार यांनी ‘व्हँकुव्हर सन’ला सांगितले की, सध्या सर्रेमध्ये राहणे खूप कठीण आहे. या शहरात खूप गुन्हे घडत आहेत. दररोज गोळीबार होत आहेत. कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “ग्राहकांना टेस्टी कॉफी देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण भावनेने सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा कॅफे सुरू केला आहे. जे स्वप्न आम्ही पाहिले त्या गोष्टीला हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे, हे हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही.
टिप्पणीचा बदला
कपिल शर्माच्या एका टेलिव्हिजन शोदरम्यान निहंग शिखांच्या पोशाखाबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द व्हँकुव्हर सन’ने वृत्त दिले आहे की, शर्माच्या कॅफेवरील हल्ला सर्रेमध्ये लक्ष्य करण्यात येणाऱ्या व्यवसायांच्या हल्ल्याचा एक भाग आहे. जूनपासून शहरातील दक्षिण आशियाई व्यावसायिक समुदायावर परिणाम करणाऱ्या अशा पाच घटना घडल्या आहेत. पोलिस आता या हल्ल्याचा तपास करत आहेत.
लड्डी नक्की कोण
हरजीत सिंग ऊर्फ लड्डी पंजाबमधील नवांशहरच्या गरपधाना गावचा रहिवासी आहे. लड्डी हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. भारताच्या केंद्रीय दहशतवादविरोधी कायदा अंमलबजावणी संस्थेने गेल्या वर्षीच त्याच्या नावावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सध्या तो जर्मनीमध्ये राहत आहे. त्याच्यावर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर हल्ले करून पंजाबमध्ये अनेक हिंसक हल्ले घडवून आणल्याचा आरोप आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, एप्रिल २०२४ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते विकास प्रभाकर यांच्या हत्येसाठीही तो जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शर्मा यांच्या घराला पोलिसांनी दिली भेट
दरम्यान, मुंबईतील ओशिवरा येथे कपिल शर्माचे घर असून शुक्रवारी पोलिसांनी त्या घराला भेट दिली. शर्मा यांच्या घराचा पत्ता तोच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. शर्मा यांच्या घराजवळील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली नाही अथवा त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.