मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम (Photo-X)
मनोरंजन

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

Nana Patekar Passes Away : पहाटे सुमारे ४.२० वाजता नाना पाटेकर यांना मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. मात्र..

किशोरी घायवट-उबाळे

पणजी : आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील डोना पावला येथील राहत्या घरी वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली. पहाटे अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी मित्राला केला होता. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तसेच त्यांना घाम येत होता. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या शेवटच्या काही तासांचा घटनाक्रम समोर आला असून, मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

अस्वस्थ वाटत असल्याचा मित्राला मेसेज

मणिपाल रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांची माहिती दिली. त्यांनी 'एएनआय'ला दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.३० वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या मित्राला मेसेज केला होता. त्यात त्यांनी अस्वस्थ वाटत असून, 'छातीत डाव्या बाजूला वेदना होत आहेत,' असे सांगितले होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मित्राला हा मेसेज तत्काळ पाहता आला नाही.

डॉक्टरांनी दिली अखेरच्या क्षणांची माहिती

त्यांचा मित्र पहाटे सुमारे ४ वाजता नाना पाटेकर यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि खूप घाम येत होता. रुग्णालय जवळ असल्याने त्यांच्या देखभाल करणाऱ्या व्यक्तीला रुग्णवाहिका आणण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर मणिपाल रुग्णालयाचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. डॉक्टरांनी घटनास्थळीच सीपीआर सुरू केला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

पहाटे सुमारे ४.२० वाजता नाना पाटेकर यांना मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे ते एक तास 'कार्डियाक मसाज' देण्यासह सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाचवता आले नाही. त्यानंतर पहाटे सुमारे ५.२० वाजता त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवासस्थानी उपस्थित नव्हते. त्यांचे मित्र आणि देखभाल करणारी व्यक्ती त्यांच्यासोबत होती. रुग्णालयाकडून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी नाटकासह मराठी आणि हिंदी सिनेमातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

चार दिवसांपूर्वीच कार्यक्रमाला उपस्थिती

नाना पाटेकर ४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या राजश्री खांडेपारकर यांच्या पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषणही केले होते. निधनाच्या अवघ्या चार दिवस आधीच ते या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

पाच दशकांची दमदार अभिनय कारकीर्द

जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप पाडली. 'क्रांतिवीर', 'परिंदा', 'अब तक छप्पन', 'नटसम्राट' यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत