मराठी मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुजा बागवेसाठी २०२५ हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरत आहे. एका मागे एक धमाकेदार प्रोजेक्ट्स करून ती कायमच चर्चेत राहिली आहे. आताही अशाच एका कारणामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
'नांदा सौख्यभरे' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ऋतुजा, आता अभिनयाच्या पुढे जाऊन रेस्टॉरंट व्यवसायात उतरली आहे.
अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरात तिने तिचं पहिलं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ‘फूडचं पाऊल’ असं खास नाव ठेवत तिने या व्यवसायाला एक वेगळी ओळख दिली आहे. आयुष्यात पुढे जाताना टाकलेलं हे नवं पाऊल, तिच्या म्हणण्यानुसार एक महत्वाची सुरुवात आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची मेजवानी येथे मिळणार आहे. रेस्टॉरंटच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेता सुबोध भावे आणि त्यांची पत्नीही उपस्थित होते.
ऋतुजाने आपल्या सोशल मीडियावरून या नव्या प्रवासाची झलक देत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रियाही आल्या आहेत. अनेकांनी तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तिच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं, तर ‘अलिकडेच ती 'अंधारमाया' या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भुमिकेत पाहायला मिळाली होती. ऋतुजाने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात तिने अभिनयाचा ठसा उमटवत अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. तिने 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यासोबत ती रंगभूमीवरही सक्रीय असते. तिची प्रमुख भूमिका असलेले 'अनन्या' हे नाटक खूप गाजले.