मुंबई : 'किंग' या चित्रपटाचे गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू असताना बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याला दुखापत झाली असून तो तातडीने उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
या बाबत सूत्रांनी सांगितले की, दुखापतीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु शाहरुख त्याच्या पथकासह उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, स्टंट करताना त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे.
शाहरुखला कामापासून एक महिन्याचा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खानचे पुढील वेळापत्रक आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. कारण-शाहरुखला बरे होण्यासाठी काही वेळ सुट्टी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो पूर्ण ताकदीने सेटवर परतेल. रिपोर्ट्सनुसार, जुलै ते ऑगस्ट या कालावधीत फिल्मसिटी, गोल्डन टोबॅको व वायआरएफ येथे 'किंग'च्या विविध भागांच्या चित्रीकरणाचे बुकिंग पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. 'किंग'चे चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे.
यापूर्वीही दुखापत
चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 'डर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली होती. १९९३ मध्येही एका शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. 'कोयला' चित्रपटाच्या सेटवरही शाहरुखला दुखापत झाली होती.