बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड प्रीमियरनंतर आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि बिग बॉस हिंदी १६चा उपविजेता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी कोणत्याही शोमुळे नव्हे, तर त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
'Finally' कॅप्शनने वाढवली उत्सुकता
शिव ठाकरेने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फोटोमध्ये शिव मुंडावळ्या बांधून पारंपरिक वेशात उभा दिसतोय. त्याच्या शेजारी उभी असलेली नवरी पाठमोरी असून, तिने सोनेरी रंगाची साडी आणि मुंडावळ्या परिधान केल्याचं दिसतं. या फोटोला शिवने केवळ ‘Finally’ असा एकच शब्द कॅप्शनमध्ये लिहिला आहे.
शुभेच्छांचा वर्षाव, सेलिब्रिटींचीही प्रतिक्रिया
हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी शिव ठाकरेला लग्नाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. आकांक्षा पुरी, विकी जैन, पूनम पांडे, स्मिता गोंदकर, उल्का गुप्ता यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून शिवच्या नव्या आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
नवरी कोण?
मात्र या सगळ्या आनंदात एक मोठं गूढ कायम आहे. शिव ठाकरेने अद्याप पत्नीचा चेहरा दाखवलेला नाही. तिचं नाव, ओळख किंवा कोणतीही टॅगिंग न केल्यामुळे ‘शिव ठाकरेची पत्नी नेमकी कोण?’ हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. तिची ओळख कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
लग्न की शूटिंग? नेटकऱ्यांचा सवाल
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या फोटोवर शंका व्यक्त केली आहे. “हे खरंच लग्न आहे की एखाद्या शूटिंगचा भाग?” असा सवाल काही युजर्स करत आहेत. तर काहींनी हा फोटो एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी घेतलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिल फूलच्या पार्श्वभूमीवरही काही मिश्किल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अजूनही अधिकृत शिक्कामोर्तब नाही
एकीकडे लग्नाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना, दुसरीकडे हा फोटो खरंच शिव ठाकरेच्या लग्नाचा आहे की एखाद्या शूटिंगचा भाग, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता या सगळ्या चर्चांवर स्वतः शिव ठाकरे काय स्पष्टीकरण देतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.