मनोरंजन

गझल गायिकीच्या दुनियेतील ‘बेताज बादशाह’ पंकज उधास यांचे निधन

Swapnil S

मुंबई : आपल्या धीरगंभीर आवाजाने ‘चिठ्ठी आयी है’...‘और आहिस्ता किजीए बाते’...‘ना कजरे धार’...आदी गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ गझल गायक व पार्श्वगायक पंकज उधास यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांची कन्या नायाब हिने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘नाम’, ‘साजन’, ‘मोहरा’ या गाजलेल्या चित्रपटांबरोबरच अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाले. बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजजींनी आपल्या गायकीने वेगळी ओळख तयार केली होती. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

८० च्या दशकात पंकजजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.

गझल गायिकीच्या दुनियेतील ‘बेताज बादशाह’ म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. त्यांच्या निधनानंतर भारताच्या गझल गायकी विश्वात मोठी शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पंकजजींचे चाहते होते. त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

पंकजींना त्यांच्या ‘चिठ्ठी आयी है’ या गझलपासून मोठी लोकप्रियता मिळाली होती. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ मधील त्या गझलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आजही ती गझल कमालीची लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ‘दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘चले तो कट ही जाएगा’ आणि ‘तेरे बिन’ नावाच्या गझलला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली होती.

लहानपणापासून गिरवले धडे

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ मध्ये गुजरातमधील सर्वकुंड येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. तर दोघे भाऊ गायक होते. त्यानंतर लहानपणापासून संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांच्या घरातच संगीताचे वातावरण होते. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांच्या संगीत शिक्षणाचा प्रारंभ झाला. शाळेत प्रार्थना म्हणताना त्यांच्या संगीत कलेला वाव मिळायला सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘आहट’ आला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त