Vijay Kadam Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज, १० ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. गेली दीड वर्ष विजय कर्करोगाने ते त्रस्त होते. अखेरीस आज सकाळी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. विजय यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा गंधार आहे. काही काळापूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आजरपणाविषयी आणि त्या काळातील घरच्यांच्या सपोर्टविषयी सांगितले होते. विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या होत्या. मुंबईतील अंधेरी येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सर्वतोपरी प्रयत्न करूनही आज सकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले.
९०च्या दशकातील नावाजलेले नाव
१९८० आणि ९०च्या दशकात मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये नावाजलेले नाव म्हणजे विजय कदम. विजय कदम यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत रंगमंचावर आणि पडद्यावर महत्त्वपूर्ण योगदान दिले. 'विच्छा माझी पुरी करा' आणि 'खुर्ची सम्राट' सारख्या लोकप्रिय नाटकांमधील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले त्यांनी फक्त नाटकच नाही तर सिनेमातही योगदान दिले. विजय त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांशी जोडले गेले.
१९८० च्या दशकात कदम यांनी 'टुरटूर' आणि 'रथचक्र' यांसारख्या नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करून मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. एक अभिनेता म्हणून त्यांच्या अष्टपैलुत्वामुळे त्यांना विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिकांपर्यंत विविध पात्रे साकारता आली. 'चष्मे बहाद्दर', 'पोलीस लाइन' आणि 'हळद रुसली कुंकू हसलं' यांसारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ते विशेषतः प्रसिद्ध होते.
विविध क्षेत्रातील दिग्गजानी वाहिली श्रदांजली
आनंदी आनंद (१९८७), तेरे मेरे सपने (१९९६), देखणी बायको नाम्याची (२००१), रेवती (२२०५), टोपी घाला रे (२०१०), ब्लफमास्टर (२०१२), भेट तुझी माझी (२०१३) आणि मंकी बात (२०१८) असे अनेक उत्तम प्रोजेक्ट्स त्यांनी केले. चित्रपटांव्यतिरिक्त कदम यांनी अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे, विच्छा माझी पुरी करा आणि सही दे सही या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.