मॉस्को : ब्रिक्स देशांचा व्यापार स्थानिक चलनातून वाढणे गरजेचे आहे. तसेच ब्रिक्स व्यासपीठावर स्वतंत्र सौदापूर्ती यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ठेवला आहे.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ब्रिक्स परिषदेत पुतीन म्हणाले की, ब्रिक्स देशांमध्ये स्वतंत्र सौदापूर्ती यंत्रणा तयार झाल्यास या देशांमध्ये वेगवान व सुरक्षित व्यवहार होऊ शकतील.
पुतिन म्हणाले की, ब्रिक्स सदस्यांमधील व्यापारात राष्ट्रीय चलनांचा वाटा सातत्याने वाढत आहे. त्यांनी २०२४ मध्ये ब्रिक्स देशांसोबतच्या रशियाच्या व्यापाराच्या आकडेवारीचा उल्लेख केला आणि म्हटले की, आपल्या देशांमधील व्यापारात राष्ट्रीय चलनांचा वापर सातत्याने वाढत आहे. २०२४ मध्ये, आपल्या राष्ट्रीय चलनाचा, रुबलचा आणि इतर ब्रिक्स देशांसोबतच्या रशियाच्या व्यापाऱ्यात मित्र देशांच्या चलनांचा वाटा ९० टक्के होता, असे त्यांनी सांगितले.
ब्रिक्स राष्ट्रांमध्ये परस्पर भांडवली गुंतवणूक वाढवण्याच्या गरजेबद्दलही भाष्य केले. “ब्रिक्स यंत्रणा आणि प्रामुख्याने न्यू डेव्हलपमेंट बँकेद्वारे असोसिएशनच्या सदस्य देशांकडून परस्पर भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्याचे काम प्रासंगिक वाटते. या उद्देशांसाठी, रशियाने एक नवीन ब्रिक्स गुंतवणूक व्यासपीठ तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्या देशांच्या आणि जागतिक दक्षिण आणि पूर्वेकडील देशांच्या अर्थव्यवस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि निधी आकर्षित करण्यासाठी संयुक्तपणे मान्य केलेली साधने विकसित करणे ही कल्पना आहे,” असे ते म्हणाले.
भारताला काय होणार फायदा ?
डॉलरऐवजी राष्ट्रीय चलनात व्यवहार झाल्यास भारताचे मोठे फायदे होतील. सध्या भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अमेरिकन डॉलरवर निर्भर राहावे लागते. डॉलरच्या मूल्यातील चढ-उताराचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो. त्यामुळे आयात महाग होते. राष्ट्रीय चलनात व्यापार झाल्यास भारताला चलन धोका कमी करता येऊ शकतो. जेव्हा व्यापार रुपयात होईल तेव्हा भारतीय व्यवसायांना डॉलर-रुपया विनिमय दरात होणारी अस्थिरता कमी होईल. त्यामुळे व्यापार करण्यासाठी कमी निधी लागेल व निर्यात अधिक स्पर्धात्मक बनेल.