आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या; शेकडो विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना गोळीबार, भारतीयांवर केले होते वादग्रस्त विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे तरुण सहकारी चार्ली कर्क यांची अवघ्या ३१ व्या वर्षी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. युटा व्हॅली विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

नेहा जाधव - तांबे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे तरुण सहकारी चार्ली कर्क यांची अवघ्या ३१ व्या वर्षी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. युटा व्हॅली विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर अमेरिकन राजकारणात मोठा भूकंप झाला असून, ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत दोषींना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

बंदूक बाळगण्याच्या विषयावर भाषण आणि बंदुकीनेच हत्या

युटा व्हॅली विद्यापीठात कर्क हे बंदूक बाळगण्याच्या कायद्याच्या समर्थनाविषयी भाषण करत होते. त्याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. घटनास्थळी गोंधळ उडाला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर एक संशयित ताब्यात घेण्यात आला होता; परंतु काही तास चौकशी करून त्याला सोडण्यात आले. सुरक्षा संस्थांकडून खऱ्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

कोण होते चार्ली कर्क?

कर्क हे केवळ १८ व्या वर्षीच चर्चेत आले. शिकागो येथे त्यांनी टर्निंग पॉईंट या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. कमी कर, मर्यादित सरकार, पारंपरिक मूल्ये अशा विचारांचा प्रचार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळीक झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. ते अनेक वृत्तवाहिन्यांवर नियमित चर्चेत दिसू लागले.

भारतीयांविषयी वादग्रस्त विधानं

कर्क यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या जुन्या विधानांची चर्चा पुन्हा रंगली आहे. भारतीय स्थलांतरितांविरोधात त्यांनी अलीकडेच वादग्रस्त विधान केले होते. “अमेरिका आता भरली आहे. त्यामुळे भारतीयांना व्हिसा देऊ नये. जे आले आहेत ते पुरेसे झाले. अमेरिकन लोकांची जागा भारतीय घेत आहेत. त्यामुळे आता आमच्या लोकांना रोजगारात प्राधान्य द्या,” असे विधान त्यांनी २ सप्टेंबर रोजी एक्सवर केले होते. यापूर्वीही त्यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत होती. समलैंगिक हक्क, गर्भपात याविरोधातही ते सतत बोलत असत.

अमेरिकेचा 'काळा दिवस' - ट्रम्प

चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. “चार्लीसारख्या अद्भुत अमेरिकन लोकांना काही कट्टरपंथी नाझी म्हणतात. हे लोकच हिंसाचारासाठी जबाबदार आहेत. आम्ही प्रत्येक गुन्हेगाराला शोधून शिक्षा करू,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी या घटनेला अमेरिकेचा 'काळा दिवस' म्हटले.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांनीही राजकीय हिंसाचाराचा निषेध केला. माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी “अमेरिकेत राजकीय हिंसाचाराला स्थान नाही,” असे सांगितले. या हत्येनंतर अमेरिकन ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून, संपूर्ण देशात या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती