बीजिंग : अमेरिकेमुळे निर्माण झालेल्या व्यापार आव्हानांचा मुकाबला ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) एकत्रित करावा, असे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवारी केले. अमेरिकेच्या टॅरिफ युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे ते म्हणाले.
ब्राझीलचे अध्यक्ष लुला द सिल्वा यांनी आयोजित केलेल्या ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत व्हिडिओ लिंकद्वारे बोलताना शी म्हणाले, “या क्षणी शतकात न पाहिलेल्या स्वरूपाचे परिवर्तन जगभरात वेगाने घडत आहे. दादागिरी, एकतर्फी धोरणे आणि संरक्षणवाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही देश छेडत असलेल्या व्यापार आणि टॅरिफ युद्धांनी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा गोंधळ निर्माण केला आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांना बाधा पोहोचवली आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी अमेरिकेचा किंवा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट उल्लेख टाळला, परंतु त्यांच्या भारत, ब्राझील, चीन आणि रशियावरील उच्च टॅरिफनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिरता आणली, असे सूचित केले.
या निर्णायक टप्प्यावर, ग्लोबल साऊथच्या आघाडीवर उभे असलेले ब्रिक्स देश खुलेपणा, सर्वसमावेशकता आणि ‘विन-विन’ सहकाराचा ब्रिक्स आत्मा जोपासत बहुपक्षीयतेचे आणि बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचे रक्षण करावे आणि अधिक सखोल सहकार्य वाढवावे,” असे ते म्हणाले.
ब्रिक्स नेत्यांची बैठक “अत्यंत महत्त्वाची” असल्याचे सांगून शी म्हणाले, “आपण आंतरराष्ट्रीय न्याय आणि समतेसाठी बहुपक्षीयतेचे समर्थन करायला हवे... हे जगातील शांतता आणि विकासासाठी महत्त्वाचा पाया ठरते. तसेच ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाहीला प्रोत्साहन द्यावे आणि ग्लोबल साऊथ देशांचे प्रतिनिधित्व व आवाज वाढवावा, असेही ते म्हणाले.